आणि विठ्ठल हसला…

#नि:शब्द…

आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – ८० वर्षाचे बाबा हातात दोन पिशव्या घेऊन कढीपत्ता विकत होते. एव्हढ्या वयात थकलेले शरीर असताना सुद्धा काम करावे लागते हे पाहून मला जरा वाईट वाटले आणि मी त्यांना आवाज दिला. म्हटलं बाबा समोरून या. बाबा गेट उघडून आत आले.

थकलेले शरीर, फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकेलेले नाहीत. तसही मला जरा शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं बाबांच अर्थकारण थोडंस समजून घेवूया. बाबाला विचारले बाबा तुम्ही घरदार फिरून फिरून ही कढीपत्त्याची गड्डी तुम्ही एक रुपयाला विकत आहात काय पुरते तुम्हाला ? आणि हीच गड्डी तर भाजी मार्केट मध्ये ५ रुपयाला मिळते. बाबा म्हणाले बाई परिस्थिती लय खराब हाय. सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली. शेतीच पार वाटूळ झाल. लय खराब हालत हाय. पहाटच्या ७ वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलो, म्हणल 3 रुपया ला एक जुडी विकीन पण अर्धा घंटा फिरून बी एक जुडी विकल्या नाही गेली. मी घरून दोन थैल्यात ५० जुड्या घेऊन निघलो. म्हणल ५० जुड्याचे 3 रुपये जुडीन १५० रुपये येईन, जाण्या येण्याला लागतेत ५० रुपये, शिल्लक राहतीन १०० रुपये तेव्हढाच घरखर्चाला कामी येईन. पण कशाच काय अर्धा घंटा फिरलो एक जुडी नाही विकल्या गेली. म्हणल १०० रुपये भेटण त राहील लांब पण जाण्यायेण्याच्या ५० रुपयाच नुकसान होतय कानू . म्हणून नाही काही भेटलं काही तरी चालन पण नुकसान नको म्हणून विकतुया रुपयाला जुडी.

अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावल्या.

कठीण अवस्था आहे बळीराजाची.

बाबांना म्हटलं बसा मी पाणी आणते तुम्हाला. थोड्या वेळात मी पाणी आणि चहा घेऊन आले. थकलेल्या बाबांना तेव्हढंच बर वाटलं. आज कुठही देवस्थानाला जा गावाच्या कमानीत प्रवेश केला की कुणीतरी माणूस ग्रामपंचायत / नगरपालिकाची पावती पुस्तक हातात घेऊन लगेच गाडी थांबवतो. २०/४० रुपयाच्या पावतीशिवाय प्रवेश नाही. थोडे पुढे गेला की पार्किंग ची पावती परत वाट पहात असतेच. असो, देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी देव मात्र संघर्ष करत असा असा दारोदार फिरत असतो. दिवस रात्र मेहनत करायची आणि नशीब जे देईल ते स्वीकारायचे याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नसते. बोलता बोलता बाबांनी सांगितले की ते १२ वेळा पंढरपूर वारीला जाऊन आलेत. चहा पाणी पिऊन झाल म्हटलं बाबाला थोडे पैसे द्यावे म्हणून एक नोट त्यांच्या हातावर ठेवली. बाबा काही घेईना. म्हणल बाबा मला तुमच्या लेकीसारखी समजा आणि हे एव्हढे पैसे घ्या. डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेने एक हास्य उमलले.

त्यांचे हास्य पाहून असे वाटले की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेव्हढा प्रसन्न झाला नसेल तेव्हढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल.

बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली.

“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”

वारसा प्रसारक मंडळी पेजवरून साभार

2 thoughts on “आणि विठ्ठल हसला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: