वाडा

“वाडा” बांधकामात दगडाचा न उलगडलेला इतिहास.

आपल्या पूर्वजांनी उगाच म्हटलेलं नाही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. महाराष्ट्राचा सर्वात जुना सोबती कोण? महाराष्ट्रावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा ? महाराष्ट्राची खरी ओळख काय ? महाराष्ट्र समजून घेण्यासाठी कुठून सुरुवात करावी ? या सर्वांचे उत्तर एकच तो म्हणजे आपल्याकडील काळा खडक. अर्थात ब्लॅक बेसाल्ट. कारण तो समजल्याशिवाय आपणाला महाराष्ट्र समजणार नाही. आणि आपली संस्कृतीही समजणार नाही. महाराष्ट्र घडविण्यात दगडाचा फार मोठा वाटा आहे.


अशा दगडांनीच इतिहास घडवला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ब्लॅक बेसाल्टने सर्वच गोष्टी प्रभावित केल्या आहेत. आपला इतिहास, भूगोल, संस्कृती आणि अर्थव्यावस्था सुद्धा. आपल्या संस्कृतीच्या जडणघडणीत दगडाची भूमिका बघायला गेलो तर सर्वात जास्त लेणी महाराष्ट्रात आहेत. त्याही काळ्या पाषाणात. त्यात बौद्ध, जैन, हिंदू, अशा सर्वच लेणींचा समावेश आहे. दगडाचा प्रभाव सांगणारी कितीतरी उदाहरणे आहेत. आदीमानवाच्या हातात पाहिलं हत्यार आलं ते म्हणजे दगड. आणि तिथूनच दगडाची खरी सुरवात झाली. आदिमानवाला प्रतिकूल परिस्थितीत आधार देणारी दगडी हत्यारे, गड, किल्ले, गढ्या, वाडा बांधकामांना आकार देणारे दगडच आहेत. मंदिराची शोभा वाढवणारा दगडच, धरण बांधकामासाठी वापरलेला दगडच. गुहा, लेणी, घाट, पुष्करणी, बारव, मूर्ती अशा उदाहरणाची यादी कितीतरी मोठी होईल. मुद्दा इतकाच की या खडकाने आपल्यावर इतका प्रभाव टाकला आणि अजूनही टाकत आहे. त्याच्याकडे कसं पहायचं हेही कुणी आजपर्यंत कुणी उलगडून सांगितलेले नाही. त्यात काय सौंदर्य दडलं आहे. त्याच्यातील वैशिठ्यपूर्ण रुपाची सैर ही कुणी घडवून आणली नाही. म्हणूनच तर तो केवळ दगड राहिला आहे. हे रडगाण गाण्यापेक्षा दगडाला उजाळा देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.

निसर्गाने शेकडो, हजारो वर्षे व्यतीत करून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लावारसांपासून दगड निर्माण केलेला आहे. म्हणजे भूकंप झाला उल्कापाताने लाव्हारस बाहेर पडला. त्याला थंड व्हायला काही वर्ष लागली. मग सह्याद्री निर्माण झाला. त्याच्या बाजूने माणस आली, सह्याद्रीचे महत्व, कठीणपण, सह्याद्रीचे अप्रत्यक्षरित्या काय काम होते. त्याचा उपयोग आपल्या पूर्वजांनी कसा केला, आपल्याला सोईचे व शत्रूला अवघड कसा केला. त्याचा योग्य वापर स्थापत्य कलेमध्ये आपल्याला दिसतो. वाडा, गढी, किल्ले, मंदिर, मूर्ती, शिल्प याकडे आपले पूर्वज खुप वैज्ञानिक, शास्त्रीय, अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहत होते. त्याबाबत त्यांनी इतके विपूल लिखाण करुन ठेवले आहे की ते वाचल्यावर अक्षरश: आपण स्तंभित होऊन जातो. दगडाचे सुद्धा लिंग प्रकार असतात हे वाचल्यावरच मलाही कळले.

