Tag Archives: marathi

ओळख राशींची – मेष

‘मेष’ ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नी तत्त्वाची व रजोगुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ही पुरुष रास आहे. तसेच अल्पप्रसव व चररास आहे. मेंढय़ाप्रमाणे लढऊपणाने व निकराने कोणत्याही प्रसंगात टक्कर घेण्याचा आपला स्वभाव आहे. आपण शूर व करारी आहात. स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. त्यामुळे कोणाच्याही हाताखाली चाकरी करणे आपल्याला नापसंत असते. प्रत्येक क्षेत्रात बाणेदारपणे, तडफदारपणे व आत्मविश्वासाने काम करण्याचा आपला स्वभाव आहे.

मूर्तिमंत चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे आपले वैशिष्टय़ आहे. युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाडय़ात धर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. आपल्याच धुंदीत व मस्तीत बेगुमानपणे व उन्मत्तपणे आक्राळविक्राळ लाटांनी फेसाळत दुथडी भरून पूर आलेल्या व वेगाने वाहणा-या नदीसारखा आपला स्वभाव आहे. संकटकाळी न घाबरणारी साक्षात मृत्यूच्या जबडय़ात प्रवेश करणारी आपली रास आहे. कसल्याही नाठाळ घोडय़ाला वठणीवर आणणारी आपली रास आहे. कसलेल्या स्वाराप्रमाणे आपली घोडय़ावरील मांड पक्की असते. झुंजारपणा हे आपले खास वैशिष्टय़ आहे. शौर्य, धाडस, धडाडी, साहस, धैर्य, निग्रह, निश्चय व आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती, मनोनिग्रह, स्वातंत्र्यप्रेम या गोष्टी उपजतच आपल्याकडे असतात. सम्राट सिकंदराप्रमाणे सारे जग जिंकावे असे आपणास वाटत असते. नेपोलियनप्रमाणे ‘अशक्य’ हा शब्द आपल्याही शब्दकोषात नसतो.

आपल्या व्यक्तिमत्त्वात रग आहे. मनगटात जोर आहे. व्यक्तिमत्त्वात अपूर्व ताकद आहे. स्वभाव बाणेदार आहे. आपल्या स्वभावात हुकूमशाही आहे. आपले बोलणे, वागणे आक्रमक वृत्तीचे असते. हातात काहीही राखून न ठेवण्याचा आपला स्वभाव असतो. आपल्याला आपल्या मानी स्वभावामुळे अपमान सहन होत नाही. आपली मते व विचार इतरांवर लादण्याचा आपला स्वभाव आहे. कुटुंबातील, ऑफिसमधील, संस्थेतील सर्वानी आपल्याच तंत्राने वागावे असे आपणास वाटत असते. आपल्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. आपण गतिमानतेने, वेगाने, त्वरेने काम करणारे असता, त्यामुळे अनेक संस्थांचे नेतृत्व आपणाकडे चालून येते.

आपला स्वभाव कडक असतो. तापट असतो. काहीवेळा फटकळही असतो. दुस-यावर वर्चस्व गाजविण्यात आपल्याला आनंद वाटतो. नमते घेणे, माघार घेणे आपल्या स्वभावात नसते. आपल्याला चटकन संताप येतो. आपण थोडेसे भांडखोर असता. मात्र आपल्याकडे चिकाटी आहे. जिद्द आहे. सतत गतिमान राहून परिस्थितीचा वेध घेऊन पुढे जाण्याची ईर्षा आहे. नराश्याने हातपाय गाळून स्वस्थ बसण्याचा आपला स्वभाव नाही. आपल्या वृत्तीत गर्वष्ठिपणा आहे. अहमपणा आहे. स्वभावात मानीपणा आहे. आपल्याकडे थोडे क्रौर्य आहे. निष्ठूरपणा आहे. कोपिष्टपणा आहे. त्याचप्रमाणे काहीवेळा उतावीळपणाने व अविचाराने कार्य करण्याची व निर्णय घेण्याची आपली वृत्ती आहे. आपल्या बोलण्या-चालण्यातून घमेंडी स्वभाव दिसून येतो. आपणाला प्रवासाची आवड असते. आपले ठिकाण वारंवार बदलण्याची आवड असते. परिस्थितीला हवे तसे वळण आपण देऊ शकता. परंतु, त्याचबरोबर आपला स्वभाव हा शिपाई गडय़ासारखा रांगडा व सरळधोपट असतो. प्रत्येक गोष्टीत धांदल, धावपळ करण्याची आपणाला सवय असते. आपली रास ही आरंभशूर आहे. नेतृत्व करणारी सामर्थ्यवान अशी आपली रास आहे.

मेष या राशीमध्ये आश्विनी, भरणी व कृत्तिका ही तीन नक्षत्र येतात. आश्विनी नक्षत्रातील चारही चरण, भरणी नक्षत्रातील चारही चरण व कृत्तिका नक्षत्रातील फक्त पहिल्या चरणाचा समावेश मेष राशीमध्ये होतो.

मेष रास व आश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – विद्वान, चतुर, सौंदर्यप्रेमी, स्वच्छतेची आवड, स्वकार्यदक्ष, चलाख, सुखी, यशस्वी, मानसिकदृष्टय़ा स्थिर, व्यवहारकुशल, विनयशील, काहीवेळा जास्त उतावळेपणा, काही प्रमाणात विश्वासघातकी.

मेष रास व भरणी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – वाचाळ, भाग्यवादी, धनाढय़, भोजनप्रिय, कृतघ्न, काही वेळा क्रूर व निष्ठूर, विचारात अस्थिरता, भोगप्रिय, सुगंधित वस्तूंचे शौकीन

मेष रास व कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – तेजस्वी, विद्वान, चतुर, राजासमान आचरण, स्वाभिमानी, गुप्त विद्येमध्ये रस असणारे, स्त्री सान्निध्याच आकर्षण असणारे, प्रसिद्धी मिळविणारे, काही प्रमाणात चलाख व क्रोधी.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
अश्विनी नक्षत्र – चू, चे, चो, ला
भरणी नक्षत्र – ली, ले, लू, लो
कृत्तिका नक्षत्र – अ

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

स्वराज्य आणि रामराज्य..

श्री शिवछत्रपतींच्या इतिहासात अनेक लेखकांना त्यांच्या स्वमताला अनुकूल असणारे मत शोधायचा ध्यास लागलेला असतो. विविध हेतू ठेऊन निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय संघटना स्वत:चे मत हे समाजमत म्हणून मान्यता पावले जावे म्हणून शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये अक्षम्य ढवळाढवळ करतात. जदुनाथ सरकारांना तर शिवछत्रपतींच्या इतिहासाची खोली ही राजकीय सत्ते बरोबर सांस्कृतिक सत्तेपर्यंत होती हे उमगले नाही. कॉ शरद पाटील, गोविंद पानसरेंना शिवछत्रपतींच्या इतिहासात निव्वळ साम्यवाद दिसला. राजवाड्यानी इतिहासमांडणीआडून वर्णव्यवस्थेच्या पाठराखणीची हौस भागवून घेतली.

मूळात शिवछत्रपतींच्या अधीन असलेल्या मध्ययुगाच्या बाबतीत एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कि तत्कालीन भक्तीमार्ग आणि संप्रदायाशी तत्कालीन समाज एकरुप झाला होता. वारकरी, भागवत संप्रदायाची अध्यात्मिक चळवळ ही त्यांच्या परमोच्च बिंदू वर होती. त्याच भक्तीमार्गांशी तादात्म पावलेल्या देवता श्रीरामश्रीकृष्ण ह्यांचा पगडा लोकमानसावर असणे अगदीच साहजिकच होते. परमानंदाने जो शिवभारत ग्रंथ शिवछत्रपतींची थोरवी सादर करण्यात लिहिला त्याचं ऐतिहासिक दृष्ट्या महत्व थोर आहे ह्या शिवभारताचं नाव “अनुपुराणे सुर्यवंशम “असे येते. महाराजांचा वंशवेल हा प्रभू रामचंद्रां पर्यंत जातो हि धारणा तत्कालीन समाजात होती. परमानंदाने शिवभारताच्या दहाव्या अध्याया मध्ये श्लोक क्रमांक ३४ ते ४० च्या दरम्यान महाराजांनी अध्ययन केलेल्या ज्या शास्त्र ग्रंथांची यादी दिली आहे त्यात श्रुति,स्मृती ह्या बरोबरच रामायणाचा उल्लेख स्वतंत्र रित्या केला आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की तत्कालिन हिंदू समाज व्यवस्थेत राजा म्हणून श्री रामचंद्राची क्षत्रिय दिनचर्या आदर्श होती.

अज्ञातदासाच्या पोवाड्यात जी लोककला मानली जाते त्यात जेधे आणि बांदलांच्या बाबतीत अंगद आणि हनुमंताची उपमा येऊन शिवछत्रपती साक्षात प्रभू रामचंद्रांच्या ठायी आहेत. वनवासासाठी निघताना भरताला गादीवर बसवा म्हणणारे जसे प्रभू रामचंद्र दिसतात तसेच ह्याच पोवाड्यात उमाजीस म्हणजे महाराजांच्या पुतण्यास गादीवर बसवा असा थेट उल्लेख आहे. रामायणातला भ्रातृभाव आपल्याला शिवछत्रपतींच्या इतिहासात स्पष्ट दिसतो. व्यंकोजीराजांसोबत झालेल्या संघर्षात महाराजांची बाजू न्याय असताना महाराज पराभूत झालेल्या व्यंकोजीराजांबाबत रघुनापंतांना लिहितात.’व्यंकोजीराजे आपले धाकटे बंधू आहेत. मूलबुद्धी केली, त्यास तोही आपला भाऊ, त्यास रक्षणे, त्याचे राज्य बुडवू नका” महाराजांनी रामायण आत्मसात केलं ते असं आणि रामायण सांगण्यावर नंतर अधिकार गाजवणारे रामाचं रघुनाथ नाव धारण करू राहत्या घरात पुतण्याला ठार मारणारे पेशवाईत निपजले हा सुद्धा इतिहासच.

स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला असलेल्या “सुवेळा “व “संजिवनी” माची ही रामायणाशी अंतर्धान पावणारी नावे ही परंपरा इथेच न थांबता रायगडाच्या “कुशावर्ता” पर्यंत जाते हे विशेष. राजगडी पालथे निपजलेले ‘रामराजे” हे शिवछत्रपतींच्या श्रीराम आस्थेचा आविष्कार. समर्थांच्या रामदासी संप्रदायाला महाराजांनी कायम आस्था दाखवली मग ती चाफळ च्या मठाला दिलेली सनद असेल अथवा आपली लष्करी ठाणी आश्रमासाठी रामदासी मंडळींना बहाल करणे असेल. महाराष्ट्रात खासा औरंगजेब उतरला तेव्हा ह्या संप्रदायाला तंजावरकर भोसलेंनी राजाश्रय दिला. पुढे जाऊन तर भोसले कुलोत्पन्न नागपूरकरांनी आपले कुलदैवत प्रभू रामचंद्र म्हणून स्विकारले.
महाराष्ट्रात आजही बाळाच्या बारश्याला राम, कृष्णाच्या बरोबरीने शिवछत्रपतींचा पाळणा गायला जातो. दंडकारण्यात श्री भवानी प्रभू रामचंद्रास वर देऊन रामवरदायनी झाली. त्याच वरदायनीला बत्तीस दाताच्या बोकडाचा बळी देणारे महत्तम मर्यादा पुरूषोत्तम श्री शिवछत्रपती मराठ्यांच्या काळजावर कोरलेत ते त्यांच्या “रामराज्य स्वराज्या” मुळे..

सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख,
बारा मावळ परिवार.

रांगोळ्या

रांगोळ्या म्हणजेच हिंदू मंत्रोच्चारांचे Print Outs!
( दुर्मीळ वेगळी माहिती जाणून घ्या )

रांगोळी आणि रांगोळ्या काढणे याबद्दल सर्व माहिती भारतीय हिंदूंना वेदकालापासूनच आहे. वेद, रामायण,महाभारत,अनेक काव्ये, साहित्य, धार्मिक ग्रंथ — पोथ्या अशा अनेक ठिकाणी रांगोळ्यांचे उल्लेख आढळतात. भारतातील ६४ आद्य कलांमध्ये रांगोळी या कलेचा उल्लेख आहे. वेदकालापासून भारतीयांना माहिती असलेली रांगोळी, तिकडे पारशी लोकांनाही माहिती होती, असे दिसते. भारतात रांगोळी, रंगावली, चित्रमाळी, रंगमाळी अशा जुन्या उल्लेखांबरोबरच भौगोलिक प्रदेशानुसार वेगवेगळी नावे आढळतात. कोलम, चौकपूरना, अल्पना, मुग्गूळु अशी विविध नावे आहेत. तर मांडणा ही राजस्थानी रांगोळी जमिनीसारखीच भिंतीवरही काढली जाते.

प्रत्येक सणाला, मंगल कार्यांना, शुभविधीच्या निमित्ताने रांगोळी घातली जाते ( प्रचलित शब्द – ‘ काढली जाते”).खेड्यापाड्यात तर अगदी रोजसुद्धा रांगोळी काढली जाते. घरापुढे, देवघरापुढे, उंबरठा, अंगण, तुळशीवृंदावन, मंदिरे, मंडप, रस्ते अशा विविध ठिकाणी विविध कार्यानुरूप रांगोळ्या काढल्या जातात. गावाकडे अजूनही जमीन किंवा चूल सारवल्यावर अगदी छोटीसी तरी रांगोळी त्यावर काढली जाते. तांदुळाच्या पिठाची रांगोळी घातली जाते ती छोटे कीटक खातात. पण जेवणाच्या ताटाभोवती घातलेल्या रांगोळीमुळे, पानातील पदार्थ खायला येणारे कीटक अडविले जातात. या कीटकांच्या ओलसर नाजूक त्वचेला, दगडाच्या बारीक पावडरची रांगोळी आणि त्यात भरली जाणारी हळद व कुंकू सहन होत नाही. त्यामुळे ते ही रांगोळी ओलांडून पानात येत नाहीत. चैत्र महिन्यातील चैत्रांगणमध्ये काही खास रांगोळ्या काढल्या जातात. कांही विशिष्ट विधी किंवा पूजेला खास रांगोळीच काढली जाते. उदा. कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये बोडण भरण्याची पद्धत आहे. फक्त त्याचवेळी काढायच्या २ / ३ प्रकारच्या रांगोळ्या आहेत. त्या अन्य कधीही काढल्या जात नाहीत. रांगोळीमध्ये किमान हळद आणि कुंकू हे दोन रंग तरी भरले जातातच. फक्त अशुभ प्रसंगी काढल्या जाणाऱ्या रांगोळीत मात्र रंग भरले जात नाहीत.

डोलामाईट किंवा संगमरवर या दगडांची बारीक पावडर करून रांगोळी बनविली जाते. बंगाल आणि दक्षिण भारतात तांदुळाचे पातळ ओले पीठच रांगोळी काढण्यासाठी वापरले जाते. ओणमसाठी फुलांची रांगोळी घातली जाते. शुभ चिन्हे ( गोपद्म, स्वस्तिक, कासव, चंद्र सूर्य, चांदण्या, सुदर्शन चक्र इ.), त्रिकोण – चौकोन – षट्कोन असे भौमितिक आकार, विशिष्ट ठिपके काढून त्यामध्ये परंपरागत रांगोळ्या काढल्या जातात. ही परंपरा हजारो वर्षांची असावी. पण आता त्यात काही बदल झालेले आहेत. या कलेचे अनेक उत्तमोत्तम प्रकार रूढ होत आहेत. धान्य वापरून, फुले – पाने- भाज्या यांचा वापर करून, विविध रंगी मीठ वापरून रांगोळ्या काढल्या जातात. तर रांगोळीने एखाद्या फोटोसारखे हुबेहूब चित्र काढणे म्हणजे कलेची सर्वोच्च पातळी आहे. पाण्यावर तरंगणारी, पाण्याच्या खाली, त्रिमिती रांगोळी असे अनेक सुंदर प्रकार आता पाहायला मिळतात. रांगोळ्यांचे साचे आले आहेत. रांगोळीचे स्टीकर्स म्हणजे रांगोळीची केवळ चित्रे. त्याला रांगोळीची सर नाही. संस्कारभारतीने तर अत्यंत आकर्षक आणि कुठेही काढायला सोयीस्कर अशा रांगोळ्यांची एक सुंदर परंपराच निर्माण केली आहे. अलीकडे मात्र भर रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जातात. त्यावरून पालख्या, गणपती विसर्जन मिरवणूक, रथ नेले जातात. हे चुकीचे आहे. रांगोळ्यांना पाय लागू नये, त्या विस्कटू नयेत. ( याचे सविस्तर कारण खाली देत आहे ). रांगोळ्या रस्त्याच्या दोन्ही कडांना, पाय लागणार नाहीत अशा तऱ्हेने काढाव्यात. आपल्याकडे रांगोळी उचलण्यासाठी किंवा पुसण्यासाठी केरसुणी वापरत नाहीत.

पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि अवकाश ( आकाश ) या पंचमहाभुतांपासून माणसाला देह मिळाला, त्याचे जीवन सुरु राहिले. या पाचही गोष्टी स्थिर नाहीत. पण माणसासाठी तुलनेने पृथ्वी ही स्थिर आहे. तिची सूक्ष्म कंपने सतत सुरु असतात. हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून मंत्रांमधील शब्द, ते उच्चारतांना होणारी कंपने, त्याचा माणसाच्या शरीरावर आणि बाजूच्या वातावरणावर होणारा परिणाम याचे पक्के ज्ञान असलेले निष्णात जाणकार होते. या कंपनांमधून निर्माण होणाऱ्या आकृती आणि आकृतींमधून मिळू शकणारे परिणाम याचे ज्ञान त्यांना निश्चित होते असे दिसते.

आपल्या अनेक परंपरागत रांगोळ्या हे केवळ आकारच नाहीयेत. त्यात खूप वेगळा धार्मिक अर्थ भरला आहे. स्वर आणि सूर यामध्ये सखोल संशोधन करणाऱ्या डॉ. अशोक रानडे यांनी, सुमारे ४० वर्षांपूर्वी कांही प्रयोग केले होते. एका प्रचंड मोठ्या घंटेच्या खाली एक मोठा लोखंडी चौकोनी पत्रा ( प्लेट ) ठेऊन त्यावर त्यांनी रांगोळी फक्त पसरून ठेवली होती. घंटेच्या विविध प्रकारच्या आवाजानुसार खाली ठेवलेल्या पत्र्यावरील रांगोळीच्या कणांचे विविध आकार तयार होत होते. हे आकार अगदी आपल्या अनेक परंपरागत रांगोळ्यांसारखे होते.

आता असेच अत्यंत थक्क करणारे कित्येक प्रयोग, जगामध्ये विविध देशांमध्ये, गेली अनेक वर्षे केले जात आहेत. यामध्ये अनेक शास्त्रज्ञ आणि संगीतज्ञ भाग घेत आहेत. यासाठी विविध प्रकारचे स्पीकर्स आणि धातूच्या जाड पत्र्यांचा वापर केला जात आहे. पत्र्यावर पसरलेली रांगोळीसारखीच जाड पावडर, विविध आवाजांनुसार अगदी हुबेहूब आपल्या ठिपक्यांच्या रांगोळ्यांचे आकार धारण करते. सर्वात आश्चर्याची आणि हिंदू धर्मासाठी अभिमानाची गोष्ट अशी की यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध आवाजांमध्ये आपल्या ओमकारासह अनेक मंत्रोच्चारांचा वापर केला जातो. स्टीव्हन हॅपर्न यांनी केलेल्या एका प्रयोगात, ओSSSम असा उच्चार झाल्यावर एकाच्या आत एक उमटणारी वर्तुळे म्हणजे, “पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् ” याचे प्रत्यंतरच वाटते. ( सोबतच्या व्हिडीओ क्लिप्स जरूर पाहाव्यात ). अनेक आवाजांमधील विविध मंत्रोच्चार आणि त्यानुसार वेगाने साकारणारे रांगोळीचे आकार, आपल्याला थक्क करून सोडतात. कांही आवाज ऐकून तर आपण गावाच्या एखाद्या मोठ्या देवळाच्या गाभाऱ्यातच कांही मंत्रजप ऐकतोय असे वाटते. इव्हॅन ग्रॅन्टच्या एका प्रयोगात, एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला आपल्या समोर चक्क कमळ साकारत जाते. हिंदू धर्मामध्ये कमळाला किती महत्व आहे ते आपण जाणतोच. तर कांही प्रयोगांमध्ये आपण शंख आणि घंटा यांचा आवाज ऐकू शकतो, त्याच्या उमटणाऱ्या आकृत्या पाहू शकतो. त्यांनी अनेक युरोपीय वैज्ञानिकांची नावे घेतली असली तरीही या गोष्टी आपल्याला त्याच्याही आधी, हजारो वर्षांपासून नक्कीच माहिती असाव्यात, असे दिसते. हे प्रकरण चक्क आपल्या DNA ( गुणसूत्रे ) पर्यंत जाऊन पोचते. सोबतचे चित्र क्रमांक ५ आणि ६ जरूर पाहा. निसर्गातील १.६१८ हे सूत्र, ज्याला गोल्डन रेशियो म्हटले जाते ते आपल्या मंत्रांमध्ये, DNA व मानवी देह यात आढळते. ओमकाराचे आधुनिक ध्वनी चित्र, आपले श्रीयंत्र आणि अनेक रांगोळ्या यांच्यामध्ये आश्चर्यकारक साम्य आहे.

वास्तविकपणे आता ध्वनीसाठी ग्राफिक्स, नोटेशन्स, मॉनिटर्स, कॉम्प्युटराइज्ड अनालिसिस अशा अत्याधुनिक गोष्टी उपलब्ध असूनही हे आरेखनाचे प्रयोग केले जात आहेत. याला सायमॅटिक्स ( CYMATICS ) असे म्हटले जाते. हे सर्व प्रयोग आणि त्यांचे परिणाम पाहिल्यावर अशी खात्री पटते की आपल्या पूर्वजांना या गोष्टींचे सखोल ज्ञान होते. ठिपक्यांच्या रांगोळ्या या कालानुरूप बदलत गेल्या असल्या तरी ते कांही मुक्त आकार नव्हेत. निरर्थक चित्रे नव्हेत. आपल्या विविध मंत्रोच्चारांचे ते परिणाम होते. आरेखन होते. प्रिंटाऊट्स होते. आपण जमिनीवर ( जमिनीत सूक्ष्म कंपने असतातच ) आणि पाण्यावरच रांगोळ्या काढतो. हे सर्व प्रयोगही कृत्रिम कंपने निर्माण करण्यसाठी जाड पत्र्यावर आणि पाणी किंवा द्रव पदार्थावारच केले जात आहेत. आपल्या धर्मामध्ये विविध धातूंच्या पत्र्यांवर,कांही मंत्र,आकृत्या,अक्षरे,चिन्हे,मंत्रबीजे कोरून तयार केली जाणारी यंत्रे म्हणजेही याचाच एक भाग असावा.

आपला योग, आयुर्वेद, भारतीय संगीत, कोरोनामुळे भारतीय सार्वजनिक जीवनपद्धती अशा अनेक गोष्टींचा जगात खूप प्रसार होतो आहे. मला अशी आशा आहे की या सर्व अभ्यास आणि निष्कर्षानंतर पाश्चात्य सुद्धा आपल्या घरासमोर रांगोळी काढायला लागतील.

दीपावली म्हणजे जशी दिव्यांची रांग तशीच रंगावली म्हणजे रंगांची रांग ! दिवाळीला रांगोळीमुळेच पूर्णत्व लाभते. आता हे सर्व पाहिल्यावर तरी पुढे कधीही रांगोळी काढतांना आपण ते एक मंत्रचित्र आहे याची आठवण ठेवायला हवी. जर मंत्रोच्चारांमुळे एक आकृती साकार होत असेल तर साकारलेल्या आकृतीतून मंत्रलहरी पुन्हा उत्सर्जित होऊ शकत असतील का ? किंवा पृथ्वीची सतत होत असलेली कंपने , या रांगोळीच्या माध्यमातून बाहेर येऊन नकळत एखाद्या मंत्राचा प्रभाव निर्माण करीत असतील का ? विचार करायला हवा.

ही दीपावली सर्वांना खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो !
( सौजन्य, आभार — विकिपीडिया, गुगल, युट्युब, पिंटरेस्ट, चिन्मयी कानुगोंडा, जॉन रीड, एरिक लार्सन, TED, इव्हान ग्रांट, चार्ल्स टेलर आणि अनेक अज्ञात )


मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

वरील लेखाशी संबंधित लिंक्स—

1) Steven Halpern Great Pyramid OMs Cymatics
https://www.youtube.com/watch?v=Yw13EAX3cZk&feature=emb_rel_end
2) Evan Grant: Making sound visible through cymatics
https://www.youtube.com/watch?v=CsjV1gjBMbQ
3) Amazing Resonance Experiment!
https://www.youtube.com/watch?v=wvJAgrUBF4w

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

उत्तम असामान्य ज्ञान

हे आपणास माहित आहे का?

 • गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.
 • मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.
 • The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात इंग्रजीचे सर्व अक्षर आलेले आहेत.
 • जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.
 • मुंग्या अजिबात झोपत नाहीत.
 • I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.
 • कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.
 • जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद
 • जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.
 • वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.
 • abstemious” आणि “facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.
 • सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्यात अक्षराने संपतात.
 • अमेरिकेत दरमाणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.
 • TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे.
 • उणे चाळीस डिग्रीला सेल्सीअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.
 • चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होवू शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्व्हससिस्टिमवर विपरित परिणाम होतो.
 • स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषां पेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.
 • आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.
 • ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड” तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहं.
 • डुकराना आकाशाकडे पाहता येत नाही.
 • sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील सर्वात उच्चारणास अवघड वाक्य मानले जाते.
 • Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.
 • आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहीनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.
 • पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत.
 1. इस्पिक – राजा डेव्हिड
 2. चिलावर – अलेक्झांडर
 3. बदाम – चार्लेमॅग्ने
 4. चौकट – जुलियस सिझर
 • आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.
 • 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321
 • ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
 • गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स हे सर्व स्त्रीयांनी शोधलेली साधने आहेत.
 • मध हे एकमेव खाद्यान्न चीरकाल टिकते.
 • मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
 • साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.
 • सर्व विषुवृत्तिय अस्वल डावरे असतात.
 • विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.
 • फुलपांखरे पायांनी चव अनुभवतात.
 • हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
 • मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी मानसाळला गेलेला नाही.
 • मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
 • Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
 • मुंग्या विष प्राशना नंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
 • विज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
 • रक्ताचा तीस फुट फव्वारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते.
 • उंदिरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहालाख होवू शकतात.
 • इअरफोन एकतास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700पट विषाणू वाढतात.
 • सिगारेटलायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
 • बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.
  ‘——‘——–‘———‘———‘——-‘

ही पोस्ट मला इंग्रजीतील मिळाली. ती वाचन सुविधेस्तव मराठीत केली आहे. यातील बऱ्याच गोष्टी मलाही माहित नव्हत्या. असो.
उत्तमोत्तम सर्वांना, उर्वरित मला.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

स्पर्श वेडा..

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.
आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.
सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.
रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे…. किती छान ना.
हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा.
ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो …काहीच नाही.

कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही, तर हे सगळे येणार कुठून? हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्सचा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा…. काही वाचून तर काही न बघता, न उघडता. ऑफिस मधेही याचा ‘वेडे’पणा संपायचा नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती. त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिस मधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत “ताईला बाळ झालंय ना, तिला द्या” म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत, काय म्हणून सांगावा.

तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी सोशल मिडीयातून मित्रांशी संवाद साधायचे, तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणां सोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःखं काहीशी वेगळी असतात, याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही, म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने ‘वेडा’ म्हणायची. त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता.

त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती. एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली, म्हणून हळू हळू चालत जाऊन त्याने दरवाजा उघडला, तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच “काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?” म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी “अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बडबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले” अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते. ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळख असेल, याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.

त्याचे मित्र “फ्रेंड्स लिस्ट” वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा ‘वेडा’ खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा.
त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी “टच” मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांना “स्पर्श” करायला आवडायचे.
तो लोकांच्या मनाला स्पर्श करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात, तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. केवळ स्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.
एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं…

“आज प्रत्येकाच्या ठायी असे स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे व आपापसातील संवाद कमी व वादच जास्त वाढत चालले आहेत तरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक रोज एका लहान मुलाशी व एका वयस्कर माणसाशी संवाद साधायला हवा.मुलांशी बोलताना आपण लहान होतो व चार चांगल्या गोष्टी त्याला हक्काने सांगता येतात व वयस्कर माणसाशी संवाद साधल्यावर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते. हि गोष्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या दैनंदिनीत समाविष्ट करा.
जीवन खुपच सुंदर असते, आहे, ते आनंदात जगा, “वेडे” होऊन जगा…!!”…👌👌👌

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)