मनात तेच लोकं बसतात

मनांत तेच लोक बसतात,
ज्यांचे मन साफ आहे. कारण…
सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,
ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते…
आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. पण प्रश्न आहे मनातल्या गाठीचं काय ? आणि गाठी असणारं मन स्वच्छ असतं काय ?
मित्रांनो माझ्या सह आपण सर्वांनीच या विचाराला लाईक करते वेळी हाच विचार केला असणार कि माझं मन तर साफचं आहे, माझ्या मनात कुठे ही आणि कसली ही गाठ नाही, हो ना ? ज्या काही गाठी आहेत, जी काही मनाची अस्वछता आहे ती समोरच्याचं मनात आहे. आणि म्हणूनच तर तो विचार मला भावला आणि मी त्याला लगेच लाईक केले…
मित्रांनो या विश्वात संत सोडले ना तर या जगात एक वेळ तनात गाठ नसणारा सापडेल पण मनात गाठ नसणारा एक हि व्यक्ती सापडणार नाही…
आपल्या सर्वांच्याचं मनांत गाठ नव्हे तर गाठी आहेत गाठी, फक्त गाठीचे प्रकार वेग वेगळे आहेत..कोणच्या मनात मी पणाची गाठ तर कोणाच्या मनात द्वेषाची, कोणाच्या मनात ईर्ष्येची, कोणाच्या मनात अहंकाराची, स्वार्थाची, वासनेची, मोहाची, मायेची, मोठेपणाची, हुशारीची, पदाची, पदवीची, संपत्तीची, प्रतिष्टेची, धर्माची, तर कोणाच्या मनात जातीची गाठ आहे. या आणि अशा अनेक गाठी आपल्या सर्वांच्या मानत कमी जास्त प्रमाणात आहेतचं, आणि या गाठीचं ओझं आम्हीं दररोज अभिमानाने वागवत असतो, पण आम्ही हे मान्य करत नाही की माझ्या मनात गाठ आहे, आणि तरी ही आम्हां प्रत्येकालाचं वाटतं कि माझं मन साफ आहे…
तनातली गाठ दिसते, पण मनातली गाठ आम्ही दाखवत नाही. पण लक्षात ठेवा तनात असलेली गाठ जेवढा त्रास देत नाही ना तेवढा त्रास मनातली गाठ आपल्याला देत असते.. आपण किती ही प्रयत्न केला त्या गाठी लपवण्याचा, तरी त्या मनातल्या गाठी इतरांना आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातुन आपल्या वागण्यातून दिसतात…
या गाठीचं ओझं आम्ही का वागवतो आहे ?
आणि किती दिवस वागवणार आहोत ?
खरंच हे गाठीचं ओझं गरजेचं आहे का ?
याचा विचार आम्ही कधी तरी करणार आहोत का ?
मित्रांनो न बऱ्या होणाऱ्या कॅन्सरच्या शरीरातल्या गाठी पेक्षा ही भयानक आहेत या गाठी आणि त्या देखील आपल्या मनात आहेत. विचार करा एक वेळ तनातल्या गाठीवर उपाय होईल ही, पण मनातल्या गाठीचं काय ? या गाठी मुळे जर आपण माणसांच्या मनांत बसू शकत नाही मग ईश्वरतर लांबच…मग काय उपयोग आहे आपल्या नित्य देव पूजा पाठाचा, प्रार्थनेचा, देव दर्शनाचा…
हा जन्म परत नाही हे आम्हीं परत परत का विसरतो ? आज कोरोना सारख्या आजाराने आम्हांला खूप काही शिकवलं आहे..श्रीमंतांची श्रीमंती देखील आज त्यांना उपयोगी पडत नाही… मी मी म्हणनारे श्रीमंत देखील झोपडीतल्या गरीबा सारखे घरात बसून आहेत..ज्या गोष्टींचा आम्हला अभिमान होता गर्व होता किंवा आहे त्या गोष्टी या प्रतिकूल परिस्थतीत मध्ये आपल्या काय उपयोगाच्या आहेत.. शेवटी माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो आहे ना…
विसरू नका शेवटी ईश्वरचं सर्वश्रेष्ठ आहे, निसर्गचं सर्वश्रेष्ठ आहे, हे आपल्याला मान्यचं करावं लागेल..आज आपण जे काही आणि जसे काही आहोत, भले त्यामध्ये आपलं कर्तृत्व आहे हुशारी आहे, जिद्द आहे, पण म्हणून त्या गोष्टींचा गर्व, अभिमान, मी पणा करू नका…आपल्या प्रत्येकांचंच जीवन हे निसर्गाशी सुसंगत आहे आणि असायला हवं, ना कि निसर्गावर मात करणार असावं..आपण सगळेच एक दुसऱ्यांशी आणि एक दुसऱ्यांसाठी पूरक आहोत..आपण सगळेच एक मेकांच्या आधाराशिवाय ना पुढे जाऊ शकत ना मोठे होऊ शकत ना जगू शकत..कारण हे विश्वची माझे घर आहे…मग का या गाठी मनात ठेवायच्या ?
चला तर मग, या वर एकच साधा आणि सरळ उपाय करू या काही लोकांना माफ करू या तर काही लोकांना काही गोष्टी विसरून जाउया..
आपण सगळे सांसारिक आहोत त्यामुळे आपल्याला संत तर नाही होता येणार, पण संतांनी सांगितलेल्या मार्गाने मात्र नक्की जाता येउ शकतं …
मित्रांनो आपण आज तर आहोत पण उद्या असू कि नाही ते आपल्या पैकी कोणालाच माहित नाही..तेव्हा मित्रांनो आयुष्य खूप साधं, सोपं आणि सरळ आहे..
फक्त मनातल्या गाठी काढू या… आणि सगळे मिळून एकच गाणं गाऊ या…
माणसाने माणसाशी माणसासम वागणे,
हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे.
धन्यवाद…..
जयहिंद
श्री. हनुमंत मांढरे,
९८९२७८२३१७
खुप छान लिहिले आहे ,आवडले मला
Thank you 🙂