जादुई शब्द..!

ते हरवलेले जादुई शब्द
” अल्ला मंतर कोल्हा मंतर
कोल्ह्याची आई कांदा खाई
बाळाचा बाऊ बरा होई “

तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे “काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!” आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे “हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर ‘फूsss’ असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे “काही नाही. . . आता फू केलंय ना , मग बरं होईल हं ते.”

पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते.

जखम ‘फू’ नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार ‘फू’ मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची

खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो.

जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड ‘ओपन वर्ल्ड’ मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी, उच्शृंखलता, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी “काही झाला नाही, उंदीर पळाला!”, “हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” अस करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, “फू केलंय ना , मग बरं होईल हा ते” असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

कितीही मोठे झालो तरी त्या ‘बालिश’ वाटणा-या शब्दांचं खरं मूल्य आता कळायला लागलं. . .

ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपलं दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम, माया आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी “. . . . उंदीर पळाला!”, “हाट रे. . . . ” “फू. . .” हे शब्द उच्चIरले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . .

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या ‘फु sss’ ची गरज पडतेच. अगदी आई बाबांना सुद्धा . . . . .
त्याला/ त्यांना त्याच्या/ त्यांच्या किमान एका विश्वासू माणसाकडून मिळालेली एक ‘फू sss’ नवसंजीवनी देऊन जाते.

जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . “

-माझ्याकडून एक फूsssss सर्वांच्या संकटासाठी!!🌷🌹🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: