वार्षिक राशिभविष्य २०२३ : मिथुन
मिथुन राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – मिथुन’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे मिथुन राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,
तुमची संशोधक वृत्ती, चिकित्सक स्वभाव आणि सदा गतीमान रहाण्याची आवड या गुणांचा यावर्षी तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. फक्त चंचल स्वभावाला थोडा आळा घालावा लागेल हे नक्की. यावर्षी दशमस्थानी व एप्रिल २०२३ नंतर राशीच्या लाभस्थानी, गुरूचे भ्रमण होणार आहे. व्यवसाय नोकरीबाबत हा गुरु चांगली फळे देईल. अचानक नोकरी बदल, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागणे, धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक, क्षेत्रात करिअर असणाऱ्यांना हे ग्रहमान फायदेशीर ठरेल. या क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता.
राशीच्या लाभस्थानी असलेला राह आर्थिक, सामाजिक क्षेत्रात पुढे नेणार आहे. शत्रूंना भारी पडाल. अनेक प्रकारचे लाभ होतील. एप्रिल २०२३ नंतर ज्यांना संतती होण्यासाठी चान्स घ्यायचा आहे त्यांनी अवश्य लाभ घ्यावा. विद्याथ्र्यांना अभ्यासात प्रगती करून घेता येईल. भाग्येश शनीचे भाग्यातून भ्रमण लाभदायी जाणार आहे. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. कायदेशीर बाबी योग्य त्या पूर्ण केल्यास हे परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे.
आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे डोळेझाक करून चालणार नाही. तुमच्या राशीमध्ये जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच इतरांपेक्षा वेगळा आहे. त म्हटले ताकभात हे तुम्हाला क्षणात समजते. या गुणाचा उपयोग यावर्षी करून घ्या. परंतु बुद्धीच्या जोरावर पुढे जाल.
आता महिन्यानुसार काय फलित मिळेल ते पाहू या.
जानेवारी २०२३ | तुमची बरीच कामे मार्गी लावणारा महिना आहे. आत्तापर्यंत केलल्या कामाचे चीज होईल. लोकांसमोर तुमची कला येऊन भरपूर दाद मिळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. एकाचवेळी अनेक विचारांची गर्दी आणि त्यांचा पाठपुरावा करण्याच्या वृत्तीमुळे बऱ्याचदा कृतीऐवजी वैचारिक गोंधळ फार होतील. त्यातून मार्ग काढण्यासाठी थोडी ध्यानधारणा, ओंकार याची साथ धरली तर बरेच प्रश्न सुटून जातील. नोकरीत बदल करण्याचे विचार येतील. यासाठी तुमची मुळातच असलेली निरीक्षणशक्ती पणाला लावाल, पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. |
फेब्रुवारी २०२३ | किर्ती प्रसिद्धीसाठी जशी संधी मिळेल त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न राहील. वडिलोपार्जित घेतलेले निर्णय लांबणीवर पडतील. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नको त्या ठिकाणी पैसा खर्च करावा लागल्यामुळे थोडी चिडचिड होईल जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. स्वभाव थोडा मूडी राहणार आहे. आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास कराल. नोकरीत कष्टाची परिसीमा गाठलीत तरी आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या संपर्कात यावे लागेल प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या संघी अचानक चालून येतील. |
मार्च २०२३ | या महिन्यात प्रतिकूल परिस्थितीची दखल अवश्य घ्या. परंतु अनाठायी चिंता आणि निराशा यांचे सावट मनावर येऊ देऊ नका. आर्थिक गुंतवणूक कराल. नोकरी व्यवसायात मनाप्रमाणे बदल कराल. तेथील वातावरणही सुखावह भासेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात शारीरिक मानसिक दृष्ट्या शुभ परिणाम देणारे ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या क्षमाशील, उदार वृत्तीचा इतरांना अनुभव येईल. अडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची मर्जी राखाल पण स्वतंत्र काम करण्यात आनंद वाटेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात लोकांच्या मर्जीस उतराल. |
एप्रिल २०२३ | तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नावीन्यपूर्ण असल्यामुळे सगळ्यापर्यंत तुमच्या भावना नीट पोचणार नाहीत. यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. फसव्या आणि लबाड माणसांपासून सावध रहा. पैशाची परिस्थिती सुधारेल. त्यामुळे खरेदीचा मूड राहील. घरामध्ये विचारपूर्वक संमय ठेवलात तर इतरांच सहकार्य चांगले मिळेल. तुमच्या कामामध्ये नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल. दैवी उपासनेत प्रगती होईल. विद्यार्थ्यांची वाचन लिखाणात प्रगती होईल, व्यवसायात पार्टनरशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. |
मे २०२३ | या महिन्यात एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी कामात अचानक बदल कराल. हातून आर्थिक उलाढाली होतील. तुमचे संभाषण कौशल्य वापरून आपली मते इतरांना पटवून द्याल. परंतु एकंदरीत महिना संघर्षमय जाईल. बहाने जपून चालवा. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. भूतकाळात मिळालेल्या अपयशात गुंतून पडाल तर प्रगती होणार नाही. लांबच्या प्रवासाचे योग येतील, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. खाण्यावर बंधन ठेवले. नाही तर पचनाचा त्रास संभवतो. नोकरी व्यवसायात स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे होतील. कलाक्षेत्रात प्राविण्य मिळेल. |
जून २०२३ | प्रकृती अस्वस्थामुळे थोडा मानसिक ताण राहील. परंतु भाग्याची साथ असल्यामुळे कोणत्याही टोकाच्या गोष्टी घडणार नाही. तुमच्या बोलण्याची इतरांवर छाप पडेल. विद्याथ्र्यांनी अविचाराने वागू नये. स्थावर इस्टेटीची कामे रेंगाळतील परंतु तुमच्या सरळ मार्गी विचारांमुळे भविष्यात लाभ मिळेल. जरूरीपेक्षा जास्त विचार करणे टाळले तर अनेक क्षेत्रात विविध संधी मिळतील. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जीवाचे रान करण्याची ताकद ग्रह तुम्हाला देणार आहे. भावंडांशी थोडे मतभेद संभवतात. प्रवासाचे योग नवीन उत्साह देऊन जातील. |
जुलै २०२३ | या महिन्यात धंद्यातील बौद्धीक झेप वाढेल आणि बरेच दिवसांपासूनची एखादे काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. पैशाची चणचण दूर झाल्याने हायसे वाटेल. प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका. तुमच्या बोलण्यावर लोक बेहत् खूष होतील. ज्यांना बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांचा पैशाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. घरासंबंधी नवीन करारमदार करायचे असतील त्यासाठी हा महिना चांगला आहे. मागे जे पेरले असेल ते या महिन्यात उगवणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वर्चस्वाला तोंड द्यावे लागेल. |
ऑगस्ट २०२३ | बरेच दिवसांपासून घरामध्ये चर्चिला जाणारा एखादा प्रश्न सामोपचाराने सुटेल. घरामध्ये उंची खरेदी होईल. घरातील एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या सहवासामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. नोकरीत अचानक बदल संभवतात. त्या बदलाशी जमवून घेणे अवघड जाईल. प्रकृतीस्वास्थ्य सांभाळावे. ज्यांना मुळव्याधीचा त्रास आहे त्यांनी पथ्य सांभाळावे. पाय दुखण्यासारख्या किरकोळ गोष्टींचाही अवश्य विचार करा. अती भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नयेत. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. उच्चपदस्थ व्यक्तीमुळे आर्थिक प्रश्न सुटतील. |
सप्टेंबर २०२३ | या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये जास्त रमतील. त्यामध्ये कला, लेखन, नाट्य, अभिनय या गोष्टींकडे जास्त कल राहील. या काळामध्ये छानशा मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटल्यामुळे जीवनाचा वेगळा रंग अनुभवतील. संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे. तुमची मते त्यांना पटणार नाहीत. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. या क्षेत्रात एकापेक्षा अनेक कामे करण्याची शक्यता आहे. तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे जवळची माणसे दुखावतील. व्यवसायात कागदपत्रांमुळे कामे अडली असतील तर या महिन्यात ती कामे पूर्ण होतील. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कवी, लेखक यांच्या हातून चांगले साहित्य निर्माण होईल. सखोल चिंतनामुळे कामाचा दर्जा सुधारेल. |
ऑक्टोबर २०२३ | घरातील दोन पिढ्यांच्या विचारातील तफावत तुम्हाला बरीच अस्वस्थ करून जाईल. जुन्या विचारांना चिकटून बसल्यामुळे युवा पिढीशी मतभेद होतील. अशावेळी मेंदू आणि मनावरचा ताण घालवण्यासाठी उपासना आणि प्राणायामाचा आधार घ्या. मुलांच्या करियरच्या दृष्टीने थोडी वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त कल राहील. जवळचे प्रवास होतील. थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल. पचेल आणि सोसेल तेच खाणे आवश्यक आहे. काही लोकांना आवश्यक तेथे शस्त्रक्रिया करावी लागेल. आर्थिक प्रश्न असतील पण कर्जाऊ रक्कम मिळू शकते. |
नोव्हेंबर २०२३ | बरेच दिवस नोकरी धंद्यात येणाऱ्या अडचणींना तोंड दिलेत पण आता त्यावर मात करून अनेक कामे मार्गी लावाल. परंतु घरी वेळ थोडा कमी दिल्यामुळे वैवाहिक जीवनाचे वादाचे प्रसंग उद्भवतील. एकाचवेळी अनेक कामे करताना थोडा वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. धंद्यात बरेच पैसे अडकल्याने त्याबाबत जास्त प्रयत्न करावे लागतील, यासाठी तुमची धोरणे थोडी बदलावी लागतील. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपण त्याचा सामना कसा करू शकतो हे या महिन्यात जगाला दाखवून द्याल. कामाचा उरक चांगला राहील. काळ काम वेग याचे गणित उत्तम जमवाल. |
डिसेंबर २०२३ | घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. नोकरी धंद्यात नवनवीन संशोधन करून वरिष्ठांना खूष ठेवाल. शिक्षणक्षेत्रात काम करणारांना काम केल्याचे समाधान मिळेल या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची नवीन दालने खुली करून देण्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. व्यवसायात पार्टनरबरोबर जमवून घ्यावे लागेल. जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. प्रेमप्रकरणात यश येईल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. |