श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले

शिवरायांच्या मृत्यूनंतर परकीयांच्या ताब्यात गेलेला रायगड पुन्हा मराठ्यांकडे आणणारे शाहूंचे मानसपुत्र आणि अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा हा अल्प परिचय…

अक्कलकोट जिल्हा सोलापूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले(लोखंडे) यांचा जुना राजवाडा. अक्कलकोट रॉयल फॅमिली.

११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजीराजे यांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर नऊ महिन्यांतच रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाई व पुत्र बालशिवाजी (शाहू) मुघलांचे कैदी बनले. पुढे १७०७मध्ये नगरमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर बादशहा बनलेला आजम दिल्लीच्या वाटेवर असताना त्याने भोपाळजवळील दारोहा येथून थोरले शाहूमहाराज यांची सुटका केली.

शाहूमहाराज आपले राज्य घेण्यासाठी दक्षिणेत येत असता त्यांच्याबरोबर असलेल्या सैन्याला पारद या गावी शहाजी लोखंडे-पाटील यांनी प्रतिकार केला. शाहूमहाराज यांच्यासोबत असलेले सैन्य शहाजी लोखंडे-पाटलावर चालून गेले. पारद या गावी छोटी लढाई होऊन त्यात गावचे पाटील मारले गेले. त्या वेळी त्यांच्या विधवा पत्नीने नुकतेच जन्माला आलेले मूल शाहू महाराजांच्या पायावर घालून अभय मागितले. शाहूमहाराजांनी हा आपला पहिलाच विजय मानून आनंदाने त्या मुलाचा स्वीकार केला. पारद गावी शाहूमहाराजांची फत्ते झाली. म्हणून फत्तेसिंह असे नाव ठेवून त्याला बरोबर घेतले. हा मुलगा म्हणजेच अक्कलकोट संस्थानचे संस्थापक फत्तेसिंहराजे भोसले होय.

पुढे त्यांच्या मुलांमध्ये तंटा निर्माण होऊन त्यांच्या तीन शाखा वेगवेगळ्या प्रांतावर आपापल्या परीने वर्चस्व गाजवू लागल्या. अक्कलकोट, पिलीव आणि राजाचे कुर्ले येथे फत्तेसिंहराजे भोसले यांचे पुढील वारसदार राहू लागले. राजाचे कुर्ले या गावी राजे-भोसले यांचा भुईकोट किल्ला आहे. जवळपास तीन ते चार एकर परिसरात हा किल्ला बांधण्यात आला आहे. तसेच पिलीव येथे जहागीरदारांचा मोठा किल्ला आहे.

शाहूमहाराजांचे पेशवे पहिले बाजीराव व फत्तेसिंह भोसले हे समवयस्क होते. शाहू छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर दिल्लीच्या बादशहाकडून दख्खनच्या सहा सुभ्याचे चौथाई आणि सरदेशमुखीपणाचे हक्क प्राप्त झाले. त्याचे वाटप शाहू छत्रपतींनी आपल्या सरदारांमध्ये करून त्यांचे क्षेत्र ठरवून दिले. फत्तेसिंह भोसले यांना शाहूमहाराज राजपुत्राप्रमाणे मानीत असत. त्यामुळे सहा सुभ्यांपैकी कर्नाटकाचा सुभा फत्तेसिंह भोसले यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. फत्तेसिंह भोसले यांना भागानगरचाही (हैदराबाद) सुभा मिळावा अशी शाहू छत्रपतींची इच्छा होती. त्यावेळी हा सुभा मुघलांच्या ताब्यात होता.

१७२५मध्ये शाहू छत्रपतींनी निजामाला रोखण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांना कर्नाटकात कामगिरी करण्याची आज्ञा केली. फत्तेसिंह भोसले यांनी चित्रदुर्गपासून पश्चिमेस सौंदे बिदनूरपर्यंतच्या सर्व खंडण्या वसूल केल्या. सर्व ठाणी मराठ्यांच्या हातची गेली होती, ती सोडवून परत आपल्या ताब्यात घेतली. गरजेनुसार जरब देऊन काम फत्ते केले. ही मोहीम १७२५पासून ते १७२६पर्यंत फत्तेसिंह भोसले यांच्या आधिपत्याखाली पार पडली.

यापूर्वीच सन १७१३मध्ये शाहू छत्रपतींनी दक्षिणेतील सहा सुभ्यांपैकी महत्त्वाचा असा हा कर्नाटकचा सुभा फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिला होता. या सुभ्यावर आपली हुकमत वाढावी म्हणून मोहिमेचे नेतृत्व फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिले होते. तंजावरचे सरफोजीराजे भोसले यांनाही मदत करण्याची आज्ञा फत्तेसिंह भोसले यांना दिली होती. त्याप्रमाणे तंजावरला जाऊन त्यांनी सरफोजीराजे भोसले यांची भेट घेतली. मोहिमेचे नेतृत्व फत्तेसिंह भोसले यांच्याकडे सोपवले गेले. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांनी आयुष्यातील पहिलीच लष्करी मोहीम पार पाडली.

तंजावरकर भोसलेंना अर्काटचा नबाब सादुल्ला खान त्रास देत असे. कोप्पळ, कर्नुल, कडप्पा, तिरुपती, व्यंकटगिरी, येलूर, जिंजी अशी तंजावरला जोडणाऱ्या प्रदेशांची ही साखळी. शिवछत्रपतींनी निर्माण केलेले हे स्वराज्य, छत्रपतींच्या निधनानंतर २७ वर्षे सतत औरंगजेबाशी झगडून मराठ्यांनी राखलेला हा प्रदेश आपल्या हातातून जाऊ नये या उद्देशाने कर्नाटकची मोहीम आखली होती.

या मोहिमेचे नेतृत्व अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांना मिळाले. फत्तेसिंह भोसले स्वारीस निघाले म्हणजे प्रतिनिधी व प्रधान यांनी त्यांच्याबरोबर स्वारीत जावे असा शाहू महाराजांनी निर्बंध केला होता. यावरून शाहू महाराजांनी त्यांना राजपुत्राला शोभेल अशी व्यवस्था केल्याचे दिसून येते. फत्तेसिंह भोसले यांना युवराजाप्रमाणे मान छत्रपती देत होते. त्यांचा सन्मान वाढवीत होते.

मार्च १७२६मध्ये कर्नाटकची मोहीम पार पाडून फत्तेसिंह भोसले सातारा येथे आले, तेव्हा शाहू छत्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्यांनी सर्व खजिना व झालेले वृत्त महाराजांना निवेदन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तख्ताची जागा रायगड ही परक्यांच्या ताब्यात होती. ती परत मराठी दौलतीत आणण्यासाठी शाहू छत्रपतींनी फत्तेसिंह भोसले यांना सांगितले. ही एक महत्त्वाची कामगिरी होती. या मोहिमेला जंजिरा मोहीम असे नाव होते. ही मोहीम सन १७३१पासून सन १७३४पर्यंत चालली आणि रायगड ही छत्रपतींच्या तख्ताची जागा मराठ्यांच्या परत ताब्यात आली. शाहू महाराजांच्या हुकुमाप्रमाणे काम करून फत्तेसिंह भोसले यांनी मोहीम तडीस नेली.

छत्रपतींनी रघुजी भोसले यांना स्वतःचे पुत्र मानले होते. त्यांना मुख्य सेनापती नेमून रघुजी फत्तेसिंह यांच्या मदतीला दिले होते. फत्तेसिंह हे पापभीरू व दयाळू स्वभावाचे होते. त्यामुळे स्वारीची सूत्रे रघुजींकडे आली. अर्काटचा नबाब व त्रिचनापल्लीस चंदाखानाची खोड मोडून रघुजीने पराक्रम केला होता; पण स्वतःचे निशाण त्रिचनापल्लीवर न चढवता फत्तेसिंह बाबांचेच निशाण चढवले गेले. यावरून रघुजी भोसले यांनी फत्तेसिंह भोसल्यांचा सन्मान राखण्यात कोणताही कमीपणा केला नव्हता.

मराठी साम्राज्य चौफेर वाढवण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांचा उपयोग मराठ्यांचे शूर पराक्रमी रघुजी भोसले यांनी करून घेतला होता. त्रिचनापल्ली ते मुर्शिदाबाद हा सारा मुलुख पराक्रमाने तोडून तो मराठी राज्यात सामील होण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांचे योगदान मराठी इतिहासाला विसरता येणार नाही.

शाहू छत्रपतींची एक राणी वीरूबाई फत्तेसिंह भोसले यांना पुत्रवत मानीत असे. शाहू छत्रपतींच्या इतर राण्यांपेक्षा वीरूबाईंचा मान सर्वांत मोठा होता. या वीरूबाईंना संतती नसल्याने फत्तेसिंह भोसले यांनाच त्या आपला पुत्र मानत होत्या. शाहू छत्रपतींच्या दोन राण्या सकवारबाई आणि सगुणाबाईसाहेब यांच्यावरसुद्धा वीरूबाईंची हुकमत चालत असे.

वीरूबाईंच्या मृत्यूवेळी फत्तेसिंह भोसले कर्नाटकात स्वारीवर गुंतले होते. फत्तेसिंह भोसले यांना वीरूबाई पुत्राप्रमाणे मानीत असल्याने त्यांचे उत्तरकार्य फत्तेसिंह भोसले यांच्या हातून पुढे केले गेले. वीरूबाईंची दौलत, द्रव्य व पायातील सोन्याच्या साखळ्या फत्तेसिंह यांनाच मिळाल्या. फत्तेसिंह भोसले यांनीही देव्हाऱ्यात वीरूबाईसाहेबांची सोन्याची मूर्ती करून बसवली. ती अद्यापही त्या घराण्याकडे आहे.

फत्तेसिंह भोसले अत्यंत मृदू स्वभावाचे होते. त्यामुळे स्वराज्याच्या उलाढालीपासून ते दूर राहिल्यामुळे पेशव्यांना मराठी दौलतीचा सर्वाधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. फत्तेसिंह भोसले यांनी मराठी दौलतीची जोखीम घेण्याची इच्छा व्यक्त केली असती, तर छत्रपतीपद त्यांच्याकडे येण्यास काहीच अडचण आली नसती. ही बाब त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवणारी होती. फत्तेसिंह भोसले यांना गोविंदराव चिटणीस यांनी कारभार करण्याविषयी विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले होते. याचाच अर्थ हे तख्त आपणास स्वीकारायची इच्छा नाही असाच होतो. फत्तेसिंह भोसले यांची कारकीर्द सन १७१२पासून सन १७६०पर्यंत होती. त्यांनी स्वतंत्रपणे अनेक मोहिमा करून आपले शौर्य तेज प्रकट केले होते.

फत्तेसिंह भोसले यांनी कोल्हापूर, कर्नाटक, बुंदेलखंड, भागानगर, त्रिचनापल्ली या प्रांतावर अनेक स्वाऱ्या केल्या. मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांना त्यांनी उत्कृष्ट साह्य केले. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर फत्तेसिंह भोसले अत्यंत उदास झाले. ते अक्कलकोट येथे निवास करू लागले. सातारचा राज्यकारभार त्यांनी बाजूला ठेवला.

पेशव्यांच्या राज्यकारभाराच्या घडामोडींपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंतर रामराजांचा राज्याभिषेक होऊन पेशव्यांनी दौलतीची सर्व सत्ता हाती घेतली व नवीन छत्रपती झालेल्या रामराजांना राज्य करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सातारा येथे घडत असलेल्या घटना फत्तेसिंह यांच्या मनाला क्लेशदायक वाटत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतःला दूर ठेवले होते.

अशातच फत्तेसिंह भोसले यांचा २० नोव्हेंबर १७६० रोजी अक्कलकोट येथे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोघी स्त्रियांनी सहगमन केले. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील जुने संस्थान आहे. अशा या वैभवशाली पराक्रमी आणि शूर घराण्याच्या कामगिरीची अगदी अलीकडेसुद्धा प्रचिती येते. अक्कलकोटमध्ये जुना राजवाडा, नवीन राजवाडा, जलमंदिर, उत्तम शस्त्रागार, धर्मशाळा, उद्यान, रस्ते, वीज, शिक्षण या सर्वच बाबतीत या घराण्याचे योगदान विशेष आहे.

शौर्यशाली फत्तेसिंहराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

– डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

(इतिहास अभ्यासक, पुणे)

(संकलन: टीम स्पंदन, साभार: लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: