आस ही तुझी फार लागली..
आस ही तुझी फार लागली II
दे दयानिधे बुद्धि चांगली II
देवूं तूं नको दुष्ट वासना II
तूंच आंवरीं माझिय मना II १ II
देह देउनी तूंच रक्षिसी II
अन्न देउनी तूंच पोशिशी II
बुद्धि देउनी काम सांगशी II
ज्ञान देउनी तूंच तारिशी II २ II
वागवावया सर्व सृष्टिला II
शक्ति बा असे एक तूजला II
सर्वशक्ति तूं सर्वदेखणा II
कोण जाणिजे तुझिया गुणा II ३ II
नाम रूप हें तूजला नसे II
तय तुला मुखें वर्णावे कसें II
आदि अंत ना मध्यही तुला II
तूंच दाविशी मार्ग आपुला II ४ II
माणसें आम्ही सर्व लेकरें II
माय बाप तूं हें असे खरें II
तूझिया कृपेवीण इश्वरा II
आसरा आम्हां नाहीं दूसरा II ५ II
तूंच आहसी आमुची गती II
देईं आमुतें उत्तमा मती II
प्रर्थितों तुला जोडुनी करां II
हे दयानिधे कीं कृपा करा II ६ II
~ साने गुरुजी
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)