संतवीर बंडातात्या कराडकर

स्वामी विवेकानंदांच्या वाणीमध्ये जितकं बळ होतं त्यापेक्षा कैकपटीने सामर्थ्य त्यांच्या पायांमध्ये होतं. अखंड भारत पिंजून काढल्यानंतर प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. त्याप्रमाणेच पुजनीय तात्यांनी वारी हा जीवनाचा मुलमंत्रच बनवला आहे. शौर्याची उपासना करण्यासाठी कधी पु. तात्यांनी आग्रा ते राजगड ही वारी केली, त्याग आणि बलिदानाची उपासना करण्यासाठी तात्यांनी धर्मवीरगड ते तुळापूर ही वारी केली. छ.संभाजीराजांच्या त्यागाचे स्मरण ठेवून चालताना तात्यांबरोबर असलेले हजारो आधुनिक मावळे अनवाणीच होते आणि मुक्कामाच्या ठिकाणी चटणी-भाकर खाऊन इतिहासाचे स्मरण करत होते. व्यसनामुळे समाजाची आणि लाखो कुटुंबाची होळी रोखण्यासाठी तात्यांनी शेकडो गावांमध्ये व्यसनमुक्तीची वारी सुरू केली. अनेक गावातील माता-माऊल्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त युवक संघाने गावोगावी दारूबंदी केली.

देशभक्ती देवभक्ती उरामध्ये भरून असलेला तरुणच देशाचा उद्धार करू शकतो या भावनेने पु.तात्यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमी मध्ये प्रत्येक गडकोटाच्या पायथ्याशी युवकांच्या संस्काराची वारी सुरू केली. या संस्कार शिबिरांमध्ये हजारो युवक गेल्या 20 वर्षांपासून उज्वल भविष्यासाठी संस्काराची जन्मभर पुरणारी शिदोरी बांधून घेत आहेत.
“होईन भिकारी ! पंढरीचा वारकरी!” या जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाला आदर्श मानून तात्यांनी पंढरीच्या विठुरायाची वारी तब्बल ५० वर्षे सांभाळली. हातामध्ये वारकरी पताका, गळ्यामध्ये टाळ, कमरेला उपरणे, चेहऱ्यावर वारकऱ्याची मुद्रा आणि मुखामध्ये ज्ञानोबा-तुकोबांचे नाम घेऊन वेगाने चालणाऱ्या पु.तात्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा असतो. आपल्या कार्यकर्तृत्वाचा कोणताही अभिमान न बाळगता हजारो वैष्णवांचा मेळा करून हरी भजनाचा गजर करणारे तात्या आधुनिक सत्पुरुष शोधतात.

“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास! कठीण वज्रास भेदू ऐसे!” या संत वचनाप्रमाणे खांद्यावर पताका घेणारा वारकरी नाठाळांना त्याच पताकेच्या उलट्या काठीने वठणीवर आणू शकतो हे पु.तात्यांनी महाराष्ट्राला वेळोवेळी दाखवून दिले आहे. ज्यावेळी बारावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुकोबारायांचा अपमान झाला तेव्हा शिक्षण मंडळाला धारेवर धरणारे पु.तात्याच होते! जेव्हा तुकोबारायांची तपोभूमी असलेला भामचंद्र डोंगर गिळून ‘डाऊ केमिकल कंपनी’ या राक्षसाचा जन्म होणार होता, तेव्हा सबंध कंपनी जाळून भस्मसात करणारे अग्निपुरुष तात्याच होते! पु.डोंगरे महाराज म्हणायचे,”गाईच्या रक्तानं माखलेल्या मातीमध्ये समाज सुखानं नांदू शकत नाही!” म्हणूनच संभाजीनगर येथे ‘गोवंश हत्याबंदी निर्धार’ मेळाव्यामध्ये १०,००० वारकऱ्यांबरोबर गौरक्षणाचा मूलमंत्र देणारे गोभक्त पु.तात्याच होते! महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गोरक्षणासाठी भर रात्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या महापूजेपासून रोखणारे वीर वैष्णव तात्याच होते! पंढरपुरातील मंदिर समितीचे अध्यक्ष स्वतः वारकरी असावे हा आग्रह धरणारे सत्याग्रही पु.तात्याच होते! सरकारकडून दिला जाणारा पद्मश्री हा गौरव पुरस्कार लीलया त्यागणारे पु. तात्याच होते.

देशभरामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्रांमध्ये हजारो वारकऱ्यांना त्या-त्या राज्यांमध्ये नेऊन वारकरी संप्रदायाची भजननिष्ठा, साधननिष्ठा, संत ग्रंथांची अक्षर उपासना सोशल मीडियाचा आधार न घेता  दुरदुरपर्यंत पोहोचवणारे आधुनिक वारकरी म्हणजे पु.तात्याच आहेत!
लाखो रुपयांचा चुराडा करून नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी स्व.राजीवजी दीक्षित गुरुकुल उभारून देशभक्ती, देवभक्ती, स्वावलंबनाचे, व्यवसायाचे धडे देणारे क्रांतदर्शी  समाजशिक्षक म्हणजे पु.तात्या !

अन्यायाचा विरोध आणि प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करण्याचं तळपतं साधन म्हणजे लेखणी ! लोकमान्यांनी लेखणीच्या जोरावर सरकारवर वाभाडे काढले. म.फुलेंनी लेखणीच्या जोरावर सरकारचे डोके ठिकाणावर आणले. त्याच पद्धतीने आपल्या अभ्यासपूर्ण प्रखर लेखांनी समाजाला वेळोवेळी योग्य दिशा देणारे द्रष्टे व्यक्तिमत्व म्हणजे पु. बंडातात्या !
‘इतिहासाचा आंधळा अभिमान हा शाप आहे पण इतिहासाचे घोर अज्ञान हा घोर अपराध आहे’ या विचारसरणीला अनुसरून जन्मभर छ.शिवरायांचे चरित्र अनेक शिबिरातून युवकांच्या हृदयात उतरवणारे पंढरीचे वारकरी आणि शिवबांचे धारकरी म्हणजे पु.तात्या !

‘मेरा मन स्वदेशी मेरा तन स्वदेशी! मरनेके बाद मेरा कफनभी स्वदेशी!’असं म्हणून स्वदेशीचा प्रचार,प्रसार करणारे स्वदेशभक्त म्हणजे पु.तात्या !
वारकरी संप्रदायातील त्याग, संप्रदायनिष्ठा आणि चारित्र्यसंपन्न जीवनाचे मूर्तीमंत प्रतीक, व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक,युवक आणि युवती संस्कार सोहळ्यातून हजारो युवकांना प्रेरणा देणारे स्फूर्तिस्थान, गोरक्षा,गोसेवा आयुर्वेद,सेंद्रिय,शेती,भ्रष्टाचार निर्मूलन,अनेक धर्मरक्षक आंदोलने, गावोगावी दारूबंदी अशा राष्ट्रकार्यांनी भारलेले तेजस्वी जीवन म्हणजे पु.बंडातात्या !
“नाही भीडभाड तुका म्हणे सानाथोर!” या उक्तीप्रमाणे जगणारे संतवीर, युवकमित्र, प्रखर देशभक्त,निर्भीड निस्वार्थी स्वाभिमानी जीवन आणि अखंड वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान म्हणजे पु.बंडा तात्या! इतिहासाचे गाढे अभ्यासक, भागवत, महाभारत, रामायण, कपिलगीता प्रवक्ते, अशा असंख्य पैलूंनी दीपस्तंभाप्रमाणे ओजस्वी जीवन म्हणजे पु.तात्या !
समाजहिताची आंदोलने मोर्चे यामध्ये खंबीरपणे समाजहीताची बाजू घेणाऱ्या पु.तात्यांच्या आयुष्याचा अध्यात्मिक आणि सामर्थ्यशाली पाया वा. संप्रदायाच्या अध्वर्यूंच्या संत्संगतीने बनला आहे. कडाक्याच्या थंडीत अलकनंदेच्या काठावर अनुष्ठानपूर्वक परमभागवत डोंगरेजी महाराज यांचे भागवत श्रवण, ज्ञानेश्वरी उपासक पु. धुंडा महाराज देगलूरकर, गाथाभाष्यकार पु.शंकर महाराज खंदारकर, ब्रह्मीभुत विहेकर गुरुजी, गाथामूर्ती भोसरीकर माऊली,थोर विद्वान एकनाथ महाराज देगलूरकर,पु.भगवान मामा कराडकर अशा अनेक महात्म्यांचा संगतीने आकाराला आलेले निर्भीड,निस्पृह,निर्भीक अशा पद्धतीचं जीवन आपल्याला पु.तात्यांकडे पाहिल्यावर नक्कीच दिसेल!

