संस्कृत भाषेचा अभिमान वाटणारी किमया..

संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा असण्याचे कारण
इंग्रजी भाषेचा अभ्यास करतांना एक वाक्य सतत सांगितले जाते, ते म्हणजे ‘A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG.’ या वाक्याचे विशेषत्व हे आहे की, या वाक्यात इंग्रजी वर्णमालेतील सर्व वर्ण आले आहेत; पण आपण जर पाहिले, तर या वाक्यात काही त्रुटी आढळून येतात. जसे की, इंग्रजी वर्णमालेत २६ वर्ण असतांना इथे मात्र ३३ आले आहेत. O,A,E,U,R यांचा परत परत वापर केला गेला आहे, तसेच A,B,C,D हा क्रम पाळला गेलेला नाही. तेच जर आपण खालचा श्‍लोक पाहिला तर संस्कृत भाषेची किमया आपल्याला लक्षात येईल –

क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण: ।
तथोदधीन पफर्बाभीर्मयोऽरिल्वाशिषां सह ॥

अर्थ : पक्ष्यांविषयी प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसर्‍याच्या बलाचे अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्‍चल आणि निर्भीड अन् महासागराचे सर्जन करणारा कोण आहे ? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचेदेखील आशीर्वाद प्राप्त आहेत.

यात जर आपण पाहिले, तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन आली आहेत आणि तीही अगदी क्रमाने ! तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली, तर ती सर्वांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे, असे आपल्या लक्षात येईल.

स्वर – अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः ।
व्यंजन –
कंठ्य – क ख ग घ ङ ।
तालव्य – च छ ज झ ञ ।
मूर्धन्य – ट ठ ड ढ ण ।
दन्त्य – त थ द ध न ।
ओष्ठ्य – प फ ब भ म ।
मृदु व्यञ्जन – य र ल व श ष स ।
महास्फुट प्राण- ह क्ष ।

वरील वर्गीकरण जरी पाहिले, तरी आपल्या लक्षात येईल की, संस्कृत भाषा किती वैज्ञानिक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वर आणि व्यंजन वेगवेगळे असून इंग्रजीसारखे सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण – कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जीभ यांच्याद्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य आहे. परत पुढे जर पाहिले, तर प्रत्येक वर्गातील १ आणि ३ व्यंजन अल्पप्राण (अल्प श्‍वास लागणारे) आणि २ अन् ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्‍वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात् नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

सर्वोत्कृष्ट संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान हवा !
संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतमधील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. त्यातील काही विशिष्ट उदाहरणे खाली देत आहे.

अ. ‘माघ’ नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या ‘शिशुपालवधम्’ या महाकाव्यात केवळ ‘भ’ आणि ‘र’ यांचा वापर करून एक श्‍लोक सिद्ध केला. तो असा –

भूरिभिर्भारिभिर्भीरैर्भूभारैरभिरेभिरे ।
भेरीरेभिभिरभ्राभैरभीरुभिरिभैरिभाः॥

– शिशुपालवधम्, सर्ग १९, श्‍लोक ६६

अर्थ : भूमीलाही वजनदार वाटेल, अशा वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणार्‍या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणार्‍या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर आक्रमण केले.

आ. तसेच ‘किरातार्जुनीयम्’ या काव्य संग्रहात महाकवी ‘भारवि’ यांनी केवळ ‘न’ चा वापर करून श्‍लोक सिद्ध केला.

न नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु ।
नुन्नोऽनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत् ॥

– किरातार्जुनीयम्, सर्ग १५, श्‍लोक १४

अर्थ : हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही. युद्धात ज्या मनुष्याचा स्वामी पराजित नाही, तो पराजित होऊनही पराजित म्हटला जात नाही आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाही. (निर्दोष नाही.)

इ. पुढे जर पहायला गेले, तर ‘महायमक’ अलंकारातील एक श्‍लोक आहे. याचे चारही पद एकसारखे आहेत; पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे.

विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः ।
विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः ॥

किरातार्जुनीयम्, सर्ग १५, श्‍लोक ५२

अर्थ : पृथ्वीपती अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत, ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. या प्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्‍चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पहाण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत.

हे वाचून तुम्हाला संस्कृत भाषेची किमया लक्षात आलीच असेल. तेव्हा ‘भाषाणां जननी’ असणार्‍या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.

शेवटी माघ कवींनी केलेल्या कृष्णाच्या स्तुतीने थांबतो.

दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।
दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः ॥

शिशुपालवधम्, सर्ग १९, श्‍लोक ११४

अर्थ : प्रत्येकास वरदान देणार्‍या, दुराचारी माणसांचे निवारण करणार्‍या आणि त्यांना शुद्ध करणार्‍या, परपीडा करणार्‍यांचे निर्दालन करण्यास समर्थ अशा बाहूंनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णाने शत्रूंवर आपला मर्मभेदी बाण मारला.

जयतु संस्कृतम्।।

लॉकडाऊन मधली घरं.

आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं ग, टीव्ही दिसतो आणि हा बाहेरचा पिक्चर पण. लग्नाच्या वयाची नात तिला गम्मत वाटली. नाही तरी tv बघून पण बोर झालं होतं. बाहेरचा काय पिक्चर आहे बाई? त्यावर आजी म्हणाली, “अग तुम्ही सगळे जॉब, कॉलेजला गेले कि मला हेच काम असत इथे बसुन, कोणाचं काय सुरू आहे ते. रिकाम्या चौकश्या म्हण हवं तर. 😃 आजी हसत म्हणाली.”

अग पण लॉक डाऊन मुळे बाहेर कोणी नाही काय कळणार नाही आणि कोणी बोलायला माणुस दिसणार नाही ए तुला. आजी म्हणाली, “आता माणसं बोलत नाहीचए माझ्याशी आता खिडक्या आणि गॅलरीतून दिसणारी घरं बोलत आहेत माझ्याशी.” नातीला इंटरेस्ट वाटला. ती येऊन बसली आजीजवळ. मलाही सांग काय बोलत आहेत घरं. ऐक ते कोपऱ्यात असलेलं घर. ती प्रेग्नन्ट होती बघ, माहेरी जाणार होती डिलिव्हरी झाल्यावर. सासू आणि ती मिनिट पटत नव्हतं. तीच म्हणणं होतं जरा खेडवळ आहेत सासूबाई माझ्या बाळाला नीट सांभाळायच्या नाही. पण लॉक डाऊन मध्येच डिलिव्हरी झालेली दिसते आणि त्या बघ सासुबाई किती स्वच्छ डेटॉलच्या पाण्यात दुपटी पिळून वाळत घालत आहे. सकाळी ओव्या धुरीचा वास येत होता. चांगल्या तुपाचा कणकीचा शिरा तिथेच भाजल्याचा वास होता तो, बघ कसंही असलं तरी आपलं माणूसच कामी आलं ना, असा संदेश देते बघ ती गॅलरी.😊
नातीला आजीच्या अश्या अँगल ने विचार करणं गमतीच वाटलं. आजी आणखी सांग ना पुढच घर. आजी म्हणाली मजा वाटते ना ऐकायला. मला पण असे घर निरीक्षण करायला कधी मजा वाटते, कधी दुःख, कधी धडाही मिळतो वेगवेगळे अनुभव. आपण आयुष्यात कस वागू नाही असाही संदेश देतात अग काही लोक.

ती वरची गॅलरी बघ अगदी सधन आहेत दोघेही नोकरीत एक लेकरू. सगळ्या कामाला बाई, पण आता सगळी काम करावी लागतात. पण असं कधी होत नाही की सतत ती बाईच कपडे वाळत घालेल कधी तो नवरा, कधी लेकरू असे सगळे मिळून काम करतात, समानतेची बीज चांगली रोवलेली दिसतात. तेच त्याच्या पलीकडे बघ ती बाई केवढी बादली घेऊन कपडे वाळत टाकते. ती अजुन जेवली पण नसेल. नात हसून म्हणाली कश्यावरून ग. आजी म्हणे ऐक. आजीने त्या बाईला हाक मारली, “काय झालं का जेवण? “तेंव्हा ती बाई म्हणे, “नाहीओ अजून ओटा लख्ख करायचा आणि मगच बसायचं बाकीच्यांची झाली.” आजी नातीला म्हणाली, “आता तुला वाटेल घरातल्यानी मदत करावी ना हिला. पण ही बयाच नाठाळ आहे. रोज भाजीला जाताना बोलते रस्त्यावरून एकदा मी म्हंटल कशाला तुम्ही जाता भाजीला?नवऱ्याला, पोरीला सांगायचं ना येताना घेऊन या म्हणून. त्यावर म्हंटली होती, “मला नाही बाई कोणाच्या हातच पटत, सगळं मला मीच केलेलं आवडतं!” हेकट आहे ती, म्हणून तर आपला चारचा चहा आणि तिचं जेवण एक वेळ. बघ सगळ्यात जास्त ओले कपडे तेच सांगत आहेत तिच्या घराविषयी. किती उशीर झाला तरी करणार मीच आणि मग सगळं घर परावलंबी करून ठेवायच मी पणा करू नाही हेच शिकवलं आहे तिने.
त्यापेक्षा ही आपल्या शेजारची गॅलरी बघ, अगदी नियमात चालणारी. सकाळी 9 पर्यंत कपडे गॅलरीत आलेले असतात. सगळ्या कुंड्यांमध्ये पाणी घालून झालेलं असतं. संध्याकाळी तुळशीत दिवा असतोच. वाळलेले कपडे आतही गेलेले असतात. सगळेजण मदत करतात मग सगळं छान नियोजित चालतं. हेच शिकवत हे घर.

या उलट त्या पलीकडची गॅलरी. सदा पसारा पडलेली, फरशीचे बोळे कसेही खोचलेले. तुटक्या फुटक्या वस्तु धुळीने माखलेल्या. लग्नाला आठ वर्षे झालेत पण लेकरू काही झालं नाहीए, बहुतेक चैतन्य हरवत चाललं आहे संसारातल. नात हसली, आजी उगाच काही गेस करू नकोस. गेस नाही ग, होत असं मला नेहमी वाटतं. घर उदास व्हायला बरीच कारण असतात. कधी दोघांचे पटत नसले, एक फारच उत्साही आणि दुसरा अगदी निरुत्साही असला की त्या उत्साही असणाऱ्याची मजा निघून जात असेल. कधी तोच तो पणा येऊन पण घर उदास होतं. लेकरं असले घरात कि रोज नवे आव्हान असतात. एरवी दोघे जॉबला जातात पण आता तसं त्यांना काही आव्हान नाही लेकरांच. जॉबच तरी बघ उदास वाटतं मला ते घर.
ती झाडाजवळची गॅलरी तिथं तर. वाघ शेळी राहतात. बाई माणसाचे कपडे वाळत टाकून जाते, तसे तो वाघ येऊन कडकडून जातो. अक्कल नाही नीट वाळत घालत नाही. आता पण बघ चहा घ्यायला वाघोबा बसलाय खुर्ची टाकून शेळी येईलच चहा घेऊन. खरंच ती गरीब बाई आली. एक घोट घेताच तो कडाडला, काय कडू केलाय मला शुगर नाहीए, मी कमावतो, मला पाहिजे तसं देत जा. स्वतःला कमवायची अक्कल नाही, एक काम धड करत नाही. शेळी गपचूप गेली कप घेऊन, असं सतत चालू असतं. अग, हे घर नेहमी शिकवत ग. हक्क गाजवला की गाजवणारा शेफारत जातो आणि ऐकणारा शेळी होतो, बिचारी बाई नात म्हणाली.
त्याच्या पलीकडे जाणीव नसलेलं घर म्हणते मी. तो बघ तास तास फोनवर असतो आणि ही बिचारी जुळे लेकरं सांभाळून बेजार आहे.सासू अडकली गावी ह्या लॉक डाऊन मध्ये. एरवी ती असते एक लेकरू बघायला ह्याला नसत लेकराच काम, पण आता तरी बघावं ना. आजी, अग त्याला ‘work from home’ जास्त असेल. आजी म्हणाली, अग कसचं काय. ते गाड्यांचे शोरूम आहे त्याचे. मागे बागेत भेटली होती ती. लेकरं घेऊन तेव्हा म्हंटली होती, ह्यांच्या शोरूम मधल्या गाडीसारखी आहे मी ह्यांच्या संसारात सतत उभीच, तेव्हांच कळालं मल. पण तुला काय वाटतं काय शिकवत ते घर. तुम्ही सक्षम आहात, करू शकता तर मदत करा असं वागू नका असंच सांगतंय ना.

ती गुलमोहरा खालची गॅलरी तर बघ मस्त जगणारी, अगदी टुमदार. गॅलरीतून किती पोळ्यांचं पार्सल रोज सोडते ती बाई, अनाथाश्रमासाठी पाठवते. मस्त झोपाळा काम आवरून लवकरच पुस्तक वाचत बसलेली. परवा हाक मारून विचारलं तर म्हणाली, “समाजसेवेचे वेड बसू देत नाही, जमतील तेवढया पोळ्या पाठवते. हे गेल्या पासून तसं एकटीचं फार काम नाही आणि ह्यांच्या आजारपणामुळे बरीच पुस्तकं वाचण्याचं राहील होतं, ते आता पूर्ण करते. बघ आलेलं एकटेपण धीराने स्वीकारत प्रसन्न पणे जगायला शिकवते ती गॅलरी.
नात म्हणाली, “आजी अग कोणी आपली गॅलरी बघून पण म्हणत असेल हे घर काय शिकवतं!” आजी हसली म्हणाली, “हो सगळेच घर शिकवते, तसं आपली गॅलरी पण शिकवत असेल ना?”
तुम्हीच सांगा तुमची गँलरीं
काय सांगते !!!!!!

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
जीवन विकास

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

राशी आणि व्यवसाय

प्रत्येक व्यक्तीला आपण कोणता व्यवसाय करावा कोणता धंदा करावा कशा प्रकारची कारखानदारी करावी कोणता व्यवसाय सुरू करावा म्हणजे त्यात यश मिळेल सफलता मिळेल असा प्रश्न असतो कारण जर चुकीचा व्यवसाय सुरू झाला तर त्यात नुकसान होण्याची शक्यता असते पत्रिकेतील ग्रहांच्या मुळे आपल्याला कोणता व्यवसाय करावा यासंदर्भातील योग्य मार्गदर्शन मिळू शकते आपण आता ढोबळ मानाने राशीचा व्यवसायावर काय परिणाम होतो ते पाहू किंवा कोणती रास कोणत्या कोणत्या व्यवसायातून यश मिळू शकते ते पाहू आपण सर्व राशींचे.

मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींच्याकडे धडाडी असते धाडस असते आत्मविश्वास असतो अखंड जागरूक राहतात चर रास असल्यामुळे वेगाने काम करतात चिकाटीने काम करतात व कोणत्याही धाडसाचासाठी तत्पर असतात त्यामुळे मेष राशीतील ग्रहांचा दहाव्या स्थानाशी संबंध आला तर ते चांगले ठरते मेष ही चर रास आहे तेव्हा अशा व्यक्ती सरळ चाकोरीतून न जाता कसल्याही अडचणीच्या प्रसंगाला तोंड देऊन नवीन वाट शोधतात व मोठ-मोठी कामे पार पडतात मेष राशीमध्ये गुरु, रवि ,मंगळ हे ग्रह बलवान ठरतात.
मेष राशीसाठी डॉक्टर ,केमिस्ट्री ,औषधे ,लोखंड, पोलाद या सर्वात व्यवसाय साठी एक वेगळीच ऊर्जा ताकत लागते ती या राशीकडे आहे तसेच दारू, कोकम, भांग ,गांजा ,अशा मादक पदार्थाचा व सर्व यंत्रे सर्व कारखाने , पोलादाचे कारखाने या सर्वांसाठी धाडस लागते ते धाडस मेष राशीच्या व्यक्तीकडे आहे

वृषभ रास
ही स्थिर रास आहे यामुळे वृषभ राशीच्या व्यक्ती शांतपणे आज्ञाधारक पणे आपले काम करत असतात शक्यतो चांगल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करण्यात त्यांना आनंद मिळतो वृषभ राशीच्या व्यक्ती या अधिक करून सेवा वृत्तीने काम करतात त्यांना चांगल्या कर्तबगार यशस्वी पुरुषांच्या हाताखाली काम करणे आवडते वृषभ राशीला स्थलांतर आवडत नाही सुरुवातीला व्यवसायात जे गाव डनिवडतील तेथेच राहतात अधिक पगाराची अपेक्षा न करता आहे त्या ठिकाणी संपुष्ट राहून काम करणाऱ्या वृषभ व्यक्ती असतात वृषभ राशीचे किंवा लग्नाच्या व्यक्ती नोकरीसाठी मिळणे हे चांगले असते.
वृषभ राशीसाठी व्यवसाय सर्व कला संगीत नाट्य चित्रपट रंगभूमी शिल्पकला चित्रकार गायन-वादन सर्व वाद्य थेटर अभिनय कला या सर्वांत वृषभ राशि दिसून येतील तसेच साडी सेंटर कॅटिरिंग ज्वेलर्स सोन्या-चांदीचे दागिने मेवामिठाई सुगंधी द्रव्य अत्तरे हिरे माणिके सर्व प्रकारचे रियर डेकोरेशन सर्व प्रकारच्या किमती वस्तू कलाकुसरीच्या वस्तू पेंटिंग सर्व खाद्यपदार्थ बिस्किटे मेवामिठाई पाव खारी बिस्किटे सर्व खानावळ हॉटेल स्त्रियांकरिता वस्तीग्रह सर्व स्त्रियांच्या संस्था या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती वृषभ राशीच्या दिसून येतील.

मिथुन राशी
ही बुधाच्या अंमलाखालील रास आहे शिक्षक ,प्राध्यापक, अकाउंटिंग, कारकून ,बँकिंग ,वृत्तपत्र, कायदा, प्रवचनकार ,छापखाना, बुद्धीच्या संदर्भातील, ज्ञानाच्या संदर्भातील, लेखनाच्यासंदर्भातील व शिकवणीच्या संदर्भातील मिथुन रास बलवान असते मिथुन राशीकडे हजरजबाबीपणा असतो, प्रसंगावधान असते, विनोदी बुद्धी असते, मात्र मिथुन राशीच्या व्यक्ती मेष राशी प्रमाणे पुढाकार घेऊन व्यवसाय काढणार नाहीत ज्या ठिकाणी त्यांचे मन रमत नाही त्यांच्या मनासारखी नोकरी नाही अशा ठिकाणी मिथुन राशीच्या व्यक्ती थांबणार नाहीत संपादक, वृत्तपत्र, बँकींग ,अकाऊंट ,हिशोब, त्याचप्रमाणे ग्रंथप्रकाशन ,प्रकाशन व्यवसाय, वृत्तपत्रे, दैनिके ,आकाशवाणी ,दूरदर्शन याठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा बुद्धीचा फायदा होतो मिथुन राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा अस्थिर व चंचल स्वभावाच्या असतात एक ना धड भाराभर चिंध्या अशी काही वेळा त्यांची अवस्था असते.

कर्क रास
ही एक समाज प्रिय रास आहे ही चर रास आहे कर्क राशीच्या व्यक्तीने मोठ्याप्रमाणावर लोकप्रियता मिळते कर्क राशीच्या व्यक्ती एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या पक्षामध्ये पुढाकार घेतात त्यांच्याकडे एक प्रकारचे चुंबकत्व असते त्यामुळे त्यांच्याकडे अनेक लोक आकर्षित होतात आपल्या देशामध्ये नेतृत्व केलेल्या अनेक व्यक्ती कर्क लग्नाच्या किंवा कर्क राशीच्या आहेत महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, यांची कर्क रास होती लता मंगेशकर व गायक किशोर कुमार या सर्व कर्क राशीच्या व्यक्ती आहे कर्क रास ही संवेदनशील रास आहे कर्क राशीच्या व्यक्तींना समाजाची सहानुभूती लाभते कर्क राशीच्या व्यक्ती पुढे येणे हे बरेच गुरु, रवि-मंगळ अश्या बलवान ग्रह बरोबर शुभ संबंध असतील तर कर्क राशीच्या व्यक्ती पुढे येतात. सर्वसामान्यपणे वाहतूक, पेये, सर्व द्रव्य पदार्थ ,भाजीपाला, फळावर, रस खाद्यवस्तू, चांदी, हॉटेल ,खानावळी, रेल्वे ,गाड्या, वाहने, मोटारी, सर्व वाहतुकीची साधने ,जहाजे ,विमाने, सर्वप्रकारचे प्रवास, सर्व मनोरंजनाची क्षेत्रे याच्यावर कर्क राशीचा अंमल आहे.

सिंह
ही राज राशी आहे त्यामुळे सुरुवातीला व्यक्ती कितीही सामान्य असली तरी ती आपल्या नशिबाच्या जोरावर पुढे येते अगदी सुरुवातीला एकदम सामान्य पातळीवर असलेल्या व्यक्ती अद्‍भुतपणे पुढे येतात सिंह रास ही राजाची ,नेत्याची व अधिकाऱ्याची रास आहे सिंह राशीला लोकांच्यावर हुकूमत गाजवने आवडते सिंह राशीच्या व्यक्तींच्या कडे अधिकाऱ्याची लालसा असते त्यांना सत्ता हवी असते त्यांना नेतृत्व करणे आवडते शासकीय क्षेत्रात, उच्च अधिकारी, मॅनेजर, वेगवेगळ्या कंपनीमध्ये चेअरमन, संचालक, हे सिंह राशीच्या व्यक्ती असतात लोकांच्यावर हुकूमत गाजवने त्यांना आवडते सिंह रास ही स्थिर रास आहे त्यामुळे शक्यतो आपल्या गावात किंवा ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना काम करणे आवडते मेष, कर्क, तूळ व मकर या राशी प्रमाणे सिंह राशीच्या व्यक्ती आपल्या जीवनात वरचेवर बदल करत नाहीत सढळ हाताने खर्च करण्यात दानधर्म करण्यात व दानशूर म्हणून सिंह व्यक्ती प्रसिद्ध असतात शासकीय अधिकारी म्हणून सिंह राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात
सरकारी नोकरी वरिष्ठांचे सल्लागार मोठमोठे कारखाने दार उत्तम दर्जा असलेली संस्था सोने सोन्याचे दागिने सट्टे व्यापाऱ्याच्या, राजकारण या सर्वांवर सिंह राशीच्या व्यक्ती आढळून येतील

कन्या
ही द्विस्वभाव रास आहे. जगात यशस्वी होण्याकरिता वेळेवर निर्णय घ्यावे लागतात. योग्य वेळी निर्णय घेऊन तडपणे काम करावे लागते. मात्र, कन्या रास ही द्विस्वभावी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींचे झटपट निर्णय होत नाहीत. कन्या रास ही धडाडीने स्वतःचा व्यवसाय काढणारी नव्हे. वृषभ राशी प्रमाणे या ही लोकांना नोकरी करण्यात आनंद मानते. मात्र, यांच्याकडे चिकित्सक बुद्धी फार असते. तसेच कोणत्याही एका गोष्टीवर, एका व्यक्तीवर, एका विषयावर यांची श्रद्धा नसते. काहीवेळा आत्मविश्वासाचा अभाव असतो .मात्र, तीव्र स्मणशक्ती ,उत्तम बुद्धिमत्ता, असामान्य ग्रहणशक्ती यामुळे कन्या राशीच्या व्यक्ती या शाळा, कॉलेज ,शिक्षण संस्था, वृत्तपत्रे, कायदा, यामध्ये तसेच अकाउंटन्सी या विषयांमध्ये यशस्वी होतात मोठ मोठ्या लोकांचे चिटणीस म्हणून ,सेक्रेटरी म्हणून ते काम करतात. अनेक भाषेचे ज्ञान त्यांना असते .त्यांच्याकडे स्मणशक्ती चांगली असल्यामुळे अनेक विषयाची माहिती त्यांच्या जिभेवर असते. बँकिंग, विमा, ज्योतिष, शिक्षक, प्राध्यापक, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, प्रकाशक, लेखक, साहित्यिक, संपादक, याठिकाणी कन्या राशीच्या व्यक्ती आढळतील.

तुळ रास
ही चर रास आहे त्यामुळे मेष, कर्क व मकर या राशी प्रमाणे तूळ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात पुढे येतात. ज्या ठिकाणी मेहनतीची कामे नाहीत. शारीरिक त्रास नाही. अशा ठिकाणी तुळ राशीच्या व्यक्ती काम करतात. तडजोड करून विचारांची देवाणघेवाण करून, मिळते-जुळते घेऊन तूळ राशीच्या व्यक्ती काम करतात. आपल्या देशामध्ये अनेक नेते हे तूळ राशीचे आहेत किंवा लग्नाचे आहेत. समाजावर मनापासून प्रेम करणारे, मानवतेचे कल्याण करणारे, सुसंस्कृत, सुस्वभावी अशा तूळ राशीच्या व्यक्ती असतात. त्यामुळे ते अनेक व्यवसायात गती मानाने परिश्रम करून पुढे येतात. सर्व कला, संगीत, नाट्य, चित्रपट, रंगभूमी, शिल्पकला, चित्रकार ,गायक ,वादन, सर्व वाद्ये, अभिनय कला या सर्वांमध्ये तूळ राशीच्या व्यक्ती दिसतील.
तसेच साडी सेंटर, ज्वेलर्स, सोन्या-चांदीचे व्यापारी, सर्व खाद्यपदार्थ बनवणारे, खानावळ हॉटेल याही सर्व ठिकाणी तूळ राशीच्या व्यक्ती आढळतील.

वृश्चिक
रास ही स्थिर रास आहे .परंतु वृश्चिक राशीकडे महत्त्वाचा गुण म्हणजे निर्धार, निश्‍चय, कणखरपणा, चिकाटी, प्रयत्नमधील सातत्य. यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्ती या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे येतात. इकडे तिकडे न पाहता आपल्या ध्येयावर आपल्या उद्दिष्टावर वृश्चिक राशीच्या व्यक्‍तींची नजर असते. त्यामुळे त्या चिकाटीने, परिश्रमाने आपले काम पूर्ण करण्यात, ध्येयामध्ये सफल होतात, यशस्वी होतात ,वेगवेगळे डॉक्टर्स, केमिस्ट, वृश्चिक राशीचे किंवा वृश्चिक लग्नाची असतात .कोणाच्याही विचारांची पर्वा न करता वाटते जे आवडे येतील त्यांना बाजूला करून निर्धाराने वृश्चिक राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती जीवनात यशस्वी होतात. औषधे, लोखंड, पोलाद या सर्वांत ठिकाणी काम करणारे लोक वृश्चिक राशीचे आढळतात तसेच दारुगोळा, स्फोटक पदार्थाच्या कारखाने, दारू, कोकम, भांग, गांजा अशा मादक पदार्थ ज्या ठिकाणी वृश्चिक राशीच्या व्यक्ती आढळून येतात.

धनु
धनु राशीच्या व्यक्ती या अत्यंत प्रामाणिक असतात. धनु रास सुद्धा द्विस्वभावी राशी आहे. द्विस्वभावी असणाऱ्या व्यक्तीचा मोठा दोष म्हणजे त्यांचा निर्णय लवकर होत नाही. व्यवसायामध्ये धरसोड असते, नोकरीमध्ये धरसोड असते, त्यांना नोकरी नको असते, स्वतंत्र्याची आवड असते. परंतु त्यांचा प्रामाणिकपणा,
संत प्रवृत्ती यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या पदावर ते प्रामाणिकपणे काम करतात. काही वेळा नोकरी करतात. काही वेळा स्वतंत्र व्यवसाय करतात. सरळ मार्गाने चालणे, प्रामाणिकपणे काम करणे, खोटेपणा न करणे व आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहूनच धनू राशीच्या व्यक्ती काम करतात. सचोटी, प्रामाणिकपणा, खरेपणा, न्याय याविषयी धनू व्यक्ती प्रसिद्ध असतात. सार्वजनिक संस्था, धार्मिक संस्था, सेवाभावी संस्था अशा ठिकाणी धनू व्यक्ती यशस्वी होतात.
शाळा ,महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च संशोधन, सर्व शिक्षणक संस्था, शिक्षक, प्राध्यापक ,शालाप्रमुख, प्राचार्य, गुरुकुल, संशोधक, शास्त्रज्ञ या सर्व ठिकाणी धनू राशीच्या व्यक्ती आढळतील. त्याचप्रमाणे न्यायाधीश, वकील, परराष्ट्र वकील, जीवनामध्ये उच्च स्थान ,मानाचे स्थान ,आदराचे स्थान प्राप्त करणाऱ्या व्यक्ती धनु राशीच्या असतात. धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धार्मिक ग्रंथ, उपासना, तपश्चर्या या सर्व ठिकाणी धनू राशीच्या व्यक्ती आढळतील.

मकर
मकर ही अत्‍यंत यशस्वी रास आहे.मकर राशीकडे काटकसरीपणा आहे.नियमीतपण आहे. काटेकोरपणा आहे. अत्यंत व्यवहारी अशी ही रास आहे. प्रत्येक ठिकाणी त्या वस्तूची किंमत पाहून, अनेक ठिकाणी तपास करून मगच त्या व्यक्ती खरेदी करतात. मकर राशीच्या स्त्रिया किंवा पुरुष हे कुटुंबात यशस्वी होतात. प्रपंच काटकसरीने करतात. त्यांच्याकडे कामाचा उरक चांगला असतो. मकर राशीच्या व्यक्ती गतिमानाने पुढे येतात. त्यांना कामाचा कंटाळा नसतो. त्यांच्याकडे संघटन कौशल्य, दूरदृष्टी, चिकाटी, मेहनतीपणा व आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून काम करण्याची यांची पद्धत असते. त्यामुळे व्यवसायात मकर राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात. सर्व कामगार शेतकरी, मजूर, खाणीत काम करणारे लोक मकर राशीचे असतात. गुरांचा व्यवसाय करणारे, धान्यांचा व्यवसाय करणारे, गोठे, पशु पालन ,शेतीचे सर्व व्यवसाय, इमारती साठी लागणारे लाकूडा व्यवसाय करणारे, खडी, वाळू ,कोळसा, पिठाची चक्की, दीर्घकाळ चालणाऱ्या कामाच्या ठिकाणी असणारी व्यक्ती मकर राशीची असते.

कुंभ
कुंभ रास ही वायुराशी आहे कुंभेकडे विद्वाता आहे, बुद्धिमत्ता आहे, कुंभ राशीच्या व्यक्ती कोणत्याही घटनेच्या, कोणत्याही प्रसंगाच्या, कोणत्याही विषयाच्या तळाशी जाते. सत्याचा शोध करणे व कोणत्याही विषयाचा परिपूर्ण अभ्यास करणे हे कुंभ राशीचे वैशिष्ट्ये आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती चौफेर विचार करतात, खोलवर विचार करतात, अनेक संशोधन क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या विज्ञानाच्या संस्थेमध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती आढळतील. त्यांचा प्रामाणिकपणा, सरळपणा, सज्जनपणा, सुसंस्कृतपणा यामुळे कुंभ व्यक्ती जगामध्ये आपोआप मोठेपण मिळते. लोकांचा विश्वास संपादन करण्यात कुंभ राशीच्या व्यक्तींचा हात कोणी धरू शकणार नाही. इमारतीचे लाकूड, तेल ,तेलाच्या गिरणी ,भूगर्भातील तेल, खडी, वाळू, कोळसा, पिठाची चक्की, सर्व प्रकारचे तेलचे व्यवसाय करणारे लोक, तसेच जुन्या ग्रंथाविषयी धर्माविषयी परंपरेविषयी अभ्यास करणारे लोक, मोठमोठे ऋषी मनी आचार्य योगी साधुसंत अध्यात्मिक जीवना विषयी अभ्यास करणारे सर्व व्यक्ती कुंभ राशीच्या आढळतात.खूप मोठ्या वर्षाचा,दीर्घ पल्ल्याचा, दूरवरचा असा जर काही प्रकल्पाचे असेल,अशा ठिकाणी काम करणार्‍या व्यक्ती कुंभ राशीच्या आसतात.

मीन
मीन रास ही द्विस्वभाव रास आहे त्यामुळे मिथुन, कन्या, धनु या राशीच्या प्रमाणे मीन राशीच्या व्यक्तींचा निर्णय लवकर होत नाही. मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनाप्रधान असतात. त्यांची मन:स्थिती अत्यंत हळूवार असते. कोमल असते त्यांच्याकडे कणखरपणा नसतो, दणकटपणाचा अभाव असतो, त्यामुळे मीन राशीच्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर पुढे येणार नाहीत. व्यवसायाचा ताणतणाव त्यांना झेपणार नाही. मीन राशीच्या व्यक्ती शिक्षक, प्राध्यापक, न्यायाधीश व साहित्यिक क्षेत्रात अधिक आढळून येतात. तसेच सर्व शिक्षण संस्था शिक्षक ,प्राध्यापक, शालाप्रमुख, प्राचार्य ,गुरुकुल, रुग्णालय, धार्मिक ग्रंथ, उपासना, अध्यात्मिक, मंदिरे, मशीद, धार्मिक संस्था या ठिकाणी सर्व मीन राशीच्या व्यक्ती आढळून येतील.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

वानोळा

परवा माहेरून निघताना असंच कामवाली मावशी म्हटली, “दीदी तू सासरी निघाली आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा.. रिकाम्या हाताने जाऊ नये, तुझे घरचे लोकं काय म्हणतील?”
मी फक्त हसले आणि म्हंटलं, “मावशी, असं काही नाही आमच्या घरी.”पण दिवसभर तिचा तो वानोळा मनात फिरत राहिला.. आणि नकळत मन बालपणात गेलं.. तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर, किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना..
तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी.. आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला….
मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची.. तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं…

वाळवणाचे दिवस असले की मग तर बघणंच नको. पापड , कुरडई प्रत्येक घरात व्हायची. तरी शेजार पाजारी वानोळा जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा.. सगळ्यात विशेष म्हणजे “कैरीचं लोणचं.” मसाला तोच, कैऱ्या त्याच, पद्धत तीच, तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगन्ध ही वेगळा आणि चवही वेगळी…
थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्या च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची.. एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची, आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं, हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत…

जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, ‘वानोळ्या’ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली. मग ‘वानोळ्या’ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशन ने घेतली.. जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.. सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो.. माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते, तिच्या गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते, तरी अजूनही तुमच्या माझ्या सारख्यांची आई निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच “वानोळा” असतो.

देत राहणाच्या संस्काराचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मी ची ओटी भरून पाठवणी करण्याचा, दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो ‘वानोळा.’ आज असाच शब्दरूपी वानोळा पाठवते आहे, पोहचला की आस्वाद घ्या आणि गोड माना… पण तो अस्सल वानोळा खरंच कुठेतरी हरवला हे निश्चित…

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

आठ आण्यातलं लग्न

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)

शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग ‘आपण लग्न करूया’ असा भाईचा आग्रह सुरू झाला… वाढतच राहिला.

लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात ‘शुभ मंगल सावधान’ म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त ‘हो’ म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,’ या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी लेक देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.

माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. ‘भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणीन,’ असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझा अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.

पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.

आमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना “मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?” असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, “मग आत्ताच जाऊ या की!” म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.

रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्पा घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.

हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न ‘समारंभ’ संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून ‘कु. सुनीता ठाकूर’ हिचे नाव ‘सौ. सुनीता देशपांडे’ करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.

एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणि त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!

— ✍🏻📝सुनीता देशपांडे

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)