महाबळेश्वरच्या वाटेवर…

‘गिरीस्थान’ किंवा Hill Station म्हणलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर नाव येतं ते महाबळेश्वरचं. वर्षभरात या महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक येतात. हिरवाईने नटलेला निसर्ग, हवेतला गारवा, इथले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ यामुळे आपोआप आपण महाबळेश्वरकडे खेचले जातो. व्यवसायाच्या निमित्ताने माझी कायमच महाबळेश्वरला भेट असते. वास्तविक वाई ते महाबळेश्वर जास्तीत जास्त ३० किलोमीटरचं अंतर. पण या इवल्याश्या अंतरामध्येदेखील काही गंमती-जमती दडल्या आहेत. त्या तशा दडलेल्या नाहीत, पण काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. यातल्याच एका गंमतीबद्दल मी आज लिहिणार आहे. महाबळेश्वरचं आत्ताचं रूप आपल्याला सर्वज्ञात आहेच. पण महाबळेश्वरचा इतिहास काय किंवा मूळचं धार्मिक क्षेत्र असलेलं महाबळेश्वर गिरीस्थान कसं झालं हे थोडक्यात जाणून घेण गरजेचं आहे.
इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात यादव साम्राज्याचं वर्चस्व होतं.यादव राजा सिंघणदेव याने इ.स.१२१५ मध्ये महाबळेश्वरला भेट दिल्याचे उल्लेख काही कागदपत्रांमध्ये सापडतात. महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिर(जुने) या सिंघणदेवाने बांधले असे म्हणतात.बाबाजी कोळी नावाच्या एका स्थानिकाकडे त्याने या मंदिराचे व्यवस्थापन सोपवले. इथून जवळच असलेल्या नांदगणे गावामध्ये सिंघणडोह नावाचा एक डोह आहे. काही स्थानिकांच्या समजुतीनुसार या डोहामध्ये सिंघणदेवाने स्नान केले. कालांतराने बहमनी सुलतानांचे वर्चस्व वाढले, आणि हा सगळा परिसर आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर हा परिसर स्वराज्यात आला. जवळच असलेल्या भोरप्याच्या डोंगरावर महाराजांनी प्रतापगड बांधला.त्याच कालावधीमध्ये इथे महाबळेश्वराचे मंदिर बांधले आणि या मंदिराला वर्षासन लाऊन दिले. पेशवाईच्या काळात सवाई माधवराव पेशव्यांनी महाबळेश्वरला भेट दिल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी सापडतात. त्यावेळी त्यांच्यासोबत नाना फडणवीस आणि ब्रिटीश राजदूत सर चार्ल्स मॅलेट हे दोघे उपस्थित होते. मॅलेट हा महाबळेश्वरला भेट देणारा पहिला ब्रिटीश अधिकारी असे म्हणता येईल. या सर्व परिसराला त्यावेळी ‘क्षेत्र महाबळेश्वर’ असं नाव होतं. आजही हा परिसर याच नावाने ओळखला जातो.
सन १८१८ नंतर भारतावर ब्रिटीशांचा अंमल सुरु झाला. आपल्या विरंगुळ्यासाठी किंवा हवापालट म्हणून ब्रिटिशांनी जुन्या प्रवाशांच्या नोंदींचा आधार घेऊन नवीन नवीन ठिकाणांचा शोध सुरु केला. पुणे,सातारा,वाई हा सर्व परिसर त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अधिपत्याखाली होता. भारतातील सर्व संस्थाने नामधारी होणार हा संभाव्य धोका ओळखून सातारा गादीचे महाराजा प्रतापसिंग यांनी २५ सप्टेंबर १८१९ मध्ये ब्रिटीश शासनासोबत मैत्री करार केला. महाराजा प्रतापसिंग यांचे महाबळेश्वर परिसरावर विशेष प्रेम होते. ब्रिटीश साम्राज्यासोबत झालेल्या मैत्री कराराचा फायदा घेऊन त्यांनी महाबळेश्वर परिसराचा कायापालट सुरु केला. ब्रिटीश अधिकारीदेखील एका नवीन ठिकाणाच्या शोधात होतेच, त्यामुळे महाबळेश्वरकडे या अधिकाऱ्यांची वर्दळ वाढू लागली.सन १८२३ मध्ये कर्नल ब्रीग्स हा सातारा रेसिडेन्सीचा प्रमुख अधिकारी म्हणून नेमला गेला.
ब्रीग्स आणि त्याचा सहकारी मेजर लॉडवीक या दोघांनाही महाबळेश्वरबद्दल विशेष आकर्षण होते. १८२४ च्या एप्रिल महिन्यात लॉडवीकला उष्माघाताने त्रस्त केले.यावर इलाज म्हणून तो महाबळेश्वरला काही काळ वास्तव्य करू लागला. लॉडवीकने करून ठेवलेल्या नोंदींमुळे महाबळेश्वर परिसर,इथली नैसर्गिक वैविध्यता, थंड हवामान या सगळ्याची ख्याती सर्वदूर पसरली. त्याच्या एका नोंदीमध्ये लॉडवीक म्हणतो, “महाबळेश्वरचे हवामान सध्या ७१ fahrenhaet (अंदाजे २२ सेल्सियस) आहे, ते जास्तीत जास्त ८१ fahrenheit (अंदाजे ३० सेल्सियस) पर्यंत वाढेल पण त्यापुढे वाढणार नाही असे वाटते.”१८२७ मध्ये जॉन माल्कम हा प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर झाला. २७ एप्रिल १८२८ रोजी महाराजा प्रतापसिंग यांच्या आमंत्रणावरून माल्कमने महाबळेश्वरला भेट दिली. याच माल्कमच्या प्रयत्नांतून महाबळेश्वरचा पूर्णपणे कायापालट झाला. अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आपल्या निवासी बंगल्यांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. १८२९ च्या सुमारास महाबळेश्वर एक सुखसोयींनीयुक्त असे आरोग्यकेंद्र आणि गिरीस्थान म्हणून घोषित करण्यात आले. जॉन माल्कमच्या महाबळेश्वर भेटीचे प्रतिक म्हणून एक पेठ वसवण्यात आली. हीच ती महाबळेश्वरची प्रसिद्ध ‘माल्कम पेठ’. कालांतराने अनेक व्यापाऱ्यांनी या पेठेमध्ये आपले बस्तान बसवले आणि महाबळेश्वर एक महत्त्वाचे पर्यटनक्षेत्र म्हणून नावारूपास आले. कालौघात महाराजा प्रतापसिंग आणि ब्रिटीश सरकार यांच्यात मतभेद झाल्यामुळे इतर साम्राज्यांप्रमाणे मराठ्यांची सातारा गादीदेखील खालसा करण्यात आली.
मुंबईकडून महाबळेश्वरकडे येणारे दोन प्रमुख मार्ग आहेत. महाड,पोलादपूरमार्गे येणारा मार्ग, दुसरा म्हणजे पुणे-वाई-महाबळेश्वर मार्ग. पोलादपूरमार्गे येणारा मार्ग तुलनेने अवघड असल्याने कालांतराने वाईकडून येणाऱ्या मार्गाची व्यवस्थित बांधणी करण्यात आली. मुंबईहून निघालेले ब्रिटीश अधिकारी पुणेमार्गे रेल्वेने वाठारला येत. तिथून गाडी किंवा बग्गीत बसून वाईपर्यंत येत. वाईमध्ये बग्गीचे घोडे बदलले जात आणि अधिकारी पसरणी घाटातून महाबळेश्वरकडे मार्गस्थ होत असत.आमच्या गोशाळेच्या थोडं पुढे घोड्यांचा टप्पा होता. याच ठिकाणी बग्गीचे घोडे बदलले जात असं मी वाईतील जुन्या जाणत्या व्यक्तींकडून ऐकून आहे. सन १८६५ मध्ये बार्टल फेरर याने महाबळेश्वरमध्ये स्वत:च्या बंगल्याचे बांधकाम केले. या बंगल्यापासूनच महाबळेश्वरपासून मुख्य गावांचे अंतर मोजण्यात आले. इंग्रज अधिकाऱ्यांनी बसवलेला महाबळेश्वरपासून मुख्य गावांचे अंतर दाखवणारा मैलाचा एक दगड आजही या फेरर हॉल म्हणजेच आत्ताच्या शासकीय विश्रामगृहाजवळ पहायला मिळतो. या दगडावर नोंदवलेली अंतरे मैलाच्या प्रमाणात आहेत. MWAR 0 (महाबळेश्वर ०),PANCHGANI ११ (पाचगणी ११), POONA 74 (पुणे ७४), SURUL 26 (सुरूर २६) अशी ही अक्षरे आहेत.
वेण्णा लेकवरून महाबळेश्वर मार्केटकडे जाऊ लागलं की वाटेत हिरडा नाका लागतो. इथेच हा मैलाचा दगड महाबळेश्वरचा इतिहास अंगा-खांद्यावर बाळगून, ऊन-पावसाचे तडाखे सोसत उभा आहे.हा दगड इतका जर्जर झाला आहे की त्यावरची अक्षरेसुद्धा नीट दिसत नाहीत. महिनाभरापूर्वी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा याच परिसरात ट्राफिकमध्ये अडकून पडलो आणि सहज या दगडावर नजर गेली. हा दगड साधा नाही हे लक्षात आल्यावर त्याच्यापुढच्या भेटीमध्ये मुद्दाम गाडी थांबवली आणि पावसात जमतील तसे फोटो काढून घेतले. या फोटोंच्या निमित्ताने का होईना पण महाबळेश्वरच्या इतिहासात डोकावून पहायला मिळालं हीच काय ती सकारात्मक गोष्ट.
संदर्भ :
MAHABALESHWAR : D.B.Parasnis.
Satara Gazeteer.
लेखक – © आदित्य चौंडे.
छायाचित्रे – © आदित्य चौंडे.

लिखाणाचे कॉपीराईटस आदित्य चौंडे यांच्याकडे आहेत.

★★★★★

वाई पर्यटनला इन्स्टाग्रामवर फॉलो करा : https://www.instagram.com/wai_tourism_official/

https://www.instagram.com/aditya_chounde/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: