वार्षिक राशिभविष्य २०२३ : वृश्चिक

वृश्चिक राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – वृश्चिक’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे वृश्चिक राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

पटकन भावना व्यक्त न करणारी ही मंडळी. खूप भावनाप्रधान असतात. पण आपलं शल्य फारसं कुणाला सांगत नाही. अचूक टेहळणी आणि बिनचूक हेटाळणी यांनीच करावी. ही लोकं जे काम स्वीकारतात त्यात यशस्वी होतात.

राशीच्या चतुर्थस्थानातून यावर्षी शनीमहाराजांचे भ्रमण चालू असणार आहे. घर बदलाचे विचार प्रकर्षाने मनात येतील. गृहसौख्य चांगले मिळेल. परंतु सुख मानून घेण्याची सुद्धा एक प्रकारची वैचारिकता लागते. ती कमी पडल्यामुळे थोडी निराशावादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. संधीवात, दमा, पायदुखी यासारखे आजार बळावतील. त्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. गुप्त शत्रू डोके वर काढतील. शनीबरोबर असलेल्या नेपच्यूनमुळे झोपेचे प्रॉब्लेम येऊ शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. याबरोबरच राशीच्या पंचम व षष्ठ स्थानातून होणारे गुरूचे भ्रमण आर्थिक परिस्थिती मात्र सुधारून टाकेल. त्यामुळे एप्रिल २०२३ नंतर बरीच कर्जफेड तुमच्या हातून होऊ शकेल. नोकरी व्यवसायात अचानक बदली, पगारवाढ यासारख्या गोष्टी पडतील, परदेशगमनाचे योग येणार आहेत. कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य चांगले मिळेल त्यामुळे एक प्रकारचा उत्साह अंगी संचारेल, भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात साम, दाम, दंड, भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल.

जानेवारी २०२३दुसऱ्याना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील.
फेब्रुवारी २०२३कामाच्या वेळी फक्त कामच करणारे तुम्ही लोक. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. परंतु त्यासाठी थोडा संघर्षही करावा लागेल. दुसऱ्यातील अवगुण शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा विकास करण्यावर भर द्यावा. आहे त्या परिस्थितीत बदल करण्याचा मार्ग पत्कराल. व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करत रहाल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी.
मार्च २०२३शत्रूला पूर्णपणे कोंडीत पकडून होश के साथ मर्मांतक प्रहार करण्यावर तुमचा भर राहील. या महिन्यात तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. नोकरीत वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागले तरी काम फत्ते केल्यामुळे त्यांची मर्जी राहील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी रहाल. तरुणांच्या अती आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही.
एप्रिल २०२३खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडणार नाही किंवा टीकेने तुम्ही कोमेजणार नाही. या स्वभावामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील. नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कधीकधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचारही होऊ शकतो. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. शरीर, मनावरचा ताण हलका करण्यासाठी, प्राणायाम, ओंकारसाधना आवश्यक ठरेल, महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. या कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल.
मे २०२३या महिन्यात तुमच्या नवीन भन्नाट कल्पना लोकांच्या पचनी लवकर न पडल्यामुळे थोडी आग्रही भूमिका ठेवाल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. अविचाराची लक्ष्मणरेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल.
जून २०२३या महिन्यात धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरातील लोकांच्या वागण्याचे गूढ तुम्हाला उलगडल्यामुळे थोडे संभ्रमात पडाल. त्यामुळे उगीचच ताणतणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. वेळच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र लक्षात ठेवा.
जुलै २०२३या महिन्यात लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सुम दरारा निर्माण कराल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. मी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना आता मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे बऱ्याच जणांचे उसने घेतलेले पैसे देऊन टाकाल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल, संवाद वाढेल आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते.
ऑगस्ट २०२३अगदी साधी गोष्टसुद्धा संघर्षाशिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाणवाल. परदेशगमनासाठी अडचणी उद्भवतील. नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही कायम पुढे रहाल. तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा असे सांगणारा हा महिना आहे. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत बरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
सप्टेंबर २०२३फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही उभे रहाण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्हाला आवश्यक वाटणारी सुखे हात जोडून तुमच्यापुढे उभी रहातील. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वतःमध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. घरामध्ये मनपसंद बदल करण्यात शक्ती खर्च कराल. येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाईल.
ऑक्टोबर २०२३आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला दिले तर तुम्ही खूष असता. हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत त्यांनी औषधोपचार, आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. मनातील सुम इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. अधिकाराची इच्छा आणि संशोधन वृत्ती यांचा सुंदर मेळ या महिन्यात झालेला दिसेल. थोडा अती स्पष्टवक्तेपणा टाळायला हवा.
नोव्हेंबर २०२३स्वतःची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कटाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल.
डिसेंबर २०२३या महिन्यात स्वतःला इतरांपेक्षा हटके समजण्यात धन्यता मानाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करवून घ्याल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंत:स्फूतींच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: