‘नट’खटपौर्णिमा
मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली.
लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत दोघेही बेडरूममध्ये “चिकूमिल्कशेक” पीत बसलो होतो.
दारातून आई डोकावली “अग, उद्या वटपौर्णिमा आहे बरं का, करणार आहेस ना,पूजा आणि उपास?
मिल्कशेक मध्ये नसलेली चिकूची बी माझ्या घशातअडकली. मी घाबरून बायकोकडे पाहिले, तोपर्यंत तिने हुशारीने ऑफिसच्या शिपाया सारखी मान हलवली होती. म्हणजे हो किंवा नाही दोन्ही अर्थ निघतात अशी. आईने अगदी ऑफिस मधल्या बॉस सारखेच केले. तिच्या मनानुसार अर्थ काढला,
आणि ती गेली.
आता तोफा सुरु. “म्हणजे मी कश्या विचारांची मुलगी आहे हे तू अजून तुझ्या आईला सांगितलं नव्हतंस?
हे काय पूजाबीजा उपासतापास , useless
जा तुझ्या आईला सांग जाऊन म्हणावं ,माझी बायकोअसली थेरं करीत नाही”
बापरे. मी रामराम म्हणत बाहेर हॉलमध्ये आलो, आईचे छद्मी सूर घुमले “काय रे नक्कीकरणारे ना रे ती उपास? की काही फार आधुनिकतेची थेरं आहेत तिच्या मनात? पाच मिनिटात दोनदा “थेरं” शब्दआला, मला आत कापरे भरलेले. दणकून आईला” हो तर !”असं उत्तर देऊन आत आलो.
“बोललास का आईंशी? मी गप्प “वाटलं च होतं मला. कसा बोलशील रे माई का लाल, ना तू?” तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. दोन मिनिटं झाल्यावर मी हळूच माझ्या नेहमीच्या “हरीण छाप” लेन्स डोळ्यांवर चढवल्या आणि तिच्याजवळ सरकून बसलो. “अग, नाही मी बोलू शकलो गं आईला, तू तरी समजून घे न मला, तू निदान पूजेचे नाटक तरी कर ना, प्लीज माझ्यासाठी,” ती विरघळली हळू हळू ,”बरं मी करीन नाटक पूजेचे, हां पण उपासबिपास जमणार नाही मला”
मी म्हणालो ओके, चालेल ते बघू नंतर, (हुश्श! हरीण छाप लेन्स always rocks!!)
सकाळ उजाडली.
देवाच्या खोलीत सगळा मांड मांडलेला आईची लगबग सुरु झालेली. मी स्वतः च कॉफी प्यायला म्हणून किचन मध्ये शिरलो तर आई हिला विचारीत होती “तू निर्जळी उपास करणार? की दूध फळे घेऊन?”
बायको रागाने काही उत्तर द्यायच्या आत मी बरळलो,
“अग, दुधफळे खाऊन करेल ती”
बायको गप्प होऊन बघतेय. माझ्याकडे थंड खुनशी डोळ्यांनी. बायको साडी नेसायला आत आल्यावर आधी तिच्या हातात मी हुशारीने कॉफीचा कप आणि आपल्याच घरातून चोरलेली बिस्किटे ठेवली म्हटलं, खाऊन घे आत्ता, मग पुढे बघू. पूजा बिजा आटोपली 12 वाजले, बायकोच्या चेहऱ्यावरही
न हॉलमधल्या घड्याळातही! आईने बजावले तिला, “छान दिसते आहेस, पूजा पार पडलीय, पण आज कुठे बाहेर पडायचं नाही बरं,”
मग माझ्याकडे वळून, तुझं आणि बाबांचं पान वाढते आता. बायको कडे हळूच पाहिले तर आता
तिच्या डोळ्यांत तिने “वाघिणीच्या लेन्स” घातलेल्या होत्या.
आमची नजरानजर होताच आईने taunt मारला “का म्हटलं, प्रेमविवाह म्हणून तू पण उपाशी राहतोयस का, काय?”
आता तिच्या डोळ्यातून ज्वाळाच येऊ लागल्या (सुरेख हिरव्या साडीतली रागावलेली बायको छान दिसतेय)
माझं डोकं चालेनासं झालं . 12.30..1 वाजला. आई जेवायला हाक मारत्येय. एव्हढ्यात बाबांनी बोलावलं मला म्हणाले अरे, जरा नाक्यावर जाऊन मेथी ची जुडी आण. संध्याकाळी मला मेथीचीच भाजी हवीय आज.
बाबांच्या पुढे आईचे काही चालत नाही(भाग्यवान होते जुन्या पिढीतले पुरुष!!)
मी मोटारसायकलची चावी काढली न वीज चमकली एकदम। आईला ओरडून सांगितले, “हिला नेतो ग बाहेर, मला काही पालेभाजीतलं कळत नाही. पटकन बाहेर गेलो ते डायरेक्ट हॉटेलात. झक्कास मसालाडोसा खाऊन बायकोचे डोळे निवले, घरी आलो मी ही ताव मारून जेवलो मग. 2 वाजता कोचावर बसून बडीशेप खाताखाता बाबा मिश्किल हसून म्हणाले “बाळ्या, नशीब तुझं, आईने आज पिशवी चेक केली नाहीये तुझी” आयला, खरंच की, मेथी ची जुडी आणलीच नाहीये मी बाबा,” बाबा हलकेच हसले, म्हणाले “अरे मी तरी कुठे तुला ‘मेथीची जुडी’ आणायला पाठवलं होतं?”
मी थक्क होऊन बघत राहिलो त्यांच्या कडे तर म्हणाले,
“अरे, आई जुन्या वळणाची आहे तुझी, तर तिच्या मनासारखी झाली तिची “वटपौर्णिमा”. सुनबाई चे ही प्रेम आहेच की तुझ्यावर मग, म्हणून मी ही आयडिया लढवली ,काय
झाली की नाही “सत्यवानाची सावित्री खुश!!!”
आमची वट पौर्णिमा तर तुमची “नट पौर्णिमा” (बाबा rocks!!) पुढे म्हणाले दर वेळी मी उपयोगी पडणार नाही, बाळ्या..
मी कॅलेंडर हातात घेऊन बसलोय ,पुढच्या सणाची स्ट्रॅटेजी ठरवायला.
संकलन: स्पंदन टीम,
साभार – माधवी भागवत