वार्षिक राशिभविष्य २०२३ : धनु

धनु राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – धनु’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे धनु राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

शौर्य गाजवणे, स्वामीनिष्ठा आणि उमदेपणा या गुणांमुळे तुम्ही उठून दिसता. बुद्धी आणि गती यांचा सुरेख संगम तुमच्या राशीत आढळतो. प्रचंड धाडस आणि कर्तृत्व हा तुमचा प्राण आहे. इतरांना समावून घेण्याची, पटवून घेण्याची तुमची वृत्ती आहे.

राशीच्या तृतीय स्थानातून शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे. संततीशी न पटणे, संततीला त्रास होणे, त्यांना काही अडचणी येणे अशा घटना घडू शकतात. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. देशांतर्गत प्रवास होतील. लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आध्यात्मिक उन्नती होईल, -परदेशी जाण्यासाठी जी कागदपत्रे तयार करावी लागतात ती लवकर होणार नाहीत, त्यात दिरंगाई होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. तसेच राशीच्या चतुर्थ आणि पंचम स्थानातून गुरूदेवाचे भ्रमण होणार आहे. २३ एप्रिलपर्यंत करियरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल आणि त्याचे लाभ नंतरसुद्धा चांगले मिळतील. आध्यात्मिक प्रगती हा गुरु चांगला देईल. कोणतेही संशोधन चांगले कराल. अचानक धनलाभ होऊ शकतात. आवश्यक ते लाभ निश्चित होतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पायाच्या दुखण्यामुळे हैराण होण्याची शक्यता आहे.

यावर्षी तुमचे ग्रहमान काय सांगते ते बघूया.

जानेवारी २०२३दुसऱ्यासाठी जास्तीत जास्त काम कराल. दुसऱ्यांच्या मताचा आदर कराल. कधी कधी दुसऱ्याचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. आपली कामे करून घेण्यासाठी एखादेवेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. घरामध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल.
फेब्रुवारी २०२३विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. या दोन्ही टोकाच्या गोष्टींचा अनुभव या महिन्यात घेणार आहात. अभिनय क्षेत्रात काम करणारांची कला बहरून येईल. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कलाकारांना येईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे. पूर्ण स्वार्थ व स्वार्थ त्याग अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. तुमच्याकडे चांगुलपणा असला तरी कधी कधी तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलिकडे राहील.
मार्च २०२३आपल्या हातून घडलेली एखादी चूक प्रांजळपणे कबूल करून तुम्ही रिकामे होणार आहात. फाजील आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. मुले बनतील. घरात चैनीच्या गोष्टी खरेदी करण्याचा उत्साह राहील. विवाह व्हायचा आहे त्यांनी आपला जोडीदार शोधावा. जवळच्या व्यक्तीसाठी सगळ्या जगाशी दुष्मनी घ्याल परंतु त्या व्यक्तीला जर त्याची किंमत नसेल तर मात्र चिडून उठणार आहात. घराभोवती बाग असेल तर त्याकडे लक्ष द्याल.
एप्रिल २०२३अथक प्रयत्नानंतर सुद्धा यश मिळत नाही असे वाटल्यास निराशेने प्रयत्न सोडून देण्यास तयार व्हाल. परंतु अशावेळी थोडे आत्मपरीक्षण करून कुठे चुकते. यांचा शोध घ्या. मानसिक अवस्था दोलायमान रहाणार असली तरी पूर्वीचा अनुभव, बुजूर्ग लोकांचा सल्ला, तुम्हाला असलेले ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. उत्तरार्धात भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील.
मे २०२३समाजामध्ये पुढारीपण मिळण्याची ताकद तुमच्याकडे येईल. अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. कोणत्याही मोहाच्या फंदात न पडता वास्तवाचा शक्य तितका विचार करून आचरण ठेवणे फायदेशीर पडणार आहे. मूळचा तुमचा धाडसी स्वभाव उफाळून वर येईल. विद्याथ्र्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. मन एकाग्र करून केलेला अभ्यास तुम्हाला यशाप्रत नेणार हे नक्की. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ प्रकृतीसाठी उपयोगी पडेल.
जून २०२३या महिन्यात तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक मान सुधारले तरी जवळ पैसा रहाणार नाही. या महिन्यात शक्यतो कर्ज काढू नये. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. उत्तम नियोजनामुळे नोकरीत कौतुकास पात्र ठराल.
जुलै २०२३या महिन्यात महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याची शक्यता आहे. व्यवसायात कष्ट जास्त पण त्यामानाने पैसा मात्र लगेच दृष्टी पडणार नाही. कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. धर्माविरूद्ध वागणाऱ्याला शासन करण्याचे कार्य तुमच्या राशीतला बाण करणार आहे. करियरमध्ये हेच सूत्र वापराल आणि कामे पूर्ण कराल. विवाहेच्छूकांचे विवाह ठरतील. जोडीदार उत्तम आणि सुसंस्कृत मिळेल.
ऑगस्ट २०२३या महिन्यात दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजायला जाल परंतु लोकांना ते पाल्हाळ वाटेल आणि ते कंटाळून जातील. तेव्हा जेथे तुमच्या शब्दाला किंमत आहे तेथेच बोलायचे हे ठरवून टाका. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढाच खर्चिकपणाही वाढेल. अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल. व्यवसायात सर्व कामे एकट्याने करण्यापेक्षा योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. रक्तदोष, हिमोग्लोबिन कमी होणे, अशक्तपणा यावर वेळीच इलाज करा. महिन्याच्या शेवटी उगीचच थोडा आळशीपणा, सुस्तपणा वाढेल.
सप्टेंबर २०२३नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. दानधर्म कराल, बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण उत्साही, आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. प्रेमात आणि युद्धात सगळेच क्षम्य असते असे म्हणतात याचा अनुभव तरुणवर्ग घेणार आहे.. ज्येष्ठांनी बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये बदलण्याची मानसिकता ठेवली तर वाद टळतील.
ऑक्टोबर २०२३नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाल. स्त्रीवर्गाच्या मध्यस्थीमुळे बरीच कामे पार पडतील. जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. आपल्या स्वतंत्र विचाराचा अभिमान बाळगाल परंतु सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता. व्यवहार आणि भावना या स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याची गल्लत केलीत तर मनःस्वास्थ्य बिघडेल. स्वतःची कामे स्वत:च केलेली बरी पडतील.
नोव्हेंबर २०२३मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या, निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. परंतु हे करीत असताना समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. न बोलून शहाणे असणाऱ्या लोकांशी गाठ पडेल. इथे. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. सामाजिक • क्षेत्रात काम कराल. कष्टाला तुम्ही कधीच घाबरत नाही परंतु द्विधा मनःस्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक रहाण्याकडे कल राहील.
डिसेंबर २०२३कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्यामुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. तरुणांच्या विवाहाबद्दलच्या आधुनिक कल्पना ऐकून मोठी माणसे चक्रावून जातील. धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. पुढील वर्ष नवीन आनंदाची पहाट घेऊन येणार आहे तेव्हा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: