पंढरपूरची एसटी

दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसातही… त्या शहरी बस स्थानकातून बाहेर पडलेली एसटी… मार्गात साचलेलं पाणी खड्डे चुकवीत… घुसघोरी करणाऱ्या लहान मोठ्या वाहनांचे अनेक अडथळे कसेबसे पार करीत… दाट लोकवस्तीला मागे टाकून… अखेर टॉप गियरवर स्थिरावली आणि इतक्यावेळ खिडकीबाहेर पाहणाऱ्या कंडक्टर साहेबांनी गळ्यातलं तिकीट मशिन सावरीत… बस मध्ये बसलेल्या प्रवाशांकडे आपला मोर्चा वळवीत ‘तिकीट तिकीट’चा गजर केला…
अर्थात… असं असलं तरी… प्रवासी आणि एसटी कंडक्टर यांच्यात सुसंवादापेक्षा वितंडवादाची जुनी परंपरा अबाधित ठेवत… तिकिटासाठी हात पुढे केलेल्या… पहिल्याचं प्रवाशाने केवळ एका तिकिटासाठी कंडक्टर समोर दोन हजाराचे भारतीय चलन धरून वादाची पहिली ठिणगी प्रज्वलित केली… अहो साहेब!अजुन एकही तिकीट फाडलं नाही मी… अन तुम्ही दोन हजाराची नोट देताय! सुट्टे द्या! कंडक्टर साहेबांनी नोटेला स्पर्शही न करता… तार स्वरातली आपली तिखट प्रतिक्रिया नोंदविली…
अहो! महाशय… तुम्हाला नाही का ठेवता येत चेंज… तुमचं काम आहे ते! प्रवासाला निघताना आम्ही सुट्टे शोधत बसायचं?…
ते तुमचं तुम्ही बघा! नाहितर शेवटी तिकीट घ्या… साऱ्या बसचं बुकिंग करायचं मला! तुमच्याशी वाद घालायला वेळ नाही माझ्याकडे!
असं म्हणत कंडक्टर साहेबांनी… शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मान वळवीत विचारलं… बोला तुमचं काय?
इकडे बसमधील उर्वरित प्रवासी.. दोन हजाराच्या नोटेनं पायाभरणी केलेलं… वाद-विवादाने गाजलेलं ते ऑन रोड ‘पथनाट्य’ पाहून… उगीच वादाचं पुन्हा कारण नको म्हणुन… आपापल्या जवळील होता होईल तितकी तिकिटाची अचूक रक्कम देण्यासाठी खिसे पर्स धुंडाळू लागले… तोपर्यंत पावसाची तमा न करता… एसटी सुसाट निघाली होती… बसचे सारथी महोदय… डोंगराळ भाग… घाट रस्ता… अचानक वाढलेल्या जोरदार पावसातून मार्गक्रमण करीत… कमी झालेल्या दृश्यमानाचा अंदाज घेत…बसचे सारथ्य करण्यात मग्न असताना… कंडक्टर साहेब तिकीटाची पैशांची देवघेव करीत करीत पुढे पुढे जात… दोन सीटवर मागेपुढे बसलेल्या चार आजीबाईंच्या सीट जवळ पोहोचले होते…
बोला आजीबाई कुठं जायचं… तिकीट बोला!
पाऊस त्यांत खिडकीतून येणारी थंड हवा… गारठ्यामुळं डोक्यापर्यत शाल ओढलेल्या चारही अाजीबाईंपैकी एका आजींनी थरथरत्या हातात घट्ट धरलेल्या नोटा कंडक्टर साहेबांपुढे करीत… चार पंढरपूर द्या दादा! म्हटलं आणि दादांनी कपाळावर हात मारून घेतला…
आजीबाई! अहो बस पंढरपूरला नाही जात… सोलापूरला चाललीय… तुम्ही कशा बसलात इच्यात… शेजारच्या फलाटावर लागली होती ना गाडी… पंढरपूरला जायला खास बस सोडल्यात त्यांत जायचं?
आरं दादा! मोटरअड्यावर एका बाबाला इचारलं त्यानं हिकडं बोट दाखवलं… बसलो इच्यात! दादा आरं दोन वर्स झालीत आमचा पांडुरंग भेटला न्हाई रं ! पायात जोर हुता तोवर वारी चुकवली न्हाई कधी ! चालवत नाह्य रं आता… शेतीपोतीत काबाडकष्ट झेंलेत तवा कुठं पैशे थोडेफार पैशे संघळले… निघालो विठ्ठल रुक्माईला भेटाया… चंद्रभागेत डुबकी माराया! दोन दिसावर एकादस येऊन ठेपली! कायपण कर दादा पंढरीला पोचिव तू…
कंडक्टर साहेबांना काय बोलावं सुचत नव्हतं… आता ह्या म्हाताऱ्यांना कसं सांगावं… बस पंढरपूरला नाही नेता येणार… गयावया करणाऱ्या आजीबाईंची विठ्ठलाला पांडुरंगाला माउलीला भेटण्याची तळमळ ओढ… मनाची अगतिकता वाढवित असली तरी त्यांच्या हातात काहींचं नव्हतं… तोपर्यंत बस घाटाच्या पायथ्याशी पोहोचत होती… घाटाच्या अलीकडे ‘महाराष्ट्र पोलीस’ लिहिलेल्या… रस्ता अडवून आडव्या लावलेल्या भरभक्कम बॅरिकेट्स… जवळ रेनकोट घातलेले कोसळणाऱ्या पावसात उभे पोलीस… थांबा!थांबा! इशारा देतं वाहने थांबवीत वाहनांना रोखीत होते…
इकडे बसमध्ये अनेक शंकाना आलेलं उधाण… अपघात झालाय? मंत्र्यांचा काफीला? आरटीओ चेकिंग? नक्की काय झालं होतं? परंतु काही क्षणात ह्याचं उत्तर मिळालं होतं…
🚩
‘अतिवृष्टी मुळे घाट माथ्यावर वळण रस्ता खचल्याने या मार्गांवरची सर्व वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे! घाट रस्त्याने होणारी वाहतूक पर्यायी व्यवस्था म्हणुन पंढरपूर मार्गे वळवण्यात येत आहे! सर्व वाहकांनी या मार्गाचा अवलंब करुन… पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे… धन्यवाद”
उभ्या वाहनांच्या रांगेतून… पोलीस जीप द्वारे वारंवार होणारी उद्घोषणा कानी पडतांच बस मधिल प्रवाश्यांची चलबिचल वाढली असली तरी…
एका व्यक्तीच्या चेहेऱ्यावर मात्र समाधान पसरलं होतं…
🚩
अलीकडच्या फाट्यावरून बस पंढरपूर मार्गे वळवण्यासाठी कंडक्टर साहेब बस खाली उतरून रिव्हर्स घेण्यासाठी शिट्टी वाजवित ड्रायव्हरला मदत करीत असताना… सहजच त्यांची नजर… घाट माथ्यावरील मेघाच्छादित एका उंच सुळक्यावर स्थिरावली होती… कोसळणारा पाऊस… दाट धुके… निळ्या सावळ्या मेघांनी गच्चं भरलेलं आकाश… निसर्गाच्या त्या विशाल पार्श्वभूमीवर… धुक्यात आपलं ‘अस्तित्व’ दाखविणारा… तो सुळका… जणू कर कटीवर घेऊन पांडुरंग उभा… भासत होता… ते अद्भुत दृश्य डोळ्यात साठवीत…कंडक्टर साहेब भावूक झाले होते…
‘बा विठ्ठला! तुला भेटण्याची आस लागून राहिलेल्या… बस मधल्या त्या चार आजीबाईंना पंढरपूर वारी घडविण्यासाठी मी काहींच करू शकत नव्हतो! तू मात्र माझं काम लिलया सोपं करुन टाकलंस! पुंडलिका भेटी परब्रम्ह आले! ह्याची प्रचिती आली देवा!तुझ्या भक्तांसाठी तू काहीही करू शकतोस! निर्मळ मनाने तुझ्या भेटीला निघालेल्या आजीबाईंची ईच्छा नक्कीच पुर्ण होणार…’
🚩
एक शानदार वळण घेऊन… एसटी मार्गस्थ झाली असली तरी… कंडक्टर साहेबांची नजर अजुनही त्याचं सुळक्यावर स्थिरावली होती… ‘तो’ नजारा दृष्टीआड होईतो…
~ शेखर वैद्य (नाशिक)