याला जीवन ऐसे नाव..!

जस जसं वय वाढते आणि मी माझ्या आयुष्याकडे जेंव्हा वळुन बघतो, तेंव्हा तेंव्हा विचार करतो की मी काय काय केलं! काय करायचं होतं, काय ठरवलं होतं, काय झालो, काय केलं अणि काय करायचं राहिलंय. स्वप्नं काय होती अणि प्रत्यक्षात काय हा पण विचार येतो.

कोणे एके काळी ध्येय नसल्यासारखे हिंडत होतो आणि कोणे एके काळी ध्येय वेडा होतो. कोणे एके काळी रिकामा भटकत होतो अणि नंतर इतका व्यस्त झालो की स्वतःकडेहि लक्ष दिले नाही. आपल्या सगळ्यांचे असेच असेल ना! माझ्याप्रमाणे तुम्हीपण हा विचार केला की जाणवत असेल की आपण आपलं आयुष्य काय इमॅजिन केलं होतं आणि आत्ता कुठे आहोत! कधीतरी आश्चर्यही वाटत असेल आणि कधितरी हसू सुद्धा येत असेल!!

आपल्यापैकी बरेच जण अनेक प्रसंगातून गेले असतिल. काही चांगले तर काही एकदम वाईट. चांगल्या गोष्टी जेंव्हा घडतात तेंव्हा हा काळ जाऊच नये असं वाटतं. पण तो इतका लवकर निघून जातो की अस वाटत आपण त्या सुखाचा उपभोग घेतला नाही. वाईट काल मात्र जर दुर्दैवाने आला तर जाता जात नाही. पण तो त्रास, त्या वेदना, ते हाल सगळे सहन करावं लागतं. कधीकधी आश्चर्य वाटतं की एवढे हाल आप्तेष्टांना आपण तोंड दिलयं! आपल्या आयुष्यात एवढी दुःखं आली होती ह्याच आपल्यालाच नवल वाटतं!! त्याहून भारी वाटतं म्हणजे एवढे सोसून सुद्धा मी तरलो!!

आयुष्यात जे धडे शिकायला मिळतात त्याला तर जवाब नही. फक्त तो एक धडा आहे म्हणुन कळले पाहिजे. एक गंमत बघितली का! ज्या वेळा आपण अडचणीत असतो, नेमक्या त्याचवेळी आणखीन अडचणी निर्माण होतात. आपण ज्यावेळी दुःखात असतो, त्याचवेळी आणखीन काही ना काही कारणाने दुःखात भर पडते. पण सुखाच्या बाबतीत असं फार कमी वेळा होतं किंवा होतच नाही. बघा ना! म्हणजे तुम्ही आधीच सुखात आहात अणि त्यावर आणखीन सुखाची बरसात होतीये, अस फारसं होत नाही.
कदाचित होत असेल! पण दोन लागोपाठच्या दुःखा मधे जसा भेद कळतो तसा दोन पाठोपाठ येणार्‍या सुखाच्या बाबतीत करता येत नसावा अथवा त्या आनंदाच्या क्षणी तेवढे तारतम्य नसावे!!

मला खरच कधीकधी आयुष्याबद्दल फार आश्चर्य, कुतूहल, भीती, उत्सुकता वगैरे सर्व वाटत.

बघा ना! अंध लोकं त्यांच आयुष्य कसं काढत असतिल! त्यांच्या अडचणीवर ते कसे मात करत असतिल! जे अपंग आहेत ते आपल्या अडचणीवर कसे मात करत आहेत! एक नॉर्मल माणूस अशा लोकांचा विचार कधी करतो का! मला शंका आहे की कोणी विचार करत असेल. अशा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल, हे तर कोडं आहे. नॉर्मल लोकांच्या मनात फक्त दया (सिंपथी) आहे का सह-संवेदना (एंपथी) पण आहे.

नॉर्मल लोकांच्या बाबतीत आपण म्हणतो की, कठीण काळ तुमची परीक्षा बघत असतो. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलात की सोन्यासारखी झळाळी येईल. ह्या परीक्षेच्या काळात तुमची खरी क्षमता तुम्हाला कळते. पण अंध, अपंग ह्या लोकांकरता तर रोजचं जीवन म्हणजे एक कठीण परीक्षा नसेल का? असणारच! मग ह्याच उत्तर काय. असं काही बोललो की काही जण अंतर्मुख होतात, काही खांदे उडवतात तर काहींना हे नशिबाचे भोग वाटतात.

आपण आपला प्रत्येक दिवस छान घडवतो. मी मुद्दाम ‘घडवतो’ हा शब्द वापरला. कारण दिवस कसा जाणार हे आपल्या हातात आहे. जर सुरवात आपण सकारात्मकतेने केली तर तो नक्की चांगला होईल. पण दिवसाची सुरुवात जर आळस, नकारात्मकता, चिडचिड किंवा वैतागून केली तर दिवस वाया गेला म्हणून समजा. त्यामुळे पूर्ण दिवसभर आपण काय करणार हे आपल्या मनःस्थितीवर अवलंबून आहे.
म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने, एकदम सकारात्मक केली तर दिवस छान जाईल ना?

तुम्ही किती जगला हे महत्वाचे नाही तर तुम्ही कसे जगलात हे महत्वाचे. जिंदगी सिर्फ लंबी नही, बडी भी होनी चाहिये, हे अगदी बरोबर आहे.

मुळात आयुष्य लहान का मोठं (वर्षांमधे) हे कुणाच्याही हातात नाही. काही माणसं शंभर वर्षे जगतात तर काही अल्पायुषी असतात. दुसरे, आयुष्याचा दर्जा (क्वालिटी) आपल्या हातात जरी असला तरी केंव्हा निसटून जाईल हे सांगता येत नाही. म्हणजे काय तर, हार्ट अ‍ॅटॅक, पॅरॅलिसिस, डायबेटिस हे आपण कितीही काळजी घेतली तरी होऊ शकतात. जरुरी नाही की होतातच पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात होण्याची शक्यता असते. असे काही झाले तर नाही म्हटलं तरी क्वालिटी थोडीफार मागे पुढे होते. म्हणून आयुष्य कितीही असुदे, त्याचे धक्के खात आपण खंबीर पणे उभे रहायचे. आयुष्याने कितीही जोरात पंच करू दे, आपण कणखर पणे उभं राहून त्याला उलटं पंच करण्यात खरी मजा आहे ना?

ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचं आहे अणि आपण आत्ता कुठे आहोत.

मला असं वाटतं की माणसाचे वय काहीही असुदे, त्याला काहीतरी करायची इच्छाशक्ती पाहिजे. भले त्यातून आर्थिक मिळकत काही होणार नसेल अथवा त्यात मनोरंजन नसेल, पण काहीतरी कार्य करायची उर्मी जागृत असली पाहिजे.

काही नाही केलं, तर सगळे कोसळायला वेळ लागणार नाही. ‘वेळ’ आल्यावर सगळं संपणारच आहे पण त्या आधी आपल्या कृतीने छोटासा ठसा उमटवून जाऊ. ‘मारावे परी कीर्ती रुपी उरावे’ हा जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करायचा.

प्रयत्न करायचा कारण जी संधी आत्ता मिळाली आहे ती परत मिळेलच असं नाही. शिवाय वेळ महत्वाचा. तो तर फार थोडा आहे. तो परत आपल्याला अनुकूल असेल असे नाही. मग नंतर पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही. थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे की, प्रयत्न करून संधी निर्माण करू. अणि वेळ आपल्यावर हुकुमत गाजवेल ही वेळ आणू न देता, आपल्यालाच वेळेवर हुकुमत गाजवता येईल ना?

कितीही व्यस्त असूदे, आपण आपले आयुष्य रोमांचक बनवू शकतो. त्याची चांगली बाजू पहिली पाहिजे म्हणजे झालं. अडचणी, वेदना, त्रास खूप असतात पण त्या सगळ्यावर मात करून एक छान, हसरं, सकारात्मक आयुष्य जगलो म्हणजे ‘जगलो’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: