स्वयंप्रकाशी रवी

“सर, ओळखलं का??”
कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. मनात म्हटलं, “वाह, सगळंच जुळतय.”

पार्ल्याला गरवारे सिग्नलपासून पुढे चकाला सिगारेट फॅक्टरीपर्यन्तच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर अनेक गरीब, बेघर कुटुंबांचे संसार मांडलेले असतात. वर्षभर ही कुटुंब तिथेच असतात. अपवाद पावसाळ्याचे चार महिने. त्या चार महिन्यात या सगळ्या कबिल्याला गरवारे सिग्नलचा उड्डाणपूल आपल्या पंखांखाली घेतो. या वर्षी नवीन ऋतू हिवसाळा सुरू असल्याने जानेवारी उगवला तरीही यातली काही कुटुंबं अजूनसुद्धा तिथेच ठाण मांडून आहेत. साधारण दहा बारा म्हाताऱ्या, पंधरा एक मध्यमवयीन स्त्रीपुरुष, दहापंधरा तरुण-तरुणी, तितकीच लहान मुलं आणि तितकीच तान्ही बाळं, अशी एक अजब डेमोग्राफी इथे पहायला मिळते. या गर्दीतले चेहरेही कायम सारखे नसतात. दर काही दिवसांनी काही चेहरे दिसेनासे होतात आणि काही नवीन चेहऱ्यांची भर त्यात पडत असते. शिफ्ट्स मधे काम करत असल्याने आणि तिथूनच येणं जाणं असल्याने, त्यांचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम माझ्या नजरेला दिसतो. सकाळी तीन विटांवरच्या चुलीवर उकळणाऱ्या कोऱ्या चहापासून सुरू झालेला दिवस, रात्री राखाडी फासलेल्या टोपात शिजलेल्या वाफाळलेल्या भात आणि सांबारासोबत संपतो. मधल्या वेळेत आया त्यांच्या चॉकलेटी रंगाच्या बाळांना खसखसून अंघोळ घालतात. काही जण सिग्नलवर फुलांचे बुके, लिंबूमिर्ची, स्ट्रॉबेरी असलं काहीबाही विकतात. लहान मुलांच्या भांडणात आपापल्या नातवंडांची बाजू घेत,म्हाताऱ्या एकमेकींशी वसावसा भांडतात. आणि संध्याकाळ होता होता हा सगळा लवाजमा घोळका करून कोणत्यातरी गहन विषयावर तावातावाने चर्चा करताना दिसतो. रोज, न चुकता. विषय आणि भाषा दोन्हीही नीट कळत नाही. भाषा कोणतीतरी दाक्षिणात्य असावी बहुधा. काल संध्याकाळची शिफ्ट सम्पवून घरी जात असताना ऑफिस बसमधून उतरलो आणि अचानक पावसाची सर आली. सर ओसरायची वाट बघत मी इथेच पूलाखाली थांबलो. रात्री पाऊण एकची वेळ. इतक्यात कानांवर आवाज पडला…

“सर, ओळखलं का?”
“…. नाही”
“आता??” त्याने चेहऱ्यावरचा मास्क खाली घेतला. फार तर वीस बावीस वय असेल.
“सॉरी, पण नाही आठवत आहे”
“कुर्ला स्टेशन?? कसाऱ्याचं लोकल तिकीट??”
“ओह ओके ओके.. आत्ता आठवलं”

दोन वर्षांपूर्वी पहिला कडक लॉकडाऊन लागला होता, तेव्हा लोकलप्रवास फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मर्यादित होता. कुर्ला स्टेशनवर मी तिकिटासाठी रांगेत उभा असताना हा मुलगा माझ्याजवळ येऊन “सर, प्लिज एक तिकीट काढून द्याल का?? कसारा पर्यन्त. प्लिज सर प्लिज, अर्जंट आहे, आई आजारी आहे” असं कळवळून म्हणाला होता. मुलगा खरं बोलतोय अस वाटत होतं, आणि शिवाय पैसेही मागत नाहीये.. तिकीटच मागतोय, म्हटल्यावर मीही त्याला माझ्या ओळखपत्रावर लोकलचं तिकीट काढून दिलं होतं. आज तो दोन अडीच वर्षांनी असा अचानक भेटलेला.

“मी सोडू का तुला घरापर्यंत? मी इथेच समोर राहतो. पटकन गाडी घेऊन येतो.”
“नको साहेब, आमच्या गावाकडचा एक मुलगा इथं कॉल सेंटरला बस चालवतो. शिफ्ट वाल्याना सोडून या वेळेला रिकामी बस घेऊन जातो तो या बाजूला. तो सोडतो मला बांद्रा कोर्टापर्यंत. मग तिथून जातो मी चालत.”
नशीबाने खेळलेल्या प्रत्येक चालीवर उत्तर शोधलं होतं त्याने. त्याच्या प्रत्येक वाक्यगणिक माझे शब्द आटत चाललेले. मला कळत नव्हतं काय बोलू? शब्दच नव्हते उरलेले, ना याच्या जखमांवर फुंकर मारू शकणारे, ना त्याच्या झगड्याचं कौतुक करू शकणारे..
अर्ध मिनिट शांततेत गेलं. पाऊस थाम्बला होता. आम्ही रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला आलो, जिथून त्याच्या त्या मित्राची बस जाणार होती.

“तुम्ही जा सर, मी जाईन इथून”
“पुढे काय करणारेस? ठरवलं आहेस काही?”
“प्रयत्न सुरूय सर. गेल्या वर्षी तलाठ्याची परीक्षा पास झालेलो सर. पण नियुक्तीचं पत्र द्यायला झेडपी मधून पैसे मागितले. नाही जमलं ते. मागच्या वर्षीची पीएसआय ची मुख्य परीक्षा पास केलीय. मुलाखतीचा कॉल पण आलेला सर. पण हे कोविड मुळं अडकून पडलं सगळं सर. आणि एम ए सुरू आहेच. बघू सर, जमेलच कुठेतरी काहीतरी..” नशिबाचे सगळे फासे उलट पडत असताना सुद्धा त्याचा नशिबावरचा विश्वास जराही कमी होत नव्हता. कदाचित त्याला त्याच्या जिद्दीवर जास्त विश्वास असावा.

“तुझा मोबाईल नंबर देतो का?”
“तुमचा सांगा सर..” खिशातून मोबाईल काढून त्याने माझा नंबर टाईप केला.
“मिस्ड कॉल दे मला”
“नको सर, राहू देत”
“अरे दे की, काय झालं?”
“नको सर, राहू देत. मला शोधत मदत करायला याल. नकोय मला ते सर. आयुष्यात काही झालोच तर स्वतः पेढे घेऊन येईन तुम्हाला. इथेच राहता ना तुम्ही??” त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्माईल होतं.
“……….” कुठून आणत असेल हा इतकी सकारात्मता.
“बस आली सर, ती बघा”
तरीही जाता जाता याच्या हातात थोडे पैसे ठेवतोच असं मनात ठरवून मी समोरून येणाऱ्या बस कडे बघता बघता पाकिटाला हात घातला. शंभर-पाचशे देऊ की हजार-दोन हजार देऊ असा विचार करेपर्यंत त्याने स्वतःच्या खिशातून दहादहाच्या तीन नोटा काढून माझ्या बॅगच्या कप्प्यात टाकल्या,
“हे तुमचे तिकिटाचे पैसे सर.. त्या दिवशी घाईघाईत राहून गेलेले..”
मी काहीही म्हणेपर्यंत तो बसमध्ये चढला होता आणि बस पुढे निघालीही होती,
“पुन्हा भेटू सर..”
मी बराच वेळ पुढे जाणाऱ्या बसकडे बघत बसलो.
मी अर्धएक मिनिट तिथेच उभा होतो. नक्की कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणायला हवं होतं, याचा विचार करत.

मी चालत घराकडे निघालो. सिग्नलवर सायकलवरच्या कॉफीवाल्याकडे एक कॉफी घेतली. आणि सुन्न डोक्याने घरी आलो. असं म्हणतात, की असे प्रसंग तुम्हाला आयुष्यात नवीन ऊर्मी देऊन जातात. मला याच्या अगदी उलट वाटतय. आत खूप मोठी आणि खोल पोकळी तयार झाल्यासारखी वाटतेय. रितेपणाची जाणीव. वन बीएचकेचा टू बीएचके आणि हॅचबॅकची सेडान करण्याइतपतच खुरटी स्वप्नं बाळगणाऱ्यांना ही जगण्याच्या खरीखुऱ्या लढाईची गोष्ट अंगावर येते. तूपात घोळवलेली आणि साखरेत लोळवलेली दुःखं चघळायची सवय झालेल्या शहरी मध्यमवर्गाला ही दाहकता पेलवत तर नाहीच, पण ऐकवतही नाही. ‘बलुतं’ किंवा ‘झोंबी’ सारखी दुःखानी डबडबलेली आत्मचरित्रं वाचल्यावर आपल्यात जी शून्यत्वाची भावना निर्माण होते तीच भावना. पण सगळीच पुस्तकं लायब्ररीत मिळत नाहीत. काही पुस्तकं तुम्हाला अशीच रस्त्यावर, पूलाखाली चालता बोलता भेटतात. तुमच्यांशी गप्पा मारतात.. जीवंत होऊन.

सलाम आहे रवी तुला.. हो रवीच.. स्वयंप्रकाशी रवी..

आणि हो, गरवारेच्या पूलाखाली पार्ल्यातली काही सर्वात श्रीमंत कुटुंबं राहतात. बेघर असतील पण गरीब नक्किच नाहीत.

✍🏼ॐकार मोकल

(संकलन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: