ओढ्याकाठचे_गूढ

अख्ख्या गावात त्या प्रकाराची चर्चा सुरू होती.
तो प्रकारही तसा विचित्रच होता..

एखाद्या नामवंत घराण्यातील नव्या नवलाईच्या सुनेने चक्क ओढ्याकाठी राहायला जावे म्हणजे काय ?

भला थोरला वाडा सोडून ती खळखळत्या ओढ्याकाठी झोपडी बांधून राहत होती.

रात्रीबेरात्रीच नव्हे तर दिवसाही त्या झोपडीतून चित्रविचित्र आवाज येत असत.

भानामती, चेटूक, जारणमारण…नेमकं कशाला बळी पडली असावी ती ?

सगळ्या गावाला तो प्रश्न पडला होता.
कधी घडलं असेल हे ?

माहेरून येतांना तिला झपाटले असेल कोणी ?

की एखादा अतृप्त आत्मा तिला ताब्यात घेऊन बसला असेल ?

तिच्याकडून काय काय करून घेतलं जात असेल ?.

तिचं ओढ्याकाठी जाणं वाढलं तेव्हाच सासरच्या लोकांनी लक्ष घालायला हवं होतं, म्हणजे तो प्रकार वाढला नसता यावर तिथल्या बहुतेकांचे एकमत होते.

आता तर हद्दच झाली…

गावातल्या न्हात्याधुत्या तीन पोरी एकदा तिकडे गेल्या. तिला भेटल्या.

तेव्हापासून वेळी-अवेळी त्या ओढ्याकडे पळतात.
केव्हातरी परततात..

एकमेकांशी कानात काहीतरी बोलतात..

आणि मग खी खी करून खिदळत बसतात…कित्येक तास!

अंगारे, धुपारे, भगत सर्व करून झाले.

त्या माणसात परतायला तयार नाहीत.

त्या बाईची मोहिनीच जबर होती..

हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस संपूर्ण गाव तिच्या कह्यात जाईल. बेचिराख होईल सारं !

गाव मनातल्या मनात कुढत होतं. पण मार्ग सापडत नव्हता..

अशात वैशू शहरातून गावात आली होती. 18 वर्षाची तरुणी..

ओढ्याकडे जाऊ नको असं सर्वांनी तिला बजावलं.

पण परिणाम उलटाच झाला.

तिथं जावं असं तिला तीव्रतेने वाटू लागले.
एका सायंकाळी सर्वांचा डोळा चुकवून ती निघाली.
अंदाज घेत…कोणी पाहत तर नाही ना ?

त्या झोपडीजवळ पोहचताच तिचा जीव गोळा झाला.
हे साहस अंगलट तर येणार नाही ? परत जावं का…पण इथवर आलोच आहोत तर बघून जावं..!
ती पुढे सरकली.

झोपडीतून खिदळण्याचे आवाज येत होते.
चार आवाज…ते मानवी होते.
पाचवा मात्र अनोळखी होता.
त्या चौघींचा साथीदार !

वैशूच्या अंगावर काटा उभा राहिला.
ती दबक्या पावलांनी झोपडीच्या दाराजवळ गेली. ते नुसतंच लोटलेले होते. तिने दार ढकललं.
कितीही प्रयत्न केला तरी त्याचा आवाज झालाच..
तिनं स्पष्ट बघितलं.

दाराकडे पाठ करून त्या चौघी पाय मोकळे सोडून बसल्या होत्या..
त्या अगम्य आवाजाशी संवाद साधत…
दाराचा आवाज ऐकून चौघीनी एकदम माना वळवल्या..
काय पाहिजे तुला ? सुनबाई गरजली.
वैशूच्या गळ्यातून आवाज बाहेर येईना..तिने अवसान आणले.

नाही..म्हणजे तुम्ही…तुम्ही हे काय चालवलेत ?
कुठे काय चालवले ? सूनबाईचा आवाज धारदार होत गेला.

नाही…तसं नाही..म्हणजे गावात काय बोलतात ? वैशू रडकुंडीला आली.
कोण काय बोलतंय…म्हणत सूनबाईने त्यांच्यातल्या एकीला नजरेने खुणावले.
ती तिरमिरीत उठली..वैशूचे बखोट धरून तिला ओढतच झोपडीत घेऊन गेली. प्रतिकाराचेही त्राण नसलेली वैशू जमिनीला पाय घासत ओढली जात राहिली.
त्या चौघींच्या कोंडाळ्यात ती भेदरून बसली होती.
हे बघ..इथे काय चाललंय ते कोणाला सांगणार नाहीस…वचन दे..तरच परत जाशील नाहीतर आयुष्यभर इथेच अडकवून ठेवू..सुनबाई ठसक्यात बोलली.
हो..म्हणण्याशिवाय वैशूकडे काही पर्याय नव्हता.
त्या चौघी एकदम खिंकाळल्या..

हे बघ…म्हणत एकीने तिच्यासमोर ते धरले.
वैशूच्या तोंडावर अविश्वासाचे भाव पसरले..अस्स आहे तर !
माहेरी गेले नि भावाने हा भारीतला स्मार्टफोन घेऊन दिला. तुमच्या त्या गाढव्या गावात धड रेंज मिळेना..मग नेट तर लांबच..या ओढ्याकाठी बघ कशी फुल्ल रेंज मिळतेय आणि नेट तर बघ…फोर जी ना बाई ! मग इथे येऊन नको राहू तर काय करू ? सुनबाई म्हणाली.
वैशू कपडे झटकत उभी राहिली.
मी जाऊ आता ? तिने विचारले.

जा..पण ते वचन लक्षात ठेव !

दाराजवळ पोहचताच वैशू क्षणभर थबकली. मागे वळली.
वहिनी, एक विचारू ?

आता काय राहिलं ? सुनबाई त्राग्याने बोलली.

मी पण इथे रोज आले तर चालेल का ?.. इति वैशू.

त्या चेटकीणींच्या खदखदाटाने तो आसमंत हादरला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: