तुझ्या-माझ्या नात्यातला चैत्रबन..
तुझी-माझी ओळख झाली. हळूहळू मैत्री घट्ट झाली. अहो-जाहो वरून अरे-तुरेपर्यंत. चक्क एकेरीवर. इतकी घट्ट. एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांची इतक्या जवळची जान-पहचान साऱ्यांनाच खुपते. माझे जवळचे-जवळचे म्हणणारे मित्रही त्यात आले. तुझ्या मैत्रिणी त्याही आल्या.माहितंय आता तर आपल्यावर खऊट कॉमेंट मारणंही सुरू झालंय. “बघ कसा वाट बघतोय तिची, मजनू?’ हे खूप साधं-सरळसोट झालं. असं काही-बाही सुरू असतं. पण तू म्हणालीस दुर्लक्ष कर. हे सर्व स्वीकार. आपण कुठं, कधी काहीही चूक करत नाही ना. बस्स. मग कशाची भीती.’ हा विश्वास तू दिलास. मला भीती कधीच नव्हती. होती ती तुझी. तुला अशा बोलण्यानं काय वाटेल? याच विचारात मी असायचो. पण तू साऱ्यांवर मात करणारी निघालीस. परिस्थितीशी चार हात कसं करावं, हे तुझ्याकडून शिकावं. एखादं सुंदर सुरेल गाणं कसं रिचवावं हे तुझ्याकडून शिकावं. आणि कुठल्याही गोष्टींवर खळाळून कसं हसावं, हे तुझ्याकडून शिकावं. दुःख डोळ्यांत दाटल्यावर, त्याचा टिपूसही बाहेर पडू न देता कसं जगावं हे तुझ्याकडून शिकावं. असं बरंच काही तू शिकवलंस. या अशा शिकण्यातून मी तुझ्या नजीक आलो.
बेगडी जगण्याचा, वागण्याचा तुला तिटकरा. चेहऱ्यावरचा चेहरा तू टराटरा फाडतेस. समोरचा माणूस नजरेनं पारखतेस. हा तसा अनोखा गुण. साऱ्यांनाच जमेल असं नाही. पण तू नव्यान्नव टक्के बरोबर असायचीस. असं बरंच काही-काही तू शिकवलंयस.माझ्या दृष्टीचा कॅनव्हास तू विशाल केलास. तुझ्या दृष्टीनं जगाकडं पहायला शिकवलंस. पाऊस पडला की मक्याचं कणीस खाणं आलं. पण पाऊस पडला की मातीचा मनसोक्त गंध घ्यायचा, त्याचे थेंब तोंडावर झेलायचे हे तू शिकवलंस? प्रत्येक ऋतू तू तुझ्या पद्धतीनं जगतेस. मला वाटतं हे तुझ्या स्त्रीत्वाचं वरदान असावं. त्याचीच वेगळी दृष्टी असावी.कॉलेजचं हे शेवटचं वर्ष. तसं तुला दोन वर्षांपासून ओळखतो. पण या वर्षी तू खरी कळालीस. तुझे कॉलेजात तसे अनेक मित्र. प्रसंगी त्यांना एका फटक्यासरशी तू दूरही केलंस. तुझ्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावाचा त्यांनी सोयीनं अर्थ काढला. तसं तूही त्यांना सवडीनं त्यांची जागा दाखवलीस.
तसं तुझं रूप कुणालाही भुरळ घालावं असंच. कुरळे केस. गालावर खळी. अन् सावळी. पण तुझे गुणही तितकेच आवडतात मला. काय माहीत नाही. पण तू सच्चामित्र झालीयस. अर्ध्या रात्रीत कधीही तुला फोन करू शकतो इथपर्यंत. या नात्याला नाव काय द्यावं कळत नाही. पण हक्कानं चहा उकळणारी, आईस्क्रीम वसूल करणारी आणि आग्रह केला की पिक्चर दाखवणारी एक गोड, हळवी सखीयस तू…! या आपल्या नात्याला मला नाव द्यायचं नाहीए.
काही-काही नाती नावाशिवाय असावीत. चिरंतन स्मरणात राहतात.मग एखाद्या धकाधकीच्या क्षणी सर्व काही संपलं म्हणून बसलो की, फक्त या नात्याची आठवण काढायची. मग चैतन्याच्या धारा बरसत राहतात. हे आपल्या नात्यातलं चैत्रबन दुसऱ्या कुणाला कळणार नाही. ते कळूही नये. हे नातं फक्त आपलं. ते आपण जपायचं. तुझं-माझं नातं असं नावाविना सुरू ठेवायचं. अंतापर्यंत…
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
अशि नाति य़फक्त तरुणपणातच टिकतात. माघे रहातात त्या आठवणि ज्या कधिकधि काट्याप्रमाणे टोचतात
खूप सुंदर आणि ओघवते लिहिले आहे.नाव नसलेली च कधी कधी चांगल असत…नावा सोबत यथोचित हक्क आणि कर्तव्य जोडून येतात …आणि माणसे बदलतात…