दगड जमिनीतून किंवा डोंगराच्या खाणीतून काढतात. बांधकाम निर्मितीसाठी डोंगराच्या खाणीतून काढलेले दगड चांगले समजतात. त्यामागे कारण असे. जमिनीतून काढलेल्या दगडांवर ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक शक्तिंचा परिणाम जास्त होतो त्यामानाने खाणीतून काढलेल्या दगडांवर कमी होतो. दगडाचे लिंग नुसार वर्गीकरण खालील प्रमाणे.
पुल्लिंगी दगड: हे दगड आकाराने मोठे त्यावर ठोकले असता घंटी प्रमाणे खणखणीत आवाज येतो. आयताकृती, सौंदर्यपूर्ण, मूळापासून वरच्या टोकापर्यंत एका रंगाची, वजनदार, घणाचा घाव घातला असता जिच्यातून अग्निस्फुल्लिंग बाहेर पडतात असे दगड पुल्लिंगी समजतात. पुल्लिंगी दगड भिंत व शिखर बांधकामात वापरतात.
स्त्रीलिंग दगड: हे दगड मध्यम आकाराचे, तालवाद्याप्रमाणे जिच्यातून आवाज येतो. मूळाच्या बाजूला जाड व टोकाच्या बाजूला मूळापेक्षा कमी जाड, मध्यम आकाराची, स्पर्शाला शीतल लागणारी शिळा स्त्रीलिंगी समजतात. स्त्रीलिंगी दगड अधिष्ठान व उपपीठ बांधतांना वापरतात.

नपुंसकलिंगी दगड: हे दगड आकाराने लहान, गोलगरगरीत, रुक्ष, बद्द आवाज येणारा, मूळाला लहान व टोकाला जाड, त्रिकोणाकार किंवा ज्याच्या एक बाजूची लांबी समोरील बाजूच्या लांबीपेक्षा फारच लहान असते असा दगड नपुंसकलिंगी असतो. नपुंसकलिंगी दगड पायासाठी वापरतात.

नैसर्गिकरित्या मिळणारे व वाडा बांधकामातील प्रमुख घटक म्हणजे दगड होय. दगड बांधकामाविषयी सांगावयाचे झाल्यास त्याची अत्यंत सोपी व्याख्या दिली जाईल. बलदंड शत्रूचे आक्रमण रोखण्यासाठी उभारलेला अडथळा. ऊन, वारा, पाऊस व इतर कारणांनी कण सुटे होऊन दगडाची झीज होण्याचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे बांधकामासाठी फार पूर्वीपासून दगडाची निवड आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. आत्ताच्या सारखं वापरा आणि फेकून द्या असं नाही.

जुने बांधलेले वाडे पाहिल्यावर पहिला प्रश्न पडतो की हे बांधण्यासाठी एवढे दगड आणले कुठून ? कसे आणले असतील, त्यावेळचे रस्ते कसे असतील. किल्ला बांधण्यासाठी दगड किल्ल्यातूनच काढले जातात. नंतर त्या दगडाच्या खाणीचे रूपांतर पाण्याच्या टाक्यात, तलावात केले जायचे. अशा प्रकारे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होत. वाड्याच्या बांधकामाचे काय.

बांधकाम सुरू करावयाचे म्हटले की प्रथम दगडाच्या खाणी कुठे काढायच्या त्यासाठी पाहणी होत असे. दगडाची खाण नक्की झाली की, त्या खाणीतून आपल्याला लागेल तेवढा दगड निघेल ना हे पाहिले जाई. त्या खाणीतील दगडाच्या चाचण्याही होत असे. दगडांचा रंग, टिकाऊपणा, कणखरपणा, अग्नि प्रतिबंधकता, आम्लाचा परिणाम. अशा त्या चाचण्या असत.

खाणीमधुन दगड काढण्याचे प्रकार.
फार वर्षापूर्वी खाणीतून दगड काढण्याचे वेगवेगळे तंत्र लोकांनी वापरलेले आहे. त्यापैकी काही प्रकारे दगड कसे काढत असत ते पाहुयात.

क) दगडाचा पृष्ठभाग तापवून:
पूर्वीचे लोक झाडांचा पालापाचोळा, वाळलेले गवत, जंगली वाळलेल्या झाडाच्या फांद्या यांचा ढिग करून खडकाच्या पृष्ठभागावर ठेऊन तो ढीग पेटवुन देत. त्यामुळे दगडाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन खडकाचा पृष्ठभाग तडकतो. त्याचवेळी तापलेल्या पृष्ठभागावर लगेच पाणी ओततात. त्यामुळे दगडाचा पृष्ठभाग थंड होऊन तो आकसतो. त्यास तडे पडतात. मग पहारीच्या साहाय्याने असे दगड सुटे करुन काढत असत.

ख) दगडाच्या पृष्ठभागावरील माती काढून दगड मोकळा करत व खोदण्याच्या ठिकाणी रेषा काढत. त्या रेषेवर खडकात अंतरा अंतराने चौकोनी भोके पाडीत, नंतर या भोकामध्ये वाळलेल्या सुक्या लाकडाचे चौकोनी ठोकळे घट्ट ठोकीत. त्या लाकडी ठोकळ्यावर पाणी ओतून ते फुगवतात. लाकडाचे ठोकळे फुगले की खडकाला भेग पडून फट पडे. खडकात शिल्पाकृती खोदताना प्रथम ढोबळ मानाने आखणी करीत खुंटया ठोकून तो दगड फोडून घेत असत.

ग) पहारीचा उपयोग करून: ज्या दगडाचे थर स्पष्ट दिसतात. अशा दगडामधील लहानलहान भेगामध्ये ठिकठिकाणी छिन्नी ठोकून दगड सुटे केले जातात. नंतर पहारीच्या साहाय्याने ते दगड उचकटून काढले जातात. या प्रकारामध्ये मोठमोठाले दगडाचे ठोकळे काढले जातात.

घ) सुरूंग लाऊन : ज्या ठिकाणचे खडक अतिशय कणखर असेल तेथील दगड सुरूंग लाऊन काढले जात. दगडामध्ये ठिकठिकाणी भोके पाडून त्यामध्ये सुरूंगाची दारु सुतळीवाती सह घालून ती भोके वाळूने व्यवस्थीत बंद करतात. सुतळीवात पेटवून स्फोट घडवून आणतात. सुरूंगाचा स्फोट होताच त्याचा धुर व जाळ दगडाच्या पृष्ठभागामध्ये कमीतकमी अंतर असलेल्या भेगामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. धुराचा व जाळाचा हा सर्वात जवळचा बाहेर येण्याचा मार्ग त्याला न्युतनम विरोध रेषा म्हणून ओळखला जातो. याचाच अर्थ असा होतो की, सुरुंगाच्या धुराला व जाळाला कमीतकमी तेवढा दगड फोडून बाहेर पडलेच पाहिजे.

च) दगड रापविण्याची पद्धत:
पूर्वी खाणीमधुन काढलेले दगड लगेच बांधकामासाठी वापरत नसत. कारण या दगडामध्ये थोडयाफार प्रमाणात दमटपणा, ओलसरपणा असतो. सुरुंग लावून फोडल्यामुळे तो ठिसूळ बनलेला असतो. हा गुणधर्म नाहीसा करण्यासाठी त्याला खुल्या हवेत एक-दोन महिने ठेवले असता उष्णतेमुळे ओलसरपणा नाहीसा होतो. आणि दगड कठीण बनतो. यालाच दगड रापवणे असे सुद्धा म्हणतात. जास्त दिवस दगड तसाच ठेवला तर तो कडक होतो. त्यामुळे घडीवकाम करण्यास फार त्रास होतो.
खाणीमधून काढलेले दगड आकारहीन आसतात. त्यांना व्यवस्थित घडवून घ्यावे लागते. कानेकोपरे व्यवस्थीत करावे लागतात. पायामधील दगड नाही घडले तरी चालतात. ते दिसणारे नसतात. परंतु जमिनीच्या वरील दगड घडवूनच घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना सुबकपणा येतो. ते एकमेकांवर सरळ रेषेत ठेवता येतात. बांधकाम मजबुत व आकर्षक होते. अशा दगडाची घडाई करण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते.

छ) दगड घडाईचे प्रकार :- खांडकी, सडकीव, माटीव, बोरट, बाजरी, सजगुरी, बुची, दात्री, टीचीव, मच्छी कोपरा, चौकोनी कोपरा असे घडलेल्या दगडाच्या भिंतीचे वैभव असे. आता हे प्रकार व वैभव लोप पावत चालले आहे.

दगड कितीही मोठा आणि चांगला असला तर जोवर त्याला घडवत नाही, तोपर्यंत त्याला काहीही मोल नाही. हे खूप मोठे जीवन विषयक तत्व आहे. खाणीतून दगड काढतानाच ते विशिष्ट आकाराचे काढले जातात. नंतर ते घडविण्यासाठी कोणत्या दगडापासून कोणती वस्तू घडवता येईल याचा अंदाज घेवून दगड निवडले जातात. दगडाची कठीणता पाहून कोणता दगड योग्य आणि कोणता दगड अयोग्य ठरवले जाते. जो दगड मऊ म्हणजे घडवायला सोपा तो कमजोर तर कडक म्हणजे घडवायला कठीण असणाऱ्या दगडापासून केलेल्या वस्तू अधिक काळ टिकतात हे अनुभवाचे बोल आहेत.

दगड घडवणे खूप कष्टाचे आणि वेळखाऊ काम असते. दगड घडवताना त्याचे चार टप्पे असतात त्यांना घडी असे म्हणतात. प्रत्येक घडीची वेगळी छिन्नी असते. एका विशिष्ट हातोडीने दगड हवा तसा फोडला जातो. त्यानंतर पहिली घडी म्हणजे वस्तूच्या आकारानुसार त्या दगडाचे पहिले ओबडधोबड कोरीवकाम. त्यानंतर दुसरी घडी, ज्यात वस्तू आकार घेते. तिसरी घडी म्हणजे वस्तू ओबडधोबड स्वरुपात तयार होते आणि चौथी घडी म्हणजे वस्तूला सुबक, आकर्षक केले जाते. जेंव्हा चौथी घडी चालू असते, तेंव्हा वस्तूच्या कोरीवकामाचे चार प्रकार असून त्यांना माठ म्हणतात. पहिला हरभरा किंवा बोरठ माठ, त्यानंतर ज्वारी माठ, त्यानंतर बाजरी किंवा सजगुरी माठ आणि चौथा माटीव माठ.

प्रत्येक माठाची छन्नी वेगळी असते. हरभरा माठ म्हणजे छन्नीने एका घावात दगडाला पडलेली खोके ही हरभऱ्याच्या आकाराची असते. ज्वारीच्या माठात ती ज्वारी एवढी आणि सजगुरी माठात ती बाजरी एवढी असते. म्हणजे वस्तू अधिक सुबक केली जाते.
माटीव दगड बांधकाम: याची घडाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागते, लहानलहान छ्न्नीचा उपयोग करून पृष्ठभाग, तळभाग, दर्शनी भाग घडवलेले असतात. घडीव दगड विशिष्ट पद्धतीने तासलेले आसतात. तसेच यामधील चुन्याच्या सांध्याची जाडी २ मी.मी. पेक्षा कमी असते.
माटीव मध्ये दगड अगदी गुळगुळीत असा केला जातो. देवदेवतांच्या मूर्ती अशा माटीव माठात बनवल्या जातात. एखादी वस्तू कोणत्या माठात हवी आहे त्यावर तिची किंमत ठरते. कारण सजगुरी आणि माटीव माठास खूप श्रम लागतात.

सडकीव दगड बांधकाम: दगडावर मध्यम प्रतीचे घडीव काम केलेले असते. याचे तळभाग आणि बाजूचे पृष्ठभाग साध्या छन्नीने समतल केलेले असतात. समतलाची अचूकता लक्षात न घेता घडीव काम केलेले असते. दोन दगडातील सांध्याची जाडी ६ मी.मी. पेक्षा जास्त ठेवत नाहीत.

खांडकी दगड बांधकाम :- दर्शनी भागातील काही भाग छिन्नीने घडविणे आणि बाकीचा भाग तसाच ठेवणे. असा अर्धवट घडीव दगड उपयोगात आणून दगडी बांधकाम करतात. या दगडाचा आकार ओबडधोबड, आकारहीन, लहान मोठे उंचवटे असलेला आसतो.

बोरट दगड बांधकाम :- दगडावर मध्यम प्रतीचे घडीव केलेले असते. याचे तळभाग आणि बाजूचे पृष्ठभाग साध्या छन्नीने समतल केलेले असतात. समतलाची अचूकता लक्षात न घेता घडीव काम केलेले असते. दोन दगडातील सांध्याची जाडी ६ मी.मी. पेक्षा जास्त ठेवत नाहीत. यामध्ये छन्नी वेगळ्या प्रकारची असते.

दगड कामाचे इतके प्रकार बघितल्यावर असे लक्षात येते की गुणवत्ता, खर्च, वेळ यासाठी आपल्या पूर्वजांनी इथेही नियोजन केल्याचे दिसते. दरवाजा व दर्शनी भागासाठी माटीव घडाई व बाजूने भिंतीला सडकीव अथवा बुच घडाईचे दगड वापरल्याचे दिसते. सर्वच ठिकाणी माटीव दगड वापरला असता तर दगड घडण्यासाठी वेळ लागला असता, त्यासाठी दगड ही वेगळा घ्यावा लागला असता व खर्च ही जास्त झाला असता. जमिनीवर चालताना पायांना त्रास व्हायला नको म्हणून त्याठिकाणी माटीव अथवा बाजरी घडाईचे दगड वापरल्याचे दिसते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वाड्याचे बांधकाम झाल्यानंतर दगडी जमीन सर्वात शेवटी तयार करत असतं. या कामासाठी शिल्लक राहिलेला दगडचं वापरलेला दिसतो. अभ्यासू वृत्तीने पहिले की आपल्या लक्षात येते. जमिनीचे दगड एक सारखे नाहीत. म्हणजे दगडी जमीन बनवण्यासाठी नविन दगड विकत घेतलेला दिसत नाही. दगड बांधकाम करताना दोन प्रकारे करतात.

पहिला प्रकार म्हणजे पेपर लेस ज्वाइंट बांधकाम. दोन दगडाच्या मध्ये सांधा ठेवत नाहीत. फक्त दगडावर दगड रचून बांधकाम केले जाते. अशी बांधकामे मंदिराला दिसतात.

दुसरा प्रकार म्हणजे दोन दगडामध्ये दहा एमएम पर्यंत सांधा ठेवतात. त्यामध्ये माती, सिमेंट, चुना असा मसाला भरून बांधकाम करतात. चुन्याच्या मसाल्यामध्ये त्याच्या दर्जा भरतात. दरजा भरण्याचा प्रमुख उद्देश जरी सांध्याची मजबुती वाढविणे व पावसाचे पाणी सांध्यातून बांधकामात शिरू नये हा असला तरी बांधकामाचा दर्शनी भाग नीटनेटका दिसावा हा ही एक उद्देश असतो.
धन्यवाद,

विलास भि.कोळी यांच्या “वाडा” या पुस्तकातून
संपर्क: 97630 84499

(संकलन)

One thought on “वाडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: