Tag Archives: happy life

इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, प्रगती व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा!!

लेकीस पत्र ❤️

मुळ लेखक – चार्ली चॅप्लीन
मराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर

प्रिय मुली,
ही रात्रीची वेळ आहे.
नाताळची रात्र.
माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.
तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.
तुझी आईही झोपी गेलीय.
पण मी अजुनही जागा आहे.
खोलीत मंद प्रकाश साकळतोय.
तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल.
तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही.
पण तू कूठं आहेस?
तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात!
तू चॅम्प्स एलीसिसच्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील.
रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय.
हिवाळ्यातील आकाशात असणाऱ्या चांदण्यांची चमक, मी तुझ्या डोळ्यांत पाहू शकतो.
असं लावण्य, असं सुंदर नृत्य, तू तारा होऊन अशीच चमकत रहा.
पण
जेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेली स्तूतीसुमनं यांची नशा येऊ लागेल आणि त्यांनी भेटीदाखल दिलेल्या फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरु लागेल
तेव्हा
गुपचूप एखाद्या कोपऱ्यात बसून तू माझं हे पत्र वाच.
आणि आपल्या ह्रदयाचा आवाज ऐक.
मी तुझा बाप आहे जिरल्डाइन,
मी चार्ली, चार्ली चॅप्लीन.
तुला आठवतं का?
जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या उशाशी बसून मी तुला ‘झोपणाऱ्या परी’ची गोष्ट ऐकवायचो.
पोरी, मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे.
मी तुझं भविष्य पाहिलं आहे…
रंगमंचावर नृत्य करणारी एक मुलगी, जणू आभाळातून उडणारी एखादी परी.
लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात मला हे शब्द ऐकू येतात, ‘या मुलीला बघीतलत का, ती एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे. तुम्हाला आठवतं का त्याचं नाव चार्ली होतं.’
हो! मी चार्ली आहे!! एक म्हातारा विदूषक!!!
आणि आता तुझी वेळ आहे.
मी फाटून जीर्ण झालेल्या पॅंटमध्ये नाचायचो.
आणि माझी राजकुमारी! तू सूंदर रेशमी पोषाखात नृत्य करतेस.
हे नृत्य, या टाळ्या, तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील.
उंच जा, खूप उंच जा – पण लक्षात ठेव की तुझी पावलं नेहमीच जमिनीवर असली पाहिजेत.
तू लोकांचं जगणं जवळून बघायला हवं –
छोट्या छोट्या गल्यांमध्ये, बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ, ते गोठवणाऱ्या थंडीत भूकेनं तडफडताहेत.
मी ही त्यांच्यातलाच होतो, जिरल्डाइन!
त्या जादूच्या रात्री जेव्हा मी तुला अंगाई म्हणवून झोपी घालत असे
आणि तू झोपेच्या डोहात उतरत जायचीस
तेव्हा मी जागा असे, टक्क जागा.
मी तुझा चेहरा बघायचो, तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचो.
आणि विचार करायचो, ‘चार्ली ! ही पोरगी तुला कधी ओळखू शकेल का?’
तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाहिय, जिरल्डाइन!
मी तुला हजारो गोष्टी ऐकवल्या, पण ‘त्याची’ गोष्ट कधीच सांगितली नाही.
ही कहाणीही तितकीच ऐकण्यासारखी आहे.
ही त्या भुकेल्या विदूषकाची गोष्ट आहे, जो लंडनच्या गरिब वस्त्यांमध्ये नाचत- गाणं म्हणत पोटापुरतं मिळवायचा.
ही माझी गोष्ट्य.
मला ठाऊक आहे पोटाची भूक म्हणतात, ती काय असते.
मला माहितय ‘डोक्यावर छत नसणे’ या शब्दांचा अर्थ काय आहे.
मदतीसाठी तुमच्याकडे फेकलेल्या नाण्यांतून आपल्या स्वाभीमानाची चाळण होतांना मी अनुभवली आहे. आणि तरिही मी जिवंत आहे.
असो, ही गोष्ट इथेच सोडू.
तुझ्याबद्दलच बोलणं जास्त उचीत राहिल, जिरल्डाइन.
तुझ्या नावानंतर माझं नाव येतं…… चॅप्लीन.
या नाव घेऊन मी चाळीस पेक्षा जास्त वर्षे लोकांचं मनोरंजन केलं आहे.
पण हसण्यापेक्षा मी जास्त रडलो आहे.
ज्या जगात तू राहातेस तिथं नाच-गाण्याव्यतिरीक्त काहीच नाहीय.
अर्ध्या रात्रीनंतर जेव्हा तू थिएटरच्या बाहेर येशील
तेव्हा तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न चाहत्यांना विसरू शकतेस.
पण
ज्या टॅक्सीत बसून तू घरी जाशील, त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे विचारायला विसरू नकोस की त्याची बायको कशी आहे?
जर ती गर्भार असेल तर जन्म घेणाऱ्या बाळासाठी, त्याच्या कपड्यांसाठी आणि औषधासाठी त्याच्याकडे पैसे आहेत काय?
त्याच्या खिशात थोडे अधिकचे पैसे टाकायला विसरू नकोस.
मी तुझ्या खर्चासाठी तुझ्या बॅंक खात्यावर काही रक्कम भरली आहे,
खर्च करताना नेहमी विचार कर.
कधी कधी बसमधून प्रवास कर,
छोट्या छोट्या रस्त्यानं प्रवास कर,
कधी कधी पायाखाली शहराचे रस्ते तुडव.
लोकांकडं ध्यान देऊन बघ.
अनाथांप्रति दया ठेव.
आणि दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांग की, ‘मी सुद्धा त्यांच्या सारखीच आहे.’
हो, तू ही त्यांच्यातलीच एक आहेस पोरी.
कोणत्याही कलावंताला त्याचे पंख देण्याअगोदर कला त्याच्या पावलांना रक्ताळवत असते.
जेव्हा तुला एखाद्या दिवशी असं वाटेल की तू तुझ्या प्रेक्षकांपेक्षा मोठी आहेस तर त्याच दिवशी
रंगमंच सोडून पळ काढ.
टॅक्सी पकड आणि पॅरिसच्या कुठल्याही गल्लीबोळात जा.
मला माहितीय तिथं तुला तुझ्यासारख्या कितीतरी नर्तकी भेटतील –
तुझ्यापेक्षाही जास्त सूंदर आणि प्रतिभासंपन्न.
अंतर फक्त ऐवढचंय की त्यांच्याजवळ थियटरचा झगमगाट नाही,
त्यांच्याजवळ चमचम करणारा उजेड नाही.
ते चंद्रप्रकाश हाच त्यांचा सर्च लाईट आहे.
जर तुला वाटलं की यातील एखादी जरी तुझ्यापेक्षा चांगलं नृत्य करतेय तर नृत्य करणं सोडून दे.
नेहमीच कुणी ना कूणी अधीक चांगलं असतं, हे लक्षात घे.
सतत पूढे जात राहाणं आणि सतत शिकत राहाणं म्हणजेच तर कला आहे.
मी मरून जाईल, तू जिवंत राहशील.
मला वाटतं तुला कधीही गरीबीचा स्पर्श होऊ नये.
या पत्रासोबत मी तुला चेकबूकही पाठवतोय, म्हणजे तुला मनासारखा खर्च करता येईल.
पण दोन नाणी खर्च केल्यानंतर हा विचार कर की तुझ्या हातात असणारं तिसरं नाणं तुझं नाहीय –
ते त्या अनोळखी माणसाचं आहे, ज्याची त्याला खूप खूप गरज आहे.
असा माणूस तू सहज शोधू शकतेस, फक्त आजूबाजुला चौकस नजर टाकली पाहिजे.
मी पैशांबद्दल बोलतोय कारण मला पैश्यांची राक्षसी शक्ती परिचीतय.
होऊ शकतं एखाद्या दिवशी कुणी राजकुमार तुझ्यावर भाळेल!
बाहेरचं रंगीन जग पाहून आपलं सुंदर काळीज कुणाला देऊ नकोस.
लक्षात घे जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा हा सूर्य आहे, जो सगळ्यांसाठी प्रकाशतो.
आणि हो, जेव्हा एखाद्यावर प्रेम करशील तेव्हा काळजाच्या देठापासून प्रेम कर.
मी तुझ्या आईला याबद्दल तुला पत्र लिहायला सांगितलं आहे,
प्रेमाच्या बाबतीत तिला माझ्यापेक्षा जरा जास्त कळतं.
मला हे ठाऊक आहे की बाप आणि त्याच्या लेकरांत नेहमीच एक तणाव असतो.
पण विश्वास ठेव
मला फार आज्ञाधारक मुलंही आवडत नाहीत.
मला वाटतं या नाताळच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा, म्हणजे मला तुला जे सांगायचंय ते तुला नीट समजून येईल.
चार्ली आता म्हातारा झालाय जिरल्डाइन.
कधी ना कधी, शोकमग्न काळ्या कपड्यात तुला माझ्या कबरीवर यावं लागेल.
मी तुला विचलित करू इच्छीत नाही
पण वेळोवेळी स्वतःला आरशात बघ, तुला माझंच प्रतिबींब त्यात दिसेल.
तुझ्या धमण्यात माझंच तर रक्त वाहतय.
जेव्हा माझ्या धमण्यातील रक्त गोठून जाईल तेव्हा तुझ्या धमण्यांतून वाहणारं रक्त तुला माझी आठवण करून देईल.
हे लक्षात ठेव की तुझा बाप कुणी देवदूत नव्हता, कूणी महात्मा नव्हता, तर तो नेहमीच एक चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहिला.
तू ही असाच प्रयत्न करावास, ही माझी इच्छा आहे.
खूप सगळ्या प्रेमासह..

चार्ली..

(चार्ली चॅप्लीन यांनी आपल्या मुलीला जिरल्डाइन ला हे पत्र लिहिले आहे. जिरल्डाइन या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीवरील त्याच शिर्षकाच्या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय आहे. अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

स्पर्श वेडा..

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.
आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.
सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.
रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे…. किती छान ना.
हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा.
ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो …काहीच नाही.

कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही, तर हे सगळे येणार कुठून? हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्सचा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा…. काही वाचून तर काही न बघता, न उघडता. ऑफिस मधेही याचा ‘वेडे’पणा संपायचा नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती. त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिस मधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत “ताईला बाळ झालंय ना, तिला द्या” म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत, काय म्हणून सांगावा.

तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी सोशल मिडीयातून मित्रांशी संवाद साधायचे, तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणां सोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःखं काहीशी वेगळी असतात, याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही, म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने ‘वेडा’ म्हणायची. त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता.

त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती. एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली, म्हणून हळू हळू चालत जाऊन त्याने दरवाजा उघडला, तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच “काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?” म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी “अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बडबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले” अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते. ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळख असेल, याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.

त्याचे मित्र “फ्रेंड्स लिस्ट” वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा ‘वेडा’ खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा.
त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी “टच” मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांना “स्पर्श” करायला आवडायचे.
तो लोकांच्या मनाला स्पर्श करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात, तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. केवळ स्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.
एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं…

“आज प्रत्येकाच्या ठायी असे स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे व आपापसातील संवाद कमी व वादच जास्त वाढत चालले आहेत तरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक रोज एका लहान मुलाशी व एका वयस्कर माणसाशी संवाद साधायला हवा.मुलांशी बोलताना आपण लहान होतो व चार चांगल्या गोष्टी त्याला हक्काने सांगता येतात व वयस्कर माणसाशी संवाद साधल्यावर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते. हि गोष्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या दैनंदिनीत समाविष्ट करा.
जीवन खुपच सुंदर असते, आहे, ते आनंदात जगा, “वेडे” होऊन जगा…!!”…👌👌👌

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

थोडे दिवस घरातच बसायचं आहे

कॅरम काढा, पत्ते काढा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे ।

सापशिडी आणि बुद्धीबळ  खेळा
थोडे दिवस घरातच बसायचं आहे ।

जुने फोटो अल्बम, आठवणी काढा
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

जुन्या चोपड्या काढा, गोष्टी काढा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

चटईनी सतरंजी अंथरून बसा
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

रेडिओ काढा, टेपरेकॉर्डर काढा,
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

जुनी पत्रंनी पुस्तकं काढा ,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

थोडसं स्वत:च्या जगण्याचा हिशेब मांडा
थोडे दिवस  घरातच बसायचं आहे

थोडा वेळ स्वत:सोबत घालवा ,
थोडेदिवस  घरातच बसायचं आहे

कागदनी पेन वापरून पहा
थोडेदिवस  घरातच बसायचं आहे

मेंदू आणि शरीर जरा शांत ठेवा,
थोडे दिवस  घरातच बसायचं आहे

डाळ-भाताची सवय करा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

नसलो आपण तरी जग चालतं
कोण नसेल तर आपलं मात्र अडतं

कुठे नेमकी आपली जागा
जरा शांतपणे शोधायची आहे

आपण आहोत की नाही याची पण खात्री करायची आहे।।

स्वत:ला सांगा फक्त स्वत:बद्दल
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)