वार्षिक राशिभविष्य २०२३ : सिंह
सिंह राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची –सिंह’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे सिंह राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,
मोडेन पण वाकणार नाही या वृत्तीमुळे यांचे नुकसान होऊ शकते. यांना कोणी धरलेलेही आवडत नाही. भरपूर ऊर्जा आणि आशावाद असलेली ही रास आहे. औदार्य, कर्तृत्व आणि स्वावलंबित्व या गुणांमुळे हे लोक पुढे जातात. या वर्षी राशीच्या सप्तमस्थानातून शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग आले तरी निभावून न्याल. प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशासंदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील.
घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषत: आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूंच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. दमा, संधीवात असणाऱ्यांनी प्रकृती सांभाळावी. प्रवासाचे योग वरचेवर येतील. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. तसेच राशीच्या अष्टम आणि भाग्यस्थानी होणारे गुरूचे भ्रमण तुम्हाला बरंच काही देऊन जाणार आहे. भाग्याची साथ मिळेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. स्वत:चा आत्मविश्वास वाढेल. मूळच्याच उदार व्यक्तिमत्त्वाला खतपाणी मिळून दानधर्म करण्याचे योग येतील.. बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. अधिकाराच्या जागेवर असणारांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान.
जानेवारी २०२३ | नवीन वर्षामध्ये अनेक संकल्प केले असतील. लक्षात ठेवा संकल्पामध्ये अर्धी सिद्धी असते… त्यामुळे नक्कीच हे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होणार आहे. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे आणवेल. ज्यांना पाठीचे दुखणे, रक्तदाब, हार्टचा त्रास आहे स्थानी पथ्यपाणी सांभाळा. आर्थिक घडी चांगली बसल्यासारखी वाटली तरी खर्चामुळे पैशाला अनेक वाटा फुटतील. |
फेब्रुवारी २०२३ | तुमच्यावर विसंबून राहून बऱ्याच कामांच्या जबाबदान्या या महिन्यात तुमच्यावर टाकण्यात येणार आहेत. या विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल, स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल, घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. कलाकारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छूना हवा तसा जोडीदार मिळेल. घरात मंगलकार्य ठरतील. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सावध रहावे. स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर द्यावा. |
मार्च २०२३ | कोणत्याही संघर्षाला तयार रहाल, फक्त कोणतेही आर्थिक निर्णय न घेतलेलेच बरे. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. कुटुंबात ताणतणाव जाणवला तरी प्रेमपूर्वक वातावरणात सर्व ताण विरून जातील. थोडा अहंकार बाजूला ठेवायला हवा. नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे पहिल्या पंधरवड्यात उरकून घ्या. विद्याथ्र्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. |
एप्रिल २०२३ | अनेक लोकांना योग्यवेळी संधी द्यायला तुम्ही मागेपुढे पहाणार नाही. आर्थिक घडी अजूनही म्हणावी अशी न बसल्यामुळे विचारात पडाल. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कधीतरी अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल. कुटुंबातील इतर व्यक्तीमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जरी जाणवली तरी सर्व गोष्टींवर मात करण्याची ताकदही मिळेल. संतीतबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअरसंबंधी चिंतेत पडाल. घरापासून दूर प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. |
मे २०२३ | एखाद्या गोष्टीची व्यवस्थित मांडणी करून तिचे योग्य पद्धतीने आविष्करण करणे या महिन्यात तुम्हाला चांगले जमेल. त्यासाठी जरा जास्त दगदग आणि कष्ट करावे लागतील. आर्थिक दृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीने त्रास उत्पन्न होऊ शकतात. अर्धांगवायू, वातविकाराचा त्रास असणारांनी डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक. परदेशगमनासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी योग्य दिशेने प्रयत्न करा. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. |
जून २०२३ | या महिन्यात मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. स्वतःची छाप इतरांवर फार पटकन पाडाल. आपले विचार लोकांवर लादण्यात यशस्वी ठराल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. नोकरी व्यवसायात अनेक कामे चिकाटीने पूर्ण कराल. आर्थिक बाजूही सुधारेल. अत्यंत विचार करून, व्यवहाराला धरून पैसा खर्च कराल. मोजकं बोलून, शांत राहून आपली कामे साध्य कराल. कोळसा, लोखंडी सामानाचा व्यापार करणारांना पैसा मिळेल. वैवाहिक जीवनात भावना आणि विचार यांचे अपरिपक्व रूप समोर आल्यामुळे थोडे गैसमज होण्याची शक्यता आहे. |
जुलै २०२३ | विचारापेक्षा कृतीला जास्त महत्त्व देत आल्यामुळे कधीतरी या महिन्यात तुमच्या हातून अविचारही होऊ शकतो. त्यासाठी एखाद्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करा. प्रवासाचे बेत आखाल परंतु प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. परंतु या भेटीगाठींमध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व दिल्याचे जाणवेल. आर्थिक चणचण भासणार नाही. ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो. व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. |
ऑगस्ट २०२३ | खूप दिवस वाट पहात असलेले आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. थोडीशी चैन, खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. कुटुंबात खेळीमेळीचे, आनंदी वातावरण राहिल्यामुळे मनःस्वास्थ्य लाभेल. परंतू तुमच्या भूडी स्वभावाचे दर्शनही इतरांना घडेल. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा स्वभाव असल्यामुळे आनंद निर्भेळ उपभोगू शकणार नाही. आपली महत्त्वाकांक्षा पूरी करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंबन करणे चांगले. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नका. जुनी दुखणी डोके वर काढतील. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास संभवतो. कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल. |
सप्टेंबर २०२३ | या महिन्यात स्वतःच्याच कोषात तुम्ही जास्त वावरणार आहात. त्यामुळे इतरांच्या स्वभावाचा अंदाज तुम्हाला नीटसा येणार नाही. परंतु तुमच्यातील आनंदी वृत्ती इतरांना सुखावून जाईल. वाचन, लिखाण करायला सवड मिळेल. प्रवासाचे योग येतील. ज्यांना विवाह करायचाय त्यांनी जोडीदार शोधण्याची मोहिम हाती घ्यायला हरकत नाही. बिनधास्तपणा तुमच्या नसानसात असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक येईल. घर बदल करण्याचे योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. व्यवसायात अपेक्षित पैसे लवकर हाती न पडल्यामुळे स्पर्धक त्याचा फायदा घेतील. |
ऑक्टोबर २०२३ | कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्यनिष्ठेने त्या पारही पाडाल. यावेळी आर्थिक तोंडमिळवणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी कष्ट घेतलेत तरी मनाजोगे यश मिळणार नाही. नेत्रविकारावर इलाज करावा लागेल. परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणा आढळणार नाही. उत्तरार्धात जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक घडी बसण्यासाठी हातभार लागेल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहिल्यामुळे नोकरी व्यवसायात त्याचा कामावर परिणाम होईल. लेखकांना लिखाणास उत्कृष्ट काळ आहे. |
नोव्हेंबर २०२३ | त्या महिन्यात तरुणवर्ग प्रेमप्रकरणामध्ये रोखठोक व्यवहार करेल. घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहिले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही. किती प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. तुमच्यातील कलेला समाजातील लोकांची दाद मिळेल. कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढे जाल, समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. |
डिसेंबर २०२३ | मैदानी खेळ खेळणारांना हा महिला चांगली संधी घेऊन येणार आहे. शेरास सव्वाशेर बनाल आणि कौतुकास पात्र ठराल. बाह्य जीवनात कितीही स्पर्धांना, संकटांना तोंड द्यावे लागले तरी मनःशांती ढळू देऊ नका, हा ग्रहांचा तुम्हाला संदेश आहे. बुद्धीच्या जोरावर, धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल. राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. |