साडेसाती

साडेसाती संपल्याबद्दल धनुवाल्याने पार्टी ठेवली होती. मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यावर त्याने आपले साडेसात वर्षांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. काय कमावलं काय गमावलं, काय शिकायला मिळालं वगैरे अनुभव सांगत जमलेल्यांना मार्गदर्शन करत होता.

धनुवाल्याचे अनुभव ऐकून इकडे मीनवाल्याला घाम फुटला. त्याची साडेसाती सुरू झाली होती. असंही तो ब्लडप्रेशरचं मशीन घेऊनच बसला होता. काही कारण नसताना सुतक लागल्यासारखा चेहरा करून भाषण ऐकत होता.

तो प्रकार बघून वृश्चिकवाल्याचं टाळकंच फिरलं. आपलीसुद्धा ढैया अर्थात पनवती चालू झालेली समजल्याने त्याने थोडा संयम बाळगला. पण तो फार काळ टिकला नाही. न राहून शेवटी त्याने मीनवाल्याला चार गोष्टी ऐकवल्याच. त्या ऐकून मीनवाला वाद घालू लागला.

त्या वादात थेट उडी न घेता मिथुनवाल्याने हात धुवून घेत दोन चार कोपरखळ्या मारून घेतल्या, आग पेटती ठेवली आणि जागेवर जाऊन मज्जा बघत बसला.

हे एकीकडे सुरू असताना कर्कवाला शून्यात नजर लावून काहीतरी विचार करत होता. त्याचीसुद्धा अडीच वर्षांची पनवती सुरू होणार होती. पण त्याला एकंच विचार सतावत होता की जर पनवती जर आत्ता सुरू झाली आहे असं म्हणतात तर आतापर्यंत जे सुरू होतं ते काय होतं

कुंभवाला आता चांगली वेळ येणार आहे काही उद्योग नको करायला या हेतूने आपण या वादात न पडणं उत्तम असा प्रगल्भ विचार करून गपचूप सगळ्या गोष्टींचं अवलोकन बसला.

कन्यावाल्याला दोन्ही बाजू पटत होत्या त्यामुळे कोणाच्या साईडने जाऊ हा विचार करेपर्यंत वाद संपत आला होता. मीनवाल्याचं टेंशन बघून त्यानेही ब्लडप्रेशर चेक करून घेतलं. किंचित वाढल्यासारखं वाटत होतं. भाषण आणि वाद दोन्ही बाजूला ठेऊन आता आपलं काय होईल या विचाराने तो व्याकुळ झाला.

कन्या वाल्याला बघून मेषवाल्याची सटकली. तो आधीच भाषणाला कंटाळला होता. साडेसाती कायमचीच असल्याने त्याला काही कौतुकही नव्हतं. सुरू असलेल्या वादाच्या रुपात त्याला आयताच टाईमपास सापडला. वृश्चिकवाल्याची थेट बाजू घेऊन आता याला मी बघतो या आवेशात त्याने वादात उडी टाकली.

इकडे धनुवाल्याचे आपल्यासारखेच अनुभव ऐकून वृषभवाल्याच्या डोळ्यात पाणी आलं पण मेकअप खराब होऊ नये म्हणून डोळ्यातून टिपूससुद्धा पडू दिला नाही. आता आपण कोणत्याच वादात पडायचं नाही हे ठरवून तो धनुवाल्याच्या रुपात स्वतःला बघू लागला.

सिंहवाला स्टेजवर ऐटीत बसला होता. तो कार्यक्रम प्रमुख होता. धनुवाल्याचं भाषण झाल्यावर त्याला भाषण करायचं होतं. पण लोक चालू असलेला वाद बघत बसले तर माझं भाषण कोण ऐकणार म्हणून तो मध्यस्थी करायला उतरला.

तूळवाल्याला कशाचाच काही फरक पडत नव्हता. कुत्ता जाने और चामडा जाने म्हणत होता पण दोन्हीकडे लक्ष ठेऊन होता. आत्ताच पनवती बघून आला असल्याने सर्वात शांत तोच होता.

भाषण ऐकून मकरवाला यापेक्षा जास्त तर आपण भोगलंय असा विचार करत बसला होता. शनी पुढच्या राशी जावो नाहीतर मागच्या आपल्या नशिबात बदल काही होत नाही. असो म्हणत सुस्कारा टाकत घरी कसं जायचं विचार करू लागला.

आपल्या अनुभवकथनापेक्षा वृश्चिक आणि मीनेचा वाद जास्त इंटरेस्टिंग होत आहे हे लक्षात येऊन धनुवाल्याने भाषण आटोपतं घेतलं. ते लक्षात येताच सिंहवाल्याने एकदाच आवाज चढवला आणि माहोल शून्य मिनिटात शांत झाला. अर्थात पुढचं भाषण त्याचंच होतं !!!

बारा राशीची ही अवस्था बघून सुर्य चंद्र थोडे मिश्किलपणे हसले व मनात म्हणले अरे आम्ही. तर इंद्र दरबारी कायमच हजर असतो सर्व देवधी देवांमधे आमची उठबस असते तरी देखील आम्ही अळीमिळी
गुपचिळी असे आमचे वागणे आहे आम्ही पणं आमचे भोग भोगून घेतले कुणाशी वाद घातला नाही की तक्रार केली नाही आमच्यासाठी देवांनी वेगळे नियम दिले नाहीत आम्हीही कंटाळलो आहोत पणं नियती जशी क्रूर असते तशी दयाळू पणं असते नेहमी जशी ती वाईट गोष्टी पदरात टाकते तश्या चांगल्या गोष्टींनी पणं आपले पारडे जड करते फक्त थोडा संयम ठेवा ,त्यांचे नामस्मरण करा ही वेळही टळून जाईल ,हीच तर परीक्षा तो तुमची बघतो आणि पास झालात तर भरभरून कधीही न संपणारे दन तुमच्या झोळीत टाकतो, चंद्र म्हणाला मला डाग दिला पणं त्याच बरोबर असीम असे सौदर्य पणं दिले , सुर्य म्हणाला मला उष्णता दिली पणं त्याचवेळी जगावर परोपकार करून जीवांचे पालन पोषण करण्याची जबाबदारी दिली ह्या सर्व उपकाराने धरणीमाता माझे ऋण लक्षात ठेवून मला पूजेत मन देते ही काही माझासाठी थोडेथोेडके नाही त्या अनंत उपकाराने मी सर्व देवांचे आभार मानत माझे कार्य अव्याहतपणे चालू ठेवतो..थोड्या थोड्या गोष्टींनी नाराज होऊ नका ,ती तेवढेच दुःख देतो जेव्हढे तुम्ही सहन करू शकाल.. जेव्हढे जास्त दुःख तेवढेच जास्त सुख तुमच्या वाट्याला येणार आहे..

सुखी रहा समाधानी रहा, सतत कुरबुरी व तक्रार न करता आहे त्यात आनंद माना आपले कर्म करत रहा निश्चित आपले चांगले काहीतरी होईलच या आशेवर भगवंताचे नामस्मरण करत रहा..🙏🙏😊

(संकलन: टीम स्पंदन, साभार: लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: