समजण्यात हित आहे..

कोरोनामुळे जवळच्या नातेवाईकांत झालेला मृत्यू हादरवून सोडतो. इतके दिवस लांब लांब असलेला कोरोना घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ही भावना फार भिववणारी आहे.

अत्यंत हुशार, कर्तुत्ववान, युनीव्हर्सीटीत एच ओ डी, अनेकांची पीएचडीची गाईड असलेली, रिसर्च फेलोशीप मिळालेली, सामाजिक कार्यात पुढाकार असलेली, देशोदेशीच्या कॉन्फरन्सेसमध्ये पेपर प्रेझेंटेशन करणारी साधारण पंचावन्नच्या आगे मागे वय असलेली ही काकू. वाढत्या वयात तिच्या करिअरकडे ‘आ वासून’ बघावं असं कर्तुत्व. स्वत: कॅन्सर सर्व्हायव्हर होती. दोन वर्षांपुर्वी काका कॅन्सरने गेला. त्याचं प्रदीर्घ आजारपण तिने हिमतीने काढलं. तो गेला तेव्हा तिची लढवय्यी तशीच हळवी बाजूही दिसली होती. तिची खरंतर वेगळी गोष्टंच होईल.

काका गेल्यापासून काकू तिच्या नव्वदीतल्या आई, वडील आणि मावशी सोबत रहात होती. हल्लीच पायाला खुप त्रास होतोय म्हणून तिने मावशीला फिजीओथेरपीला घेऊन जायला सुरुवात केली. दोन तिन दिवसांनी मावशीला ताप आला म्हणून घरात सगळ्यांच्या टेस्ट्स केल्या तर मावशी, आई आणि ती अश्या तिघी पॉझिटीव्ह निघाल्या. काकूला बाकी काही सिम्प्टम नव्हतं, श्वासाला त्रास सुरु झाला म्हणून लगेच ॲडमिट केलं आणि काल ती गेलीही! जेमतेम पंधरा दिवसांत हलती फिरती कर्तुत्ववान बाई संपली!!

अश्या कितीतरी हकीकती. कोव्हिड सेंटरमधून डिस्चार्ज झाल्यावर, सेटल झाल्यावर कार्डीॲक अरेस्टने गेलेले, कोणतेही सिम्प्टम्स नसताना कॉम्प्लीकेशन्स झालेले, मायनर लक्षणं आहेत, काही होत नाही म्हणत दोन तिन दिवसांत गेलेले, वेळेवर ऑक्सीजन/व्हेंटीलटर न मिळाल्याने गेलेले, तरुण वयात आणि आता तर लहान वयातही जाणारे….मृत्यू दबा धरुन बसतो हे ऐकलं होतं, कोरोना ते खरं करुन दाखवतोय…..

कोरोनाच्या एकूण रुग्णांपेक्षा मृत्यचं प्रमाण कमी असलं तरी तो आहे… आणि कधी कोण त्याच्या झपाट्यात येईल सांगता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे. रोजचे व्यवहार कुणाला चुकत नाहीत पण हलगर्जीपणे केलेले व्यवहार आपल्या, घरच्यांच्या किंवा पुढच्या साखळीतल्या कोणाच्यातरी जीवावर उठू शकतात याचा विचार कोणी करायचा??

आजमितीला सगळ्यात धोकादायक कोण आहे माहीत आहे…आपण समजतो तो पापभीरु, मध्यमवर्गीय माणूस. त्याचं कारण आहे त्याची परिस्थीतीकडे काणाडोळा करायची, जे उघड्या डोळ्यांनी दिसतंय ते मनाने ॲक्सेप्ट न करण्याची वृत्ती. आजाराचं स्वरूप समजून न घेता तो लाइटली घेण्याची चूक करणारे अनेक लोक आजूबाजूला आहेत. कोरोना हे थोतांड आहे, सगळं राजकारण आहे, टेस्ट्स मॅनेज केल्या जातात, हे सगळे डॉक्टरांचे पैसे खाण्याचे उद्योग आहेत, इन्शुरन्ससाठी टेस्ट पॉझिटीव्ह आणल्या जातात…. असं बोलणारी जमात स्वतःला सर्वज्ञानी समजत असते. त्यांना समजवायला गेलं तर आपलीच खिल्ली उडवली जाते. कोरोनापेक्षाही लवकर पसरणा-या अश्या अफवा एखाद्या गरजू व्यक्तीला ट्रिटमेंटपासून लांब ठेवत असतात हे या लोकांच्या लक्षातच येत नाही. अश्या टोटल डिनायल मोडमध्ये असलेले लोक, आज एक वर्ष आणि इतक्या डेथ्सनंतरही, आजुबाजूला आहेत.

त्याऊपर मला अवघड वाटतात ते थेअरी परफ़ेक्ट पण प्रॅक्टीकलमध्ये नापास असलेले लोक. त्यांना आजाराची संपुर्ण माहिती असते पण फॉलो करण्याची वेळ आली की ढेपाळतात. यात अगदी उच्चशिक्षितही आले. माझ्या पहाण्यात पहिल्या वेव्हमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या, अत्यंत मोठ्या पगारावर काम करणा-या एका जोडप्यातला नवरा याचं उत्तम उदाहरण होता. स्वत: पॉझिटीव्ह असूनही ते लपवून ठेवणे, सकाळ संध्याकाळ मस्तपैकी खाली येणे, कुठल्याही प्रकारचे आयसोलेशन न पाळणे, लोकांनी विचारणा केल्यावर कडकडून भांडणे…असे मुद्दाम केल्यासारखे बरेच उद्योग त्यांनी केले. त्यांच्या भीतीने लोकांना घरात बसायची वेळ आली. शेवटी कोणीतरी महानगरपालिकेत फोन केला आणि त्याला अक्षरशः पकडून नेलं.

व्हॉट्सअप युनीव्हर्सिटीतून पी एच डी झालेली तर एक वेगळीच जमात आहे. जी-याचं पाणी, धण्याचं पाणी, लिंबू आणि अजून काय काय. मला तर ‘घरगुती उपाय’ या शब्दाचाच कंटाळा आलाय. कुठून कुठून वाचून कसलीतरी औषधं आणायची आणि काहीतरी टेम्पररी उपाय करायचे. ती घरात आणतांना सोबत आंदण आणलेल्या कोरोनाचे काय? प्रत्येक पॅथीच्या मर्यादा आहेत. जी गोष्ट ज्यावेळी करणे आवश्यक आहे तिच्याकडे काणाडोळा करायचा आणि आवश्यक उपचारांना उशीर करायचा यात आपण हातात असलेला बहुमुल्य वेळ अक्षरशः वाया घालवतोय हे या पीएचडी धारकांच्या लक्षातच येत नाही. बरं असे निम हकीम स्वतः पुरते उपचार करुन थांबत नाहीत, इतरांना ज्ञान वाटण्याची त्यांना फार हौस असते. त्यातून होतो काय तर फक्त उशीर. मुळ आजारावर त्वरीत उपचार करुन नंतर सप्लीमेंट म्हणून काय घ्यायचे ते घ्या. कोरोनावर जे उपचार हवेत ते करायलाच हवेत. व्हेंटीलेटरला कोणताही काढा, घरगुती औषध हा आजच्या काळात तरी पर्याय नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती हे खरं असलं तरी ते नको तिथे वापरण्यात आपण आपला शूरपणा दाखवतो. आयसोलेशन टाळायसाठी टेस्ट न करणारे, काहितरी थातुरमातूर उपचार करणारे, लक्षणं उगीचच अंगावर काढणारे, मदतनीसांपासून आजार लपवणारे, आयसोलेशनचा काळ पूर्ण न होऊ देता फक्त ऍक्टिव्ह लक्षणं कमी झाली कि बाहेर उंडारणारे आणि कहर म्हणजे पॉझिटिव्ह असल्याचं माहीत असूनही भाजी किराणा घ्यायला जाणारे महाभागही आहेतच !! यात कसला विकृत आनंद आहे ते त्यांनाच माहीत.

या वेव्हमध्ये दृश्य लक्षणं नसली तरीही लोक पॉझिटिव्ह येतात. बरेचदा कॉम्प्लीकेशन्स होतात. असे अनेक जण आजुबाजूला असतांना आपल्याला लक्षणं दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे मला सत्कार करण्यालायकच वाटतात. तुमच्या ‘अरे मी बघतो कोण माई का लाल आपल्याला मास्क घालायला लावतो’ छाप ॲटिट्यूड़ने साखळीतलं कोणीतरी आपला जीव गमावतंय, नव्हे कदाचीत तो जीव उद्या तुम्हालाच गमवावा लागेल याची जाणीव कधी होणार !!

टेस्ट करुन घेण्याच्या फोबियाचं तर मला आता हसू यायला लागलंय. ‘नको नाकात दुखतं’ असं म्हणून मोठे मोठे लोक टेस्टला नाही म्हणतात. ‘आम्ही टेस्टही करणार नाही आणि व्हॅक्सीनही घेणार नाही’ यात कसलं शौर्य आहे कुणास ठाऊक. जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपचार होतील आणि आपण मोकळं होऊ इतका साधा हिशोब का कळत नसावा. सध्या कोणत्याही शहरातली परिस्थिती पहा…बेड्स नाहीत, ऑक्सीजन मिळत नाही, व्हेंटीलेटर्स मिळत नाहीत, स्मशानात वेटींग आहे, सर्व सुविधा असून डॉक्टर्सही जीव गमावत आहेत….ऑलरेडी या आजाराच्या अनप्रेडीक्टेबीलिटीने जायचे ते जीव जातच आहेत. त्यात तुमच्या निष्काळजीपणाच्या समिधा का!!

मेंदू थोडा जागेवर ठेवला, थोडा विवेक शाबूत ठेवला तर यातून फार नुकसान न होता बाहेर निघता येऊ शकेल. घरातल्या सर्वांचे व्हॅक्सीनेशन, स्वतःच्या आणि आसपासच्यांच्या लक्षणांवर बारिक लक्ष, शंका आली तर लगेच टेस्ट, त्वरीत उपचार आणि कम्प्लसरी आयसोलेशन यातून कोरोनाला शक्य तितकं लांब ठेवता येईल. तुमच्या घरचे मोठे आणि लहान तुमच्यावर अवलंबून आहेत हे विसरुन चालणार नाही. इतक्या वर्षांत तुम्हाला एक विश्वास ठेवण्यासारखा डॉक्टर शोधता येत नसेल तर, समथिंग ईज सिरीअसली रॉंग विथ यू. बाकी मास्क और सोशल डिस्टंसिंगका तो बस मजाक बनाके रख दिया है!!

फार फार वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी म्हणलंय..
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तो ही पुढे जात आहे..

ते असं इतक्या वर्षांनी खरं ठरेल हे त्यांना वाटलंही नसेल….

~ सई चपळगांवकर

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: