जगन्नाथ मंदिर – पृथ्वीवरील वैकुंठ

सगळं शहर अंधारात बुडून गेलं होतं. मंदिराच्या आवारात सीआरपीएफचे अनेक जवान तैनात होते. परिसर गजबजून गेला होता. तो मुख्य पुजारी तयार होता. त्याच्या हातात ग्लोव्हज घातलेले होते आणि सगळीकडे अंधार असूनही त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती…….


ओरिसा राज्यातल्या पुरी शहरात स्थित पवित्र चार धामांपैकी एक असलेलं जगन्नाथ मंदिर ! ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये पृथ्वीवरील वैकुंठ असा केलेला आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या मंदिरात अनेको वर्षांपासून काही अशी रहस्ये दडलेली आहेत ज्यांच्या मुळापर्यंत अजूनतरी विज्ञानाला जाता आलेलं नाहीये. या चमत्कारिक गोष्टी अजूनही रहस्येच आहेत.


१:- झेंडा

या मंदिरावर एका मोठा झेंडा आहे जो दुरून बघितला तरीही एकदम व्यवस्थित दिसतो. कारण रोज हा झेंडा बदलला जातो आणि नव्या कापडाचा नवीन झेंडा बसवला जातो. हा झेंडा बसवण्यासाठी रोज एक पुजारी मंदिरावर चढून जातो आणि अगदी टोकावर जाऊन आधीचा झेंडा काढून त्याजागी नवा झेंडा बसवला जातो. साहजिकच कुणालाही असं वाटेल की रोज रोज झेंडा बदलण्याची काय गरज आहे ? तर मान्यता आशी आहे की जर रोज नवीन झेंडा बसवला गेला नाही किंवा या प्रक्रियेत एका दिवसाचा जरी खंड पडला तरी मंदिर १८ वर्षे बंद ठेवावे लागेल.

पण हे नाही ….

रहस्य हे आहे की हा झेंडा सदैव हवेच्या विपरित दिशेने फिरतो. हवा ज्या दिशेने वाहते झेंडा बरोबर विरुद्ध दिशेला फडकतो.

हवेच्या बाबतीतही एक आश्चर्याची बाब आहे. हे मंदिर समुद्रकिनारी स्थित आहे. साधारणतः सकाळच्या वेळी समुद्रकिनारी भागात सकाळच्या वेळी हवा समुद्राकडून जमिनीकडे वाहते आणि सायंकाळी जामिनीकडून समुद्राकडे वाहते पण पुरी शहरात मंदिराच्या परिसरात हवा सकाळच्या वेळी जमीनीकडून समुद्राकडे वाहते आणि सायंकाळी समुद्राकडून जमिनीकडे

आणि हा झेंडा कधीही हवेच्या विरुध्द दिशेलाच फडकतो !


२:- सुदर्शन चक्र

या मंदिरावर एक मोठ्ठं सुदर्शन चक्र लावलेलं आहे. हे चक्र अष्टधातूंपासून बनवलेलं आहे. या चक्राला खूप पवित्र मानलं जातं. या चक्राची बनावट इतकी जबरदस्त आणि बुचकळ्यात टाकणारी आहे की खरंच विचार करावा लागतो.

हे चक्र खूप उंचावर स्थित आहे आणि पुरी शहरातून कुठूनही उंचावरून हे चक्र बघता येतं. पण आपण जिथूनही बघतो तेव्हा चक्राचं तोंड आपल्याकडूनच आहे असा भास होतो. कुठूनही बघितलं तरी चक्र आपल्याला संपूर्ण गोलाकार आकरातच दिसतं. वरच्या फोटोतच बघा ना ! एकच वेळी आपल्याला दोन बाजूंनी हे चक्र दिसतंय. कोणत्याही बाजूने बघितलं तरी हे चक्र पूर्ण गोल नजरेस पडतं. हा स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आहे.

काही लोकांनी याच प्रकारे इतर काही चक्र आणि मंदिरातल्या इतरही काही गोष्टी पुन्हा बनवून बघितल्या .अनेक प्रयत्न केले पण अशी निर्मिती पुन्हा करताच आलेली नाही !!


३:- पक्षी

कुठलंही धार्मिक स्थळ असो , मंदिर असो , चर्च असो , विहार असो वा मस्जिद असो , या ठिकाणी झाडं असल्यामुळे अनेक पक्षी असतात. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मंदिराचा माहोल प्रसन्न होऊन जातो. पण जगन्नाथ मंदिरात कधीच – कोणत्याही वेळी एकही पक्षी नसतो. ना मंदिराच्या वरतून एखादा पक्षी उडत असतो. अनेक वर्षांपासून इथे काम करणाऱ्या वृद्ध पुजाऱ्यांना देखील या बाबतीत विचारलं गेलं. त्यावेळी ते म्हणाले की आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही मंदिराच्या आवारात कुठलाच पक्षी उडताना बघितला नाही ! असं का आहे याचाही कधीच सुगावा लागला नाही !!

याच कारणामुळे सरकारने मंदिरावरून कोणत्याही विमानाला किंवा हेलिकॉप्टरला उडण्यासाठी मनाई केलेली आहे.


४:- मंदिराची सावली

हे मंदिर खूप मोठ्या भागात पसरलेलं आहे. जवळपास ४ लाख वर्गफुट क्षेत्रफळात आणि मंदिराची उंची अंदाजे २१४ फूट इतकी आहे. मंदिराच्या आसपास राहून तर मंदिराचा जो मुख्य घुमट आहे तो बघताच येत नाही इतका तो उंच आहे.

सामान्यतः प्रत्येक वस्तूची सावली पडत असते. पृथ्वीच्या भ्रमणाबरोबर सूर्याची स्थिती जशी जशी बदलते तशी तशी सावली छोटी अथवा लांब पडत जाते. आणि मोठ्या वास्तूंच्या सावल्या तर लांबवर रुंद पडत जातात.

पण या मंदिराची सावली पडलेली कधीच कुणी बघितली नाही. काहीजण म्हणतात की मंदिराची सावली पडत नाही तर काहीजण म्हणतात सावली अदृश्य स्वरूपात आहे. पण खरं आणि ठोस कारण अजूनही कुणालाच मिळालं नाहीये !


५:- सिंहद्वार

हे मंदिर समुद्रकिनारी आहे. आणि त्यामुळे अर्थातच २४ तासही पाण्याच्या खळखळाटाचा आवाज इथे असतोच. पण मंदिरात एक सिंहद्वार नावाचा दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून प्रवेश करताना बाहेरून आत जातेवेळी सामान्य प्रकारे समुद्राचा आवाज येतो पण जसं तुम्ही एक पाऊल या दरवाजातून आत टाकता तसाच तो आवाज पूर्णपणे बंद होऊन जातो. बरं त्याचवेळी जर तुम्ही पुन्हा बाहेर पाऊल टाकलं की आवाजही पुन्हा येऊ लागतो . मंदिरात जर गर्दी कमीही असली तरीही लक्षपूर्वक ऐकलं तरीसुद्धा आवाज येत नाही !!


६:- प्रसाद

या मंदिरातलं पाकगृह हे जगातल्या सर्वात मोठ्या पाकगृहांपैकी एक आहे. इथे मुख्य ३०० आचारी काम करतात आणि त्यांचे एकूण ५०० सहयोगी त्यांना प्रसाद बनवण्यात मदत करतात. म्हणजेच ८०० पेक्षा जास्त लोक फक्त जेवण बनवण्यासाठीच आहेत. यावरून अंदाज बांधता येईल की इथे जेवणारे किती येत असतील. एका आकडेवारीनुसार काही वेळेस इथे येणाऱ्या भाविकांची एका दिवसाची संख्या जवळपास ८० ते ९० हजार इतकी असते. तर कधी कधी हाच आकडा १ लाखांपर्यंत पोचतो.

खूप जास्त प्रमाणात जेवण बनवावं लागतं पण आश्चर्याची बाब ही आहे की इतकी वर्षे झाली तरी आजवर हा प्रसाद कधीच कमी पडला नाही. कमी तर पडला नाहीच पण कधीच जास्त होऊन फेकुनही दिला गेला नाही. जशिजशी संध्याकाळ होत जाते आणि भाविक कमी होत जातात तसतसा हा प्रसादसुद्धा कमी कमी होऊ लागतो. आणि शेवटपर्यंत सर्वांचं जेवण व्यवस्थित झालेलं असतं आणि प्रसादही संपलेला असतो. याला तुम्ही आचाऱ्याराची कर्तबगारी म्हणा किंवा चमत्कार , पण आजवर कधीच प्रसाद ना कधी कमी पडला ना फेकण्यात गेला.

या प्रसादासंबंधितच आणखी एक गोष्ट म्हणजे प्रसाद शिजवण्याची पद्धत. इथे सर्वच नाही पण बहुतांश प्रसाद एका विशिष्ट पद्धतीने शिजवला जातो. एकावर एक अशी ७ सात भांडी ठेवली जातात. थर लाऊन. आणि खाली असते चूल.

(प्रातिनिधिक चित्र )

आश्चर्य हे आहे की इथे सर्वात वरती असलेल्या भांड्यातला प्रसाद सर्वात आधी शिजतो आणि सर्वात खाली असलेल्या भांड्यात प्रसाद सर्वात शेवटी शिजतो. वरपासून खालपर्यंत प्रसाद शिजत येतो. आणि कमाल म्हणजे सर्वात खालच्या भांड्यात कधीच प्रसाद बुडाला लागत नाही किंवा करपत / जळत नाही ! संपूर्ण प्रसाद बनवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो.


७: – ब्रम्हपदार्थ

किंवा …………

भगवान श्रीकृष्णाचा अंत पंचतत्वात विलीन होऊन झाला होता सर्व सृष्टीला त्यांचं संपूर्ण शरीर अर्पण झालं होतं. पण त्याचवेळी त्यांचं हृदय तसच शाबूत होतं. आणि हृदयाची धडधड सुद्धा तशीच होत होती. आणि आजही भगवान श्रीकृष्ण यांचं हृदय हे अस्तित्त्वात आहे अशी मान्यता आहे !!

आता …..

जगन्नाथ मंदिरात देवांच्या ज्या मूर्त्या आहेत. त्यांना प्रत्येकी १२ वर्षांनी बदलावे लागते. दर बारा वर्षांनी तिथे नवीन मूर्तींची स्थापना केली जाते. पण या मुर्त्या बदलणे म्हणजे सोप्पं काम नाहीये. ज्यावेळी मुर्त्या बदलायच्या असतात तो दिवस विशेष मुहूर्तावर निश्चित केला असतो. त्या दिवशी मंदिरात भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी नसते. सीआरपीएफ जवानांच्या तुकड्या तिथे सुरक्षेसाठी तैनात केल्या जातात. संपूर्ण मंदिर त्यांच्या सुरक्षेत असतं. त्या दिवशी मंदिरात फक्त काही मुख्य पुजारी उपस्थित असतात. आणि पूर्ण चोवीस तास संपूर्ण शहरात वीजपुरवठा बंद केला जातो. जशिजशी रात्र होते तसतशी सुरक्षा आणखी कडक केली जाते. आणि एक शेवटची पूजा केली जाते. मंदिरातला सर्वात ज्येष्ठ पुजारी त्या मुर्त्या बदलणार असतो. नवीन मुर्त्या निंबाच्या झाडापासून तयार केलेल्या असतात. हा मान मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शेवटची पूजा झाल्यावर रात्रीच्या वेळी निवडलेला तो एकटा पुजारी मूर्ती बदलणार असतो. असा तिथला नियमच आहे की मूर्ति एकच पुजारी गाभाऱ्यात जाऊन बदलू शकतो. आधीच रात्रीची वेळ असते. त्यात मंदिरातही संपूर्ण अंधार केलेला असतो. पुजाऱ्याच्या हातात ग्लोव्हज घातले जातात. आणि ज्यावेळी पुजारी गाभाऱ्यात प्रवेश करणार असतो त्यावेळी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. आणि मग त्याला आत पाठवलं जातं. आणि नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.

असं म्हणतात या मंदिरात एक ब्रम्हपदार्थ आहे जो की खूप खास आहे. आणि तो ब्रम्हपदार्थ जगन्नाथाच्या मूर्ती मध्येच आहे.

ज्या पुजाऱ्याने या मूर्ती बदलल्या आहेत. त्यांची एक खाजगी मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं..

“जेव्हा मी मूर्ती बदलून नवीन मूर्तीची स्थापना करत होतो त्यावेळी तो ब्रम्हपदार्थ मूर्तीच्या आतच ठेवलेला असतो आणि तो अलगदपणे काढून नवीन मूर्तीच्या आत ठेवायचा असतो. ज्यावेळी मी तो ब्रम्हपदार्थ काढला आणि हातात धरला त्यावेळी ग्लोव्हज असल्याने फारसं नाही पण इतकं नक्की समजलं की तो पदार्थ सशाच्या अंगासारखा मऊ लुसलुशीत होता आणि त्या पदार्थाची हालचाल होत होती. तो पदार्थ स्वतः हुन हलत होता. डोळ्यांवर पट्टी असल्याने तो बघता आला नाही मात्र जाणीव अशीच होती हे मात्र पक्कं “

.

.

.

नाही …..

हाच अंदाज सर्वांनी बांधलाय . अर्थात तसा संशय येणे अगदी स्वाभाविक आहे पण आपण कुणीच तो ब्रम्हपदार्थ डोळ्यांनी बघितलेला नाहीये त्यामुळे ठोस असा कुठलाच पुरावा आपल्याकडे नाही ! त्यामुळे असं म्हणता येणार नाही की हा ब्रम्हपदार्थ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचं काळीज आहे म्हणून.

मान्यता अशी आहे की हा ब्रम्हपदार्थ प्रचंड तेजस्वी आहे. उघड्या डोळ्यांनी जो कुणी हा पदार्थ बघेल त्याचा तात्काळ मृत्यू होईल. त्याच्या शरीराच्या अगदी ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील ! म्हणून हा पदार्थ बघण्याची कुणालाच परवानगी नाहीये !


अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी गजबजलेलं हे मंदिर ! यांतल्या रहस्यांचा विज्ञानाला अद्याप उलगडा करता आलेला नाहीये !


सर्व छायाचित्रे स्त्रोत :- इंस्टाग्राम

साभार – संकल्प पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: