Tag Archives: happy

चर्चा तर होणारच…!

1472065_546813062079085_815422248_n

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही त्यांनी भरवलं. या अकल्पित घटनेची खबरबात देवाधिराजांपर्यंत पोहोचताच सारा दरबार अवाक् होऊन एकसुरात उद्गारला, ‘..चर्चा तर होणारच!

पृथ्वीतलावरून कसला तरी ‘खाटऽऽ खूटऽऽ’ आवाज येऊ लागला म्हणून देवाधिराज इंद्रदेवांनी तत्काळ नारदमुनींना पाचारण केलं. मात्र, एखादी घटना घडून गेल्यानंतर जेवढय़ा वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, त्याहीपेक्षा जास्त कालावधी नारदमुनींना दरबारात प्रकट होण्यासाठी लागला.

‘हे काय मुनी? मी जर भू-तलावर सत्तेत असतो, तर सीबीआय अधिकारीसुद्धा तुमच्यापेक्षा लवकर माझ्या दिमतीला हजर झाले असते नां!’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला!’ वातावरणातला तणाव दूर करण्याच्या हेतूनं हातातली वीणा हळुवारपणे वाजवत नारदमुनी उत्तरले.
‘पण कसले अडथळे मुनी? रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का?’ देवाधिराजांनी विचारलं.
‘छे छे महाराज. काल-परवाच्या अवकाळी पावसामुळं प्रशासनाला पुन्हा एकदा निमित्त मिळालं बघा. रस्ते दुरुस्तीचं काम पुढं ढकलण्याचं.’
‘मग चौका-चौकांत ‘काम चालू, रस्ता बंद’च्या पाट्या टांगून ठेवल्या गेल्या आहेत, त्याचं काय?’
‘मी त्यात थोडीशी दुरुस्ती करून आलोय देवाधिराज. ‘काम बंद अन् रस्ताही बंद’ असं रंगवून आलोय पाटीवर.’ नारदमुनींच्या बुद्धिचातुर्यावर देवाधिराज पुरते खूश झाले.

‘असो. असो. पण, मला सांगा.. हा ‘खाटऽऽ खूट’ आवाज कसला येतोय भू-तलावरून मुनी?’ देवांनी मूळ विषयाला हात घातला.
‘तो आवाज म्हणता होय? तो चौका-चौकांतल्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या मंडपांचा आवाज आहे महाराज.’ मुनी बोलले.
‘अरे बाप रे..! आता कोणता उत्सव आला परत?’ गेल्या दोन महिन्यांत झालेली रस्त्यांची चाळण डोळ्यांसमोर तरळताच देवाधिराज पुरते दचकले.
‘उत्सव नव्हे.. अखिल भारतीय एफडीबी साहित्य संमेलनाची जोरात तयारी चाललीय ना महाराज.’ मुनींनी अधिक माहिती पुरवली.
‘मला बुडित बँकांमधला एफ्डी माहीत होता. बुडणार्याा शेतकर्यां चा एफडीआयही पाठ झाला होता.. पण हा एफडीबी काय प्रकार आहे बुवा?’ मोबाईलमध्ये जणू एखादं नवीन अँप्लिकेशन सापडावं, त्या उत्सुकतेनं देवाधिराजांनी विचारलं.
एफडीबी म्हणजे फ्लेक्स डिजिटल बोर्ड !’ इति नारदमुनी.
‘ऑ? आता फ्लेक्सचा अन् साहित्याचा काय संबंध?’ देवाधिराजांना एकावर एक आश्चार्याचे धक्के बसत होते.
‘होय महाराज. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. परंतु आपण तरी काय करणार? विषय गंभीर; पण भाऊ खंबीर!’ अत्यंत निर्विकारपणे मुनी उत्तरताच दरबारात भलताच आ वासला गेला.
‘आता हा भाऊ कोण?.. अन् तो का खंबीर आहे?’ देवाधिराज अधिकच अस्वस्थ.
‘कारण महाराज.. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे!’ मुनींचा पुढचा डायलॉग ऐकताच दरवाजात पुन्हा चुळबूळ वाढली.
‘अरे पण .. या भाऊला कुणी विचारलं नाही का? तो असा का वागतोय?’ आता कुबेर पुढं सरसावले.
‘देवा..आता भाऊला कोण विचारणार? कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा!’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती ! त्यांच्या डोळ्यांत संताप एकवटू लागला होता. पण, हाय.. मुनींची ‘कॅसेट’ तशीच सुरूच राहिली.

बघता काय रागानं.? मैदान मारलंय वाघानं!’ मुनींचं हे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर मात्र देवाधिराज सतर्क बनले. मुनींच्या वाणीतून आत्तापर्यंत बाहेर पडलेल्या या सार्या! वाक्यांमागं काहीतरी वेगळा इतिहास लपल्याची त्यांना जाणीव झाली. भू-तलावर काहीतरी अकल्पित घडत असल्याची त्यांना अनुभूतीही आली.
..म्हणून त्यांनी ‘भाऊ अन् वाघ’ या जगावेगळ्या भाषेतच पुढचा संवाद साधण्यावर भर दिला. ‘पण काय हो मुनी.. वाघानं मैदान मारल्यावर आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय?’ देवाधिराजांनी विचारताच मुनींनी तत्काळ जाहीर केलं, ‘एकच फाईट.. वातावरण टाईट.
‘एक से एक भन्नाट डायलॉगबाजी’ ऐकून इतर देवांनाही आता मुनींच्या संवादात अधिक रस वाटू लागला. एकाने गंभीरपणे पुढचा प्रश्न विचारला, ‘मग भेदरलेले बघे घाबरून पळाले असतील की !’
‘होय तर .. एक घाव शंभर तुकडे. अर्धे इकडे अर्धे तिकडे

‘काय म्हणता काय? परंतु याचा महिला वर्गाला काही त्रास?’ इतका वेळ पाठीमागं कुठंतरी उभारलेल्या अप्सरेनं पुढं सरसावून विचारलं. कदाचित ‘महिला हक्क अन् अधिकार’ याची जाणीव तिलाही झाली असावी.
‘छे छे. मुलींचा दावा आहे.. भाऊ छावा आहे.’ मुनींचे चौकार-षटकार सुरूच होते. हळूहळू सावरत चाललेला दरबार पुन:-पुन्हा बुचकळ्यात पडत होता.
‘ऑ? पाच मिनिटांपूर्वी तर तुमचा भाऊ वाघ होता. मग आता लगेच ‘छावा’ कसा काय झाला?’ कुबेरांना आतून संताप-संताप होत होता.
‘त्यात काय विशेष, आली लहर केला कहर!’ मुनींच्या या संवादफेकीनंतर मात्र अनेकांचा संयम तुटला. सहनशीलतेचा बांध फुटला.
‘मुनी.. तुमची ही चित्रविचित्र साहित्यिक भाषा आमच्या शिरपेचावरून चाललीय. आता तरी सांगा, कोण आहे हा भाऊ?..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून?’ देवाधिराजही आता भलतेच गंभीर होत चालले होते.
भाऊंची डेअरिंग कालपण, आजपण अन् उद्यापण. महाराज.. भू-तलावरचे हे आधुनिक भाऊ खूप मोठ्ठे आहेत. जसं प्राचीनकाळी साधुसंतांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपापली परंपरा निर्माण केली होती; तसंच हे भाऊही आजकाल चौका-चौकांत स्वत:ची आगळी-वेगळी संस्कृती निर्माण करू लागलेत. जगावेगळ्या साहित्याची निर्मिती करू लागलेत.’ अखेर नारदमुनींनी मेन पत्ता ओपन करताच सार्यांथच्याच नजरेसमोर गल्लीबोळातले ‘फ्लेक्सबोर्ड’ झळकू लागले. आत्तापर्यंत मुनींनी ऐकविलेल्या प्रत्येक संवादामागचे रहस्यही उलगडत गेले.
‘पण काय हो मुनी.. या भाऊंचे कार्यकर्ते एफडीबी साहित्यिक संमेलन भरवताहेत म्हणता.. पण याचा खर्च नेमका करतोय कोण?’ युगानुयुगे जमाखर्चाच्याच राड्यात अडकलेल्या कुबेरांनी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटणारा अचूक प्रश्न विचारला.

नारदमुनी गालातल्या गालात हसले. घसा खाकरून मिस्कीलपणे उत्तरले, ‘बोर्डावर जरी शुभेच्छुक म्हणून गल्लीबोळातल्या डझनभर लेकरा-बाळांचे फोटो असले, तरी याचा सारा खर्च वरच्या फोटोतला भाऊच करत असतो.
खालची नावं केवळ नावालाच असतात. अगदी तस्संच! आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज!’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच!

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/Newspapers)

स्पर्श वेडा..

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.
आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.
सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.
रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे…. किती छान ना.
हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा.
ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो …काहीच नाही.

कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही, तर हे सगळे येणार कुठून? हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्सचा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा…. काही वाचून तर काही न बघता, न उघडता. ऑफिस मधेही याचा ‘वेडे’पणा संपायचा नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती. त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिस मधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत “ताईला बाळ झालंय ना, तिला द्या” म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत, काय म्हणून सांगावा.

तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी सोशल मिडीयातून मित्रांशी संवाद साधायचे, तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणां सोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःखं काहीशी वेगळी असतात, याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही, म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने ‘वेडा’ म्हणायची. त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता.

त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती. एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली, म्हणून हळू हळू चालत जाऊन त्याने दरवाजा उघडला, तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच “काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?” म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी “अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बडबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले” अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते. ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळख असेल, याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.

त्याचे मित्र “फ्रेंड्स लिस्ट” वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा ‘वेडा’ खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा.
त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी “टच” मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांना “स्पर्श” करायला आवडायचे.
तो लोकांच्या मनाला स्पर्श करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात, तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. केवळ स्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.
एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं…

“आज प्रत्येकाच्या ठायी असे स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे व आपापसातील संवाद कमी व वादच जास्त वाढत चालले आहेत तरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक रोज एका लहान मुलाशी व एका वयस्कर माणसाशी संवाद साधायला हवा.मुलांशी बोलताना आपण लहान होतो व चार चांगल्या गोष्टी त्याला हक्काने सांगता येतात व वयस्कर माणसाशी संवाद साधल्यावर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते. हि गोष्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या दैनंदिनीत समाविष्ट करा.
जीवन खुपच सुंदर असते, आहे, ते आनंदात जगा, “वेडे” होऊन जगा…!!”…👌👌👌

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

थोडे दिवस घरातच बसायचं आहे

कॅरम काढा, पत्ते काढा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे ।

सापशिडी आणि बुद्धीबळ  खेळा
थोडे दिवस घरातच बसायचं आहे ।

जुने फोटो अल्बम, आठवणी काढा
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

जुन्या चोपड्या काढा, गोष्टी काढा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

चटईनी सतरंजी अंथरून बसा
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

रेडिओ काढा, टेपरेकॉर्डर काढा,
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

जुनी पत्रंनी पुस्तकं काढा ,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

थोडसं स्वत:च्या जगण्याचा हिशेब मांडा
थोडे दिवस  घरातच बसायचं आहे

थोडा वेळ स्वत:सोबत घालवा ,
थोडेदिवस  घरातच बसायचं आहे

कागदनी पेन वापरून पहा
थोडेदिवस  घरातच बसायचं आहे

मेंदू आणि शरीर जरा शांत ठेवा,
थोडे दिवस  घरातच बसायचं आहे

डाळ-भाताची सवय करा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

नसलो आपण तरी जग चालतं
कोण नसेल तर आपलं मात्र अडतं

कुठे नेमकी आपली जागा
जरा शांतपणे शोधायची आहे

आपण आहोत की नाही याची पण खात्री करायची आहे।।

स्वत:ला सांगा फक्त स्वत:बद्दल
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

स्त्री समाधानी केव्हा असते ?

स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं,

कितीही करा तुझं मन काही भरत नाही.
तुझं आपलं नेहमी चालूच असतं,
माझ्यासाठी कधी हे केलं का?
ते केलं का?
तू कधीच समाधानी नसते.

पण,
अस नाही होे….
स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो….

स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहताना
my best friends my mom and dad असे लिहतात.

स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा चार लोकांसमोर तीच कौतुक नवरा मोठ्या अभिमानाने करतो….

स्त्री समाधानी असते तेव्हा , जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो…

स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा तिचा नवरा म्हणतो, व्वा !
काय चव आहे तुझ्या हाताला…..
मुलं जेव्हा म्हणतात मम्मा तुझ्या सारख जेवण कुणीच बनवत नाही ग…..

स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा नवरा कामावरून येताना सहज एखादा गजरा आणतो.
आणि तिच्या केसात माळतो.

स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा सासुसासरे अभिमानाने सांगतात हया आमच्या सुनबाई आहेत..
छे! सुनबाई नाहीच हो,
ही तर आमची लेक हो!!!

स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा सून म्हणते आई छान दिसतेयहं ही साडी तुम्हाला..

स्त्री समाधानी असते,
तेव्हा,
जेव्हा नातवंड आजी आजोबांनाही आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असा आईबाबांकडे लाडिक हट्ट करतात.

स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा मुलगा जाता-येता आई जेवलीस का?
बाबा कुठे आहेत ग,
जेवले का ? असे विचारतो

स्त्री समाधानी असते तेव्हा
जेव्हा चौकोनी कुटूंबात आई बाबांना महत्वाचं स्थान असतं

स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीत सहभागी केलं जातं….
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री समाधानी जेव्हा होते तिला तिच्या नवरयाचे हवे तसे प्रेम मिळते…….
स्त्री मग ती कोणत्याही वयाची असू दे तिच्यात प्रेम,माया,क्षमा सगळं असतं तिला दुर्लक्षित करू नका….
ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे,
तिला तीच स्थान द्या…
तिला दुर्लक्षित केले की ,ती भांडायला उठते म्हनून ती कजाग, उद्धट होते पण,
जेव्हा जेव्हा तिच्या मनाविरुद्ध आणि चुकीचे घडत आहे त्या- त्या वेळी शक्तीने जन्म घेतला आहे….
म्हणून स्त्री लक्ष्मी आहे तिला तिचं स्थान द्या…..
छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी ही एक निसर्गाची सुदंर कलाकृती आहे….

ती आपल्या रथाच एक चाक आहे.
🙏

काळजी स्वतःची..

काळजी स्वतःची … ती कशी घ्यायची?

काळ-काम-वेगाचं गणित तर पाळायलाच हवं, त्याला इलाज नाही; पण सकस खाणं-पिणं, चांगलं वाचणं-बिचणं आणि पॉझिटिव्ह विचार करणं, आपली विनोदबुद्धी – सेन्स ऑफ ह्युमर जागृत ठेवणं इज अ मस्ट!
आता सारखा +ve +ve काय विचार करायचा!

प्रत्येक गोष्टीत शक्य होतंय का ते? होईलच का ते?…

समजा, असं झालं तर काय कराल? तसं झालं तर काय कराल? असा तुमचा उलट प्रश्न असेल, बरोबर?
वेल. तुम्ही काल्पनिक गोष्टींना घाबरूनच हे बोलता आहात, हे लक्षात आलं म्हणून एक काल्पनिकच उदाहरण घेऊ.
एक कोडंच घ्या ना नमुन्यादाखल…

tiger1

तुम्ही आफ्रिकेच्या जंगलात गेला आहात. चुकून तुमच्याकडून तिथल्या नियमांचं उल्लंघन झालंय आणि म्हणून तिथल्या आदिवासींनी तुम्हाला शिक्षा दिलीय जन्माची अद्दल घडण्यासाठीच… दोरखंडाने बांधून एका झाडाला उलटं टांगून ठेवलंय, दोरखंड तुमच्यापासून लांब झाडाच्या बुंध्याजवळ कुन्नी ठोकून बांधलाय, त्या दोरखंडाला खालून मेणबत्ती लावून ठेवलीय, भरीत भर म्हणून झाडाखाली सिंह येऊन जिभल्या चाटत थांबलाय. मेणबत्तीच्या उष्णतेने दोरखंड जळेल, तुटेल, लटकलेले तुम्ही अलगद नव्हे धप्पकन खाली पडाल आणि जंगलच्या राजाला आयती मस्त मेजवानी मिळेल! व्वा, क्यात सीन है!
काय कराल तुम्ही अशा स्थितीत? जीवाला घाबरणं काय हो, कुणीही करेल, ते सोडून दुसरं काय कराल? सुटकेसाठी काय शक्कल लढवाल? की अवसान गाळून बसाल?…
बघा हं, म्हणजे खाली आयतं उत्तर बघण्याआधी, विचार करून बघा खरा खरा! प्रामाणिक विचार अशा स्थितीत तुम्ही काय कराल?

tiger2
जिंकलात की हरलात?


आधीच म्हटलं ना, गांगरून जाण्यापेक्षा जरा वेगळं पॉझिटिव्हली विचार करा, सेन्स ऑफ ह्युमर जागृत ठेवा… अरे मौका भी है, साहित्य भी है…
जंगलच्या राजाला खूश करा…
त्याला हॅप्पी बर्थ डे म्हणा! विझली मेणबत्ती, वाचला दोरखंड,
तुम्हालाही सुटकेचा मिळाला ना मार्ग!

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)