सोन्याची कुऱ्हाड
वैशाली उभं असलेल्या जमिनीचे, जगन्नाथ शेट्टींना पत्र ✉️
‘सोन्याची कुऱ्हाड’

अण्णा, पहिल्यांदा तुला बघितलं आणि तुझे मनसुबे ऐकले, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. तसं बघायला गेलं तर मी पहिल्यापासूनच नशीबवान आणि खुश असणारी. आजूबाजूला गर्द झाडं, जवळून वाहणारी नदी पण तरी कधी पुराचा त्रास नाही, कोपऱ्यावर डेक्कन जिमखाना आणि समोर तर फर्ग्युसन कॉलेज, त्यात त्यांच्या होस्टेलवर साक्षात सावरकर राहून गेलेले, मी या सोनेरी वातावरणातच वाढले. तुमच्यात कसं सोन्याचा चमचा जन्म घेऊन आलेलं बाळ असतं तशीच मी सोन्याची कुऱ्हाड घेऊन जन्मलेली जमीन! अतिशय भारी वाटायचं मला, इन फॅक्ट माज होता मला… शेवटी पुण्याचंच पाणी मुरतं ना आमच्यात.
देश स्वतंत्र होऊन एक दोन वर्ष झाली असतील. अचानक मला तुझं दर्शन होऊ लागलं. अंगांनी बारीक, वयानी लहान असा तू, तुझ्याकडे लक्ष देण्यासारखं काही नव्हतं. पण माझ्यावर तू मद्रास हेल्थ होम नावाचं हॉटेल आणि माझ्याच शेजारी तू मद्रास कॅफे सारखं काही तरी सुरू करणार हे ऐकलं. अतिशय डोक्यात गेलं होतं. नॉन पुणेकरांनी येऊन पुण्यात खायचं काही सुरू करणं हा प्रॉब्लेम नव्हता पण साबुदाणा खिचडी खाणाऱ्या आमच्या लोकांना तुझा डोसा कसा वाटेल हा प्रश्न होता. कोण कुठचा कर्नाटकचा मुलगा येतो आणि मद्रासी हॉटेल काढतो?? वाईट वाटत होतं… मद्रास कॅफे होत असलेल्या माझ्या शेजार जमिनीशी माझं दुःख शेअर प्रयत्न केला. पण आमचं तुमच्या डोळ्यांसारखं नातं होतं. दोन बहिणी शेजारी, भेट नाही कायमची.
काही वर्षे लोटली. विद्यार्थी पुणेकर कॅफे मद्रास आणि मद्रास हेल्थ होम मध्ये इडली डोसा खाऊ लागले होते. ते तुला पैसे देताना बघितलं की या सगळ्या यशामागे फक्त मीच कारणीभूत आहे असं माझं ठाम मत होतं. हे चाललाय कारण माझं लोकेशन. 18-18 तास तू घेत असलेल्या कष्टांकडे मी सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. तू मात्र तुझे कष्ट आणि अभ्यास जोमाने सुरू ठेवलास. बिझिनेस माईंड डेव्हलप केलंस आणि एक दिवस आम्हा दोघींचं तू बारसं केलंस. ती रुपाली आणि मी वैशाली. खरं सांगू? ते नाव मला सेकंदात क्लिक झालं होतं. काहीतरी जादुई घडणार असा फील आला.

ती जादू तुझी होती हे मनोमन पटलं. मला तू सजवलं होतंस, आतल्या बाजूस मऊ मऊ खुर्च्या आल्या, बाहेर झाडं आली, इतकंच काय मासे पण ठेवलेस माझ्यावर. कमीत कमी मेकअप मध्ये मी जास्तीत जास्त नटले होते. पुणेकरांची नॉन स्टॉप गर्दी सुरू झाली. आता तर लाईन लागली होती. मला स्पर्श झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य मला समाधान देऊ लागलं.
चोखंदळ पुणेकरांच्या गप्पा मी ऐकू लागले. साहित्यिक, विद्यार्थी, पेन्शनर्स, अभिनेते कुठून कुठून लोकं माझ्याकडे खेचले जाऊ लागले. पुणेकरांच्या तोंडून रुपलीची कॉफी जास्त भारी आहे असं ऐकू यायचं. कधी हेवा नाहीं वाटला बहिणीचा, कौतुकच असायचं. तिला बघायची इच्छा होत असे, मग हावरटपणे लोकांच्या गप्पा ऐकत असे. रात्री सगळं शांत झाल्यावर वॉचमनकडून मला आमची तिसरी बहीण आल्याचं कळलं… आम्रपाली! अपार कौतुक वाटलं तुझं.
पूर्वी नशीबवान होते आणि ते नशीब ओसंडून वाहू लागलं होतं. दिवसाचे 20 तास मला तुझी आणि तुझेच संस्कार असलेल्या अनेक लोकांची साथ होती. कधीच एकटी नाही पडले. रोज अभ्यंगस्नान होणारी मी एकटीच असेन. राजेशाही थाट एकदम. बदललेल्या काळाप्रमाणे तू खायचा गोष्टी वाढवल्यास पण कधी अकारण बदल नाही केलेस. ह्याचा रिझल्ट सगळ्यांसमोर राहिला. माझ्या कित्येक शेजारांचे धंदे बुडाले, कित्येकांनी जुनी वास्तू तोडून नवी उभारली. पण तू ती वेळ आम्हा तिन्ही बहिणींवर कधीच आणून दिली नाहीस. आपल्या एफ सी रोडवरच्या जमिनींनी वास्तू इतिहासजमा होताना बघितल्या पण तू मला इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंदवलंस.
गेली पन्नास वर्षे रोज लोकं लाईन लावून माझ्या दर्शनासाठी येतात. लहान बाळाला माझ्या मांडीत ठेवून डोसा भरवलेले कित्येक पुणेकर मी बघितलेले आहेत. मला भेटायला येणं हा संपूर्ण शहराच्या संस्कृतीचाच भाग झालाय रे.
परदेशात किंवा परगावी राहणारा पुणेकर सुट्टीसाठी पुण्यात येतो तेव्हा तो माझं दर्शन घेतल्यावर ‘फायनली इन पुणे’, ‘घरी पोचलो’ अशा स्टोरीज टाकतो. कोपऱ्यावर असलेला जमिनीचा तुकडा मी, आणि मला देवत्व मिळालंय केवळ तुझ्यामुळे रे जगन्नाथ!
काल तु असा शांत, काहीही हालचाल न करता, लोकांची विचारपूस न करता निपचित पडलेला बघून काहीच सुधरलं नाही रे. लोकं म्हणत होती अंतिमदर्शन पण त्याआधीच मी तुला माझ्यात सामावून घेतलंय रे. घट्ट पकडून ठेवलंय.तू कधीच इथून जाणार नाहीस…सांबार थोडा बिघडला तर डोळे वटारून बघशीलच की तुझ्या लेकरांकडे. कारण तू आहेसच आपल्या कॉफी सारखा सदैव फ्रेश आणि कडक!
सदैव तुझीच…
कोपऱ्यावरची जमीन!
लेखक – स्वागत पाटणकर, पुणे
काय सुंदर लिहलंय.. खरचं!
डोळे पाणावले. अप्रतिमच!
Thank you 🙂