असं निस्वार्थी जीवन ज्या महात्म्याचं आहे व कोणत्याही प्रलोभनाला कधीच बळी न पडलेले समर्थ जीवन व वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेच्या उपासनेच्या नीष्ठेशी आजपर्यंत कधीही तडजोड न केलेलं हे असामान्य जीवन! आपला वारसा कोणीतरी पुढे चालवावा असा विचार स्वप्नातही ज्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही, गेल्या पन्नास वर्षांपासून अवघा महाराष्ट्र हजारो वेळा कीर्तनाच्या निमित्ताने भ्रमण करूनही कीर्तनानंतर पाकिटाचा आकार कधीच न पाहणारे आणि निस्पृहतेची प्रेरणा संप्रदायातील युवा कीर्तनकार यांना देणारे पु.तात्या, सरकारच्या विरोधात आणि गत दीड वर्षाच्या परिस्थितीने प्रभावित असलेल्या वर्तमान समाजमनाच्या विरोधात दगड टाकून अंगावर चिखल का उडवून घेतील? त्यांना प्रसिद्धीची गरज वाटतेय का? सरकारकडून कोणता पद हवं आहे का? संप्रदायाचे नेतृत्व करावयाचे आहे का? किंवा आपल्या संस्थेला सरकारकडून अनुदान घ्यायचे आहे का? वर सांगितलेल्या बाबींबद्दल, ज्यांनी तात्यांचे जीवन जवळून पाहिलेले आहे त्यांच्या मनामध्ये तिन्ही कालात त्याविषयी कधीही संदेह निर्माण करणार नाहीत ! याचे कारण “निस्पृहस्य तृणं जगत् !”या सूत्र वचनामध्ये सापडते ! वारकरी संप्रदायाचा पाईक व संतविचारांचा वाहक आणि श्रीगुरु, संतवीर बंडा महाराज कराडकर यांच्याकडून प्रेरणा घेणार्‍या माझ्यासारख्या वारकऱ्याला विनम्रपणे हे सांगावे वाटतं “सोशल मिडिया वाचाळवीरांनो तात्यांच्या विषयी व्यक्त होताना वाणीला थोडा आवर घाला!”

त्यामुळेच आपला पुण्यक्षय व वाचिकपाप यापासून बचाव होण्याची शक्यता आहे! हिमालयाची अध्यात्मउंची,भीष्मांची सत्यता, शुकांचे चारित्र्य, गंगेची निर्मलता ज्ञानराजांची कृपालुता, तुकोबारायांचे वैराग्य, छ.संभाजीराजांचा धर्माभिमान, भगतसिंगांची देशभक्ती व सावरकरांची विज्ञाननिष्ठा या सर्व दैवी गुणांचे दर्शन वर्तमानात एकाच महापुरुषाचा दर्शनाने होते; त्या सत्पुरुषाचे नाव म्हणजे संतवीर श्रीगुरु बंडातात्या कराडकर !! म्हणून समारोपाला एकच सांगेन संत ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचे अनुसरण करणे हेच आम्हा युवा वारकऱ्यांचे कर्तव्य !! त्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न उरला कुठे ?
“तेणेची पंथे चालो जाता l न पडे गुंता कोठे काही ll

(कार्यकर्ता, व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र )
रामकृष्णहरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: