वास्तू टिप्स – व्यवसाय

दुकान आणि व्यवसाय हे अनेक प्रकारचे असतात. उदा. किराणा, स्टेशनरी, हार्डवेअर, कटलरी, कपडयांचे, पार्लर, सोने-चांदी ज्वेलरी शॉप, नॉव्हेल्टी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम साहित्य, फर्निचर, मिठाई, टेलरिंग, भाजीपाला, स्टुडिओ, इस्टेट एजंट, फुटवेअर, फर्निचर किंवा घाऊक विक्रेते यांसारखे अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात.

वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही व्यवसायावर एखाद्या विशिष्ट पंचमहाभूताचा प्रभाव असतो. त्यामुळे दुकान हे संपूर्ण तेव्हांच असेल जेव्हा त्याची रचना वास्तुशास्त्रानुसार असेल. परिणामे व्यवसायात सुद्धा वृद्धी होऊ शकते. त्यामुळे व्यावसायिक प्रगती चांगली होते. अडचणी, अडथळे कमी होऊन सर्व व्यवहार सुरळीत पार पडतात. कोणत्याही प्रकारे वादविवाद न होणे, ग्राहक चांगल्या प्रकारे आकर्षित होणे व ग्राहक संतुष्ट होणे, कमीतकमी नुकसान होणे, कुठेही पैसा अडकत नाही. आर्थिक प्रगती व स्थैर्य व्यवस्थितरित्या प्राप्त होते.

प्रत्येक व्यवसायात पंचमहाभूतांपैकी एका विशिष्ट तत्वाचा प्रभाव जास्त असतो व त्या तत्वाचे स्थान ज्या दिशेत असते त्या दिशेत त्या व्यावसायिक दुकानाचे प्रवेशद्वार चांगले मानले जाले. खालील काही दुकाने आणि व्यवसाय यांसाठी प्रवेशद्वाराची दिशा,

 • ईशान्य दिशा: सर्वसाधारणपणे सर्वच व्यवसायांसाठी ही दिशा लाभदायी आहे. त्यातल्या त्यात कपडा, कागद, शैक्षणिक वस्तु, खाद्यपदार्थ, मिठाई, मेडिकल, हॉटेल्स (खानावळ).
 • आग्नेय दिशा- तेलजन्य पदार्थ, ब्युटी पार्लर्स, फटाके, स्फोटके, इलेक्ट्रिकल वस्तू, पेट्रोल पंप, एअरकंडिशनिंग व इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, पॉवर इनव्हर्टर्स, औद्योगिक कारखाने हॉटेल्स (उंची प्रकार)
 • नैऋत्य दिशा- चैनीच्या वस्तू, मौल्यवान व किमती वस्तू, महिलांशी संबंधित गार्मेंन्टस्, कॉस्मेटिक्स व ज्वेलरी शॉप्स, परमीट रुम, बिअर बार, केक शॉप, कोळसा, टायर्स, लोखंड मार्बल, ग्रेनाईट.
 • वायव्य दिशा- विविध प्रकारचे स्प्रे, सुंगधी द्रव्ये, टेलिकम्युनिकेशन संबंधित सर्व व्यवसाय त्यात पीसीओ, मोबाईल फोन शॉप्स, सेल्स प्रमोशनासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, स्टेशनरी स्त्रियांच्या नावाने चालविले जाणारे व्यवसाय, शेतीमाल, बि-बियाणे, खते, पाईप्स.

अगदी जरी व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे असले, तरी वास्तुशास्त्राप्रमाणे काही मुलभूत घटक सारखेच असतात.

 • दुकानाचे प्रवेशद्वार पाच शुभ प्रवेशद्वार म्हणजे उत्तर, ईशान्य, पूर्व, दक्षिण-आग्नेय, पश्चिम-वायव्य. विविध दिशा व व्यवसाय या बाबत जी चर्चा आपण वर केली आहे त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते की, पाच शुभ प्रवेशद्वार हे सर्व प्रकारच्या व्यवसायांना लाभदायी असतात. तसेच नैऋत्य दिशेचे प्रवेशद्वार सर्वच प्रकारच्या व्यवसायांना लाभदायी असतात.
 • दुकानातील देवाचे स्थान, जलस्थान व वजनाने हलक्या-छोटया वस्तूंचा साठा किंवा मांडणी उत्तर ते पूर्व या भागात करावी.
 • सर्वात जास्त मोठे आणि वजनदार सामान नैऋत्य दिशेत ठेवावे. तसेच दुकानातील मालकाची बसण्याची जागा नैऋत्य दिशेतच असावी. याच भागात तिजोरी अथवा पैशाचा मुख्य गल्ला अशा प्रकारे ठेवावा, जेणे करुन ते ईशान्येस किंवा पूर्व अथवा उत्तर दिशेस उघडेल.
 • वायव्य दिशेमध्ये विविध वस्तूंचा डिसप्ले अथवा जाहिरातीसाठी मांडणी करणे खूप चांगले असते. तसेच ज्या वस्तूंच्या विक्रीमध्ये दुकानदारास अधिक स्वारस्य असते अथवा ज्या वस्तू बऱ्याच कालावधीपासून विकल्या नाहीत अशा सर्व वस्तूंचा साठा वायव्य दिशेमध्ये करावा.
 • सर्वाधिक किमती वस्तूंचा साठा दक्षिणेस असावा.
 • दुकानाची निवड करताना वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करणे म्हणजेच यशाचा मार्ग सोपा बनविणे हा होत असतो. म्हणूनच आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त चांगला लाभ मिळावा या हेतूने वास्तुशास्त्र तज्ञांमार्फत निवड आणि रचना करणे अतिशय योग्य असते.
 • ज्या दुकानाची रचना किंवा बांधणी करताना वास्तुशास्त्राचा विचार केलेला नव्हता. अशा ठिकाणी रचनात्मक फेरबद्दल करुन ही वास्तू अधिकाधिक लाभदायी कशी करता येईल याचा वर उल्लेख केलेल्या तत्त्वानुसार वापर करणे अधिक चांगले असते, परंतु ज्या ठिकाणी या तत्वांचा वापर करणे शक्य होत नाही त्या ठिकाणी भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित विनातोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून त्या दुकानाची लाभदायी शक्ती किंवा फलनिष्पत्ती वाढविता येऊ शकते.

वास्तुशास्त्र ब्युटीपार्लरचे:

ब्युटीपार्लर या दुकान प्रकारात महिला व पुरुष असे दोन प्रकार येतात. अंतर्गत रचना दोन्ही बाबतीत बरेच साम्य असणारी असते. अर्थात महिला ब्युटीपार्लरमध्ये सौंदर्य खुलवाण्यावर जास्त भर असतो.

पुरुषप्रधान पार्लर्स ही अत्यावश्यक बाब असल्याने त्यांचे प्रवेशद्वार शुभस्थानातच असलेच पाहिजे. तर महिला ब्युटीपार्लर्स ही जास्त करुन उच्चवर्णीयांची तथा चैनीच्या सदरात येतात. तसेच महिला व सौंदर्यांशी संबंधीत व्यवसाय असल्यामुळे दक्षिण, नैऋत्य अथवा आग्नेय दिशेतसुद्धा प्रवेशद्वार या व्यवसायास लाभदायी असते.

 • संपूर्ण दुकानात पूर्वोत्तर तसेच दक्षिण-पश्चिम भागात दोन्ही बाजूस आरसे असावेत.
 • ग्राहकांचे तोंड पार्लर खुर्चीवर बसल्यानंतर पूर्वोत्तर असावे. कारण ग्राहकाचे समाधान होणे आवश्यक असते. तसेच या दिशेत तोंड केल्याने सकारात्मक वृत्ती अधिक चांगली राहते.
 • केशकर्तन कचरा दुकानाच्या वायव्य भागात साठवावा.
 • दुकानाच्या मालकाची बैठक व्यवस्था नैऋत्य दिशेतच असावी.
 • ग्राहकांची बैठक व्यवस्था दक्षिण व पश्चिम सोडून अन्यत्र कोणत्याही दिशेत जागेच्या उपलब्धतेनुसार असावी.
 • विक्रीसाठी व दुकानात वापरायच्या सौंदर्यप्रसाधनाचे डिसप्ले-प्रदर्शन वायव्य दिशेत करावे तर जास्तीत जास्त साठा दक्षिण व पश्चिम भागात ठेवावा.
 • विविध प्रकारची ऑईल्स अथवा तेलजन्य पदार्थांचा साठा आग्नेय दिशेत केलेला बरा.
 • वाफ, अथवा उष्णतेसंबंधित, तसेच मसाज वगैरे ट्रीटमेंट्स आग्नेय दिशेत केलेल्या चालतात.
 • शौचालय अथवा स्वच्छताग्रहाची व्यवस्था वायव्य ते पश्चिम भागात करणे योग्य असते.
 • एअरकंडिशनर आग्नेय दिशेत असावा.

वास्तुशास्त्र शॉपिंग मॉल्स-मल्टिप्लेक्सचे:

 • प्लॉटमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्या दिशेत रोड आहे त्यानुसार कंपाऊंड गेटसाठी लाभदायी दिशा ठरविता येऊ शकते.
 • मॉल्समध्ये विशिष्ट व्यवसाय केंद्रिभूत केला असल्यास उदा. केवळ कपडयांची दुकाने, केवळ चैनीच्या वस्तू, त्यानुसार त्या व्यवसायास अनुकूल दिशा प्रवेशद्वारासाठी निवडल्यास अधिक चांगले.
 • संपूर्ण मॉलच्या पूर्व, उत्तर व ईशान्य भागात जास्तीत जास्त मोकळी जागा असावी जमल्यास उडत्या पाण्याची कारंजी असावी.
 • सर्वसाधारणपणे वास्तुला तळघर नसावे. परंतू शॉपिंग मॉल्ससाठी तळघर व पार्किंग अत्यावश्यक असते. त्यामुळे ईशान्य भागात पार्किंग सोबत अंडरग्राऊंड वॉटर टँक असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे सर्वच दिशांमध्ये होणाऱ्या वास्तुदोषांची तीव्रता कमी करण्यास सहाय्यक ठरु शकते.
 • ज्वेलरी, लेडीज गार्मेंटस्, कॉस्मेटिक्स, अत्यंत महागडया चैनीच्या वस्तूंची दुकाने दक्षिण दिशेस करावी.
 • सिनेमागृहाचे नियोजन दक्षिण ते नैऋत्य भागात करावे. सिनेमागृहाचा उतार व पडद्याची रचना उत्तर ते पूर्व दिशेत करावी. टॉयलेट्स, स्वच्छतागृहे, लॉड्री, सायबर कॅफे, पीसीओ, परफ्यूम्स, दळणवळण, टेलिफोन-मोबाइल्स, सांऊड-व्हिडिओ सिस्टीम्स, फूड मॉल्स अथवा अन्नधान्य व भाजीपाला व फळे यांसारख्या वस्तूंची दुकाने वायव्य भागात असावीत.
 • मॉलच्या व्यवस्थापकांचे कार्यालय सर्वोच्च मजल्यावर नैऋत्य भागात असावे. परचेस, मार्केटिंग रिसर्च व कायदा विभाग, कार्यालयाच्या आग्नेयमध्ये, मार्केटिंग विभाग वायव्य अकाऊंटस्, व्यवस्थापन व फायनान्स विभाग उत्तर ते पूर्व भागात असावेत.

वास्तुशास्त्र ऑफिसचे:

 • ऑफिसच्या एकंदरीत आकारमानानुसार अधिकाधिक वास्तुतत्व आणि व्यावसायिक आवश्यकतांची पूर्तता यांचा ताळमेळ बसविणे फार महत्वाचे असते.
 • पूर्व ते उत्तर या भागामध्ये प्रवेशद्वार, पाणी (पिण्याच्या पाण्याची व्यवस्था) देवघर तसेच स्वागतिका (Reception) ची रचना करावी, याचा भागात कमीत कमी वजन अथवा अधिकाधिक मोकळेपणा यांचा वजन अथवा अधिकाधिक मोकळेपणा यांचा समन्वय राखत येणाऱ्या अभ्यांगतासाठी (Visitors) बसण्याची व्यवस्था करणे चांगले असते.
 • पूर्व भागात सामन्य प्रशासन (General Administration) विभाग असावा.
 • उत्तरेस अकाऊंटस् विभाग तसेच कॅश काऊंटर यांची रचना असावी.
 • स्टोरेज, कागदपत्र, अर्ज, जाहिरातीचे साहित्य आणि उत्पादने जी विकायची आहेत ती वायव्येला प्रदर्शित करावीत.
 • तसेस वायव्य भागात दूरसंचार संबंधित उपकरणे झेरॉक्स, फॅक्स मनिशनस् तसेच शौचालय व्यवस्था या दिशेस करणे योग्य असते.
 • ऑफिसची प्रमुख व्यक्ती म्हणजेच मालक अथवा मुख्य व्यवस्थापक यांच्या बसण्याची खास व्यवस्था नैऋत्येत असावी.
 • प्रमुख व्यवस्थापकाने नैऋत्य दिशेमध्ये बसताना त्याच्या पाठीशी संपूर्ण अखंड भिंत असेल अशी रचना करावी व बसल्यानंतर आपले तोंड ईशान्य दिशेला असेल याची काळजी घ्यावी.
 • आग्नेय दिशेमध्ये खरेदी, कायदा व विधी (Legal Research and Development, Quality Control) अशी डिपार्टमेंट असणे योग्य असते.
 • तसेच आग्नेय दिशेमध्ये सर्व इलेक्ट्रिक उपकरणे तसेच कँटिनची अथवा पँट्रीची व्यवस्था करणे योग्य असते.
 • मार्केटिंग आणि विक्रीशी संबंधित व्यक्तिंना वायव्य दिशेत बसविणे फार चांगले असते.
 • मोठमोठे उद्योगधंदे अथवा व्यावसायिकांच्या भल्या मोठया ऑफिसेसमध्ये प्रत्येक मजल्यावर वेगवेगळया डिपार्टमेंटसची रचना करावी. त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाला त्याच मजल्याच्या नैऋत्य भागात बसवावे.
 • ऑफिसमधील जिन्याखाली कुणीही कर्मचारी बसून काम करणार नाही याची काळजी घ्यावी. या ठिकाणी केवळ स्टोरेज करण्याची व्यवस्था करावी.
 • सर्व स्टाफचे काम करते वेळी तोंड उत्तर ते पूर्व भागात असावे.
 • विशेष कलात्मक अथवा रचनात्मक काम करणाऱ्या व्यक्तींना ईशान्य दिशेलाच व्यक्तींना बसवावे. त्यांचे तोंड ईशान्येकडेच होईल असे पाहावे.
 • ऑडिटर्सना ईशान्य भागातच बसविणे अत्यावश्यक असते.

वास्तुशास्त्र कारखान्याचे:

एखादया औद्योगिक कारखाना चालू करणे म्हणजे कठीण काम असते, परंतु त्याहीपेक्षा तो यशस्वीरित्या चालविणे हे अधिक कठीण काम असते. त्यामुळे उद्योगधंदयात यशस्वी झालेल्या व्यक्ती खरोखरच आदरणीय आणि कौतुकास्पद असतात.

वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून कारखान्याची उभारणी करणे हे वास्तुशास्त्रालासुद्धा एक आव्हान असते. कारण एकाच यंत्रात पंचमहाभूतांपैकी अनेक तत्त्वांचे स्थान महत्वाचे असते. उदा. कॉम्प्रेसरमध्ये जडत्व (पृथ्वीतत्व), हवेचा झोत (वायूतत्व) व इलेक्ट्रिक मीटर (अग्नितत्व) अशी तीन तत्त्व महत्वपूर्ण असतात. अशा वेळी कोणत्या तत्त्वाला अधिक महत्व द्यायचे व यंत्राची स्थापना कुठे करायची यासाठी बुद्धी व कल्पकतेला बराच ताण देणे वास्तुशास्त्र तज्ञास आवश्यक असते.

 • कारखान्यासाठी चौकोनी किंवा आयताकृती प्लॉट निवडावा. विचित्र आकाराचा प्लॉट घेऊ नये.
 • शक्य असल्यास प्लॉटचा उतार उत्तर ते पूर्व भागात असावा व दक्षिण ते पश्चिम भाग उंच असावा.
 • प्रवेशद्वार, मोकळी जागा, दुचाकी वाहनांसाठी पार्किंग, हिरवळ, बगीचा व आवश्यक असल्यास मंदिर यांचे आयोजन पूर्व ते उत्तर भागात करावे.
 • सर्वात उंच व मोठी इमारत नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेत असावी तर छोटी इमारत ईशान्य (पूर्वोत्तर) भागात घ्यावी.
 • प्लॉटचा तसेच इमारतीचा मध्यभाग (ब्रम्हस्थान) मोकळा असावा. तसेच तेथे कुठल्याही प्रकारचा खड्डा व पाणी असता कामा नये.
 • इलेक्ट्रिकल ट्रान्सफार्मर, बॉयलर, जनरेटर, इलेक्ट्रिक सब-स्टेशन किंवा एखादी केमिकल प्रोसेसची भट्टी जेथे उष्णता द्यावी लागते. अथवा उष्णता निर्माण होते अशा वास्तूंची रचना आग्नेय (दक्षिण ते पूर्व) दिशेत करावी.
 • सुरक्षा अथवा कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था आग्नेय भागात करावी.
 • कँटिन, वेल्डिंग, बॉयलिंग, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट लॅब, कॉम्प्युटर सर्वर रुम, कंट्रोल पॅनल आदी गोष्टींचे आग्नेय दिशेत नियोजन करणे चांगले असते.
 • वजनी सामान, टॉयलेट, प्रशासकीय कार्यालय, कच्चा माल इ. गोष्टींचे नियोजन पश्चिमेंस करावे.
 • पॅकेजिंग, विक्रीसाठी तयार माल, विक्रीसाठी लागणारे प्रमोशान मटेरिअल, डिस्पॅच विभागास मार्केटिंग विभाग, मालाची पाठवणी करायचे गेट तसेच माल घेऊन येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांचा तळ वायव्य (उत्तर-पश्चिम) भागात असावा.

आपला चालू कारखाना वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार नसेल किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे आपण सर्व नियमांचे पालन करु शकत नसाल तर काही विनातोडफोडीचे उपाय करुन आपण आपल्या जागेतील वास्तुदोषांचे निराकरण करु शकतो. यासाठी काही प्रभावी यंत्रांचा उपयोग करुन आपण त्यात यशस्वी होऊ शकतो.

वास्तुशास्त्र हॉटेलचे:

सर्वसाधारण चहापानगृह, क्षुधातृषाशांतीगृह, खाणावळ व सर्वसाधारण लॉज या प्रकारातील हॉटेल्स अत्यावश्यक प्रकारातील मानली जातात. त्यामुळे त्यांचे प्रवेशद्वार पाच मुख्य शुभ प्रवेशद्वारांपैकी खासकरुन उत्तर ते पूर्व भागातील असणे आधिक चांगले.

अन्य सर्व प्रकारची हॉटेल्स-फॅमिली रेस्टॉरंट, बार -परमिट रुम तीन पाच अथवा सप्त-तारांकित हे सर्व प्रकार श्रीमंती व चैन- मौजमज्जा या सदरात मोडणारी असतात. त्यामुळे यांचे प्रवेशद्वार दक्षिण अथवा नैऋत्य दिशेस घेतल्यास अधिक उत्तम. ईशान्य भागात रिसेप्शन, माहिती कक्ष, अभ्यागत आसन व्यवस्था, ओपन पॅसेज, मोकळी जागा स्विमिंग पूल, अंडरग्राऊंड वॉटर टँक, कॅफेटेरिआ, गार्डन रेस्टॉरंट, ओपन लॉन, स्पेशल रुम्स, विशेष भव्य सूट्स जेथे जास्त मोकळेपणा व कमी वजन असावे. लिफ्ट व्यवस्थासुद्धा चालते.

आग्नेय भागात, मुख्यत किचन, एअरकंडिशनिंग व्यवस्था, इलेक्ट्रिक मेनस्विच, ट्रान्सफॉर्मर, हिटर्स, गिझर्स, बॉयलर, गॅस सिलेंडर्स ठेवण्याची व्यवस्था, विविध प्रकारातील रेस्टॉरंटस्, बहुमजली हॉटेल्स मधील प्रत्येक मजल्यावर एक छोटे सर्व्हिस किचन अथवा पँट्री, स्टाफ क्वाटर्स तसेच आवश्यक असल्यास पार्किंग व स्टोरेजची व्यवस्था करणे या भागात चांगले, जास्त रुम्स व जास्त लोक समाविष्ट करण्याची सिस्टीमसुद्धा चालते.

नैऋत्य भागात, कस्टमर सर्व्हिसपासून ते मुख्य अधिकारी कार्यालयापर्यंत प्रशासन यंत्रणा कार्यालय, सर्वात जास्त मजले असलेली इमारत, जिने ओव्हरहेड टँक, जास्तीत जास्त स्टोरेज, अधिकाधिक रुम्स व त्यात अधिकाधिक ग्राहक समाविष्ट करण्याची व्यवस्था आदी गोष्टींचा समावेश नैऋत्य दिशेत करणे आवश्यक असते.

वायव्य दिशेत सर्वसाधारणपणे सफाई व्यवस्था, रुम सर्व्हिस विभाग टॉयलेट ब्लॉक्स, टेलिफोन व इतर संपर्क व्यवस्था, विविध वस्तूंची दुकाने, हॉटेलच्या वैशिस्टयपूर्ण गोष्टीचा डिसप्ले, विविध प्रकारचे जिम, क्लब हाऊसेस, करमवणूक व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल्स, बुके अथवा बॅक्वेट व्यवस्था, लाँड्री व्यवस्था, मार्केटिंग विभाग, स्टोरेज, जिना सांडपाणी तसेच मलनिरासरण व्यवस्था, यासारख्या विविध गोष्टींचा समावेश विविध मजल्यावर जागेच्या उपलब्धतेनुसार करावा.

हॉटेलची उभारणी करतेवेळी सर्व प्राथमिक गोष्ट म्हणजे प्लॉटची निवड, आकार रस्ते, तसेच कंपाऊंड गेट, इमारतीचे प्लॉटमधील स्थान, जलव्यवस्था, विद्युत व्यवस्था प्रवेशद्वार, मंदिर- प्रार्थनागृह इत्यादी सर्व गोष्टींचा विचार वास्तुशास्त्रीय पद्धतीने करणे अतिलाभदायी असते.

वास्तुशास्त्र शैक्षणिक संस्थेचे:

शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा, कॉलेज, इंजिनीअरिंग, मेडिकल व अनेक प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण, तसेच प्रशिक्षण केंद्र, त्यानुसार येथेसुद्धा इमारत, विविध खोल्या, दालने, प्रयोगशाळा व वाचनालय इ. मानवी उपयोगितेच्या वास्तूंचा समावेश असतो. थोडक्यात संस्था चांगल्या प्रकारे चालावी, रिझल्ट चांगला लागावा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख सतत उंचावणारा असावा व थोडक्यात सर्वांची सर्वांगीण प्रगती होणे, यासाठी वास्तुशास्त्रदृष्टया रचना निश्चितच लाभदायी ठरते.

 • प्रवेशद्वार उत्तर ते पूर्व भागात घेणे आवश्यक.
 • संस्थेचे पटांगण उत्तर ते पूर्व भागात घेण्याने हा भाग हलका मोकळा राहतो.
 • मुख्य तसेच सर्वात उंच व मोठी इमारत नैऋत्य दिशेत असावी. त्या खालोखाल आग्नेय व त्यानंतर वायव्येत उतरत्या क्रमाच्या इमारती व मजले असावेत.
 • प्रत्येक वर्गात फळा म्हणजेच विद्यार्थ्यांची तोंडे शिकवताना पूर्व ते उत्तर दिशेत असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती विचारशक्त व एकाग्रता तल्लख राहते व अभ्यासाचे आकलन चांगल्या प्रकारे होते.
 • मुख्य इमारतीच्या ईशान्य भागात एक उत्कृष्ट सरस्वती मंदिर अथवा आकर्षकरित्या सजविलेल्या मोकळया भागात आकर्षक, सुंदर सरस्वतीची मूर्ती असावी. विद्यार्थ्यांनी प्रार्थना करतेवेळी त्याच दिशेने तोंड करावे.
 • उपप्राचार्य तथा संस्था उपाध्यक्षांचे कार्यालय दक्षिणेत असावे किंवा सर्वोच्च मजल्याच्या खालच्या मजल्यावर म्हणजे वरुन दुसऱ्या मजल्यावर असावे.
 • मुख्य लायब्ररी तथा वाचनालय पश्चिम ते वायव्य भागातच असावी. त्यातसुद्धा पुस्तकांची जड कपाटे पश्चिम ते नैऋत्य भागात व वाचनालय बैठक व्यवस्था त्या दालनाच्या वायव्य भागात, उत्तर ते पूर्व दिशेकडे तोंड करुन बसता येईल अशा पद्धतीने असावी.
 • भौतिकविज्ञान, रसायनशास्त्र, औद्योगिक तसेच विद्युत अभियांत्रिकी संगणकविज्ञान या विषयांच्या प्रयोगशाळा आग्नेय दिशेत असाव्यात.
 • बांधकाम अभियांत्रिकी, जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, विषयांच्या प्रयोगशाळा पश्चिम भागात असाव्यात.
 • संगणक, दळणवळण तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान व काही विशिष्ट प्रकारातील रसायनशास्त्र प्रयोगशाळा वायव्य भागात स्थापित करणे अत्यंत लाभदायी ठरते.
 • टॉयलेट ब्लॉक्स वायव्य ते पश्चिम भागात असावेत.
 • जनरेट पॉवर इन्व्हर्टर्स, कॉम्प्युटर, सर्वर विभाग तसेच विशेष संशोशन विभाग आग्नेय भागात असावेत.
 • कर्मचारी निवास व्यवस्था आग्नेय दिशेत असावी.
 • जिमखाना व इतर मनोरंजन सुविधा वायव्य किंवा शक्य नसल्यास ईशान्य भागातसुद्धा चालतात.
 • स्टाफ रुम पश्चिम दिशेत घेतल्यास उत्तम.

वास्तुशास्त्र बँकचे:

बँक म्हणजे आर्थिक व्यवहारांचे मुख्य स्थान. बँक म्हणजे पैसा संपत्ती व त्याचा प्रमुख कुबेर, कुबेराची दिशा उत्तर. याचाच अर्थ उत्तर दिशा म्हणजे बँकेसाठी सर्वोत्तम प्रवेशद्वार, बँक अथवा अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांची रचना करताना वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून खालील मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

 • पूर्वोत्तर भाग मोकळा असावा. ग्राहकांसाठी आसनव्यवस्था या भागात चांगली असते.
 • पूर्व ते उत्तर भागात ग्राहक सेवा काऊंटर असावे.
 • वायव्य भागात बँकेच्या विविध बचत अथवा कर्जयोजनांची पोस्टर्स जनतेला आकर्षित करण्यासाठी आकर्षकरित्या लावावे.
 • वायव्य भागात मार्केटिंग, क्रेडिट कार्ड विक्री अधिकारी अथवा व्यवसायवृद्धी साहाय्यकांसाठी स्थान असावे.
 • नैऋत्य दिशेत बँक मॅनेजर व मुख्य लॉकर्सचे स्थान असावे.
 • बँक मॅनेजर नंतरचे अधिकारी अनुक्रमे दक्षिण व पश्चिम दिशेत असावे.
 • आग्नेय दिशेत एअर कंडिशनिंग यंत्रणा, जनरेटर, बॅटरी इन्व्हर्टर व्यवस्था कॉम्प्युटर सर्वर, कँटिन अथवा पँट्री तसेच एकत्र भोजनव्यवस्था असावी.
 • गृह योजनांचे अर्ज, सेल्स प्रमोशनल साहित्य किंवा बँक देऊ करत असलेल्या सेवा वायव्येला प्रदर्शित कराव्यात.
 • बँक स्टाफ करिता बैठकीची व्यवस्था मुख्यतः वायव्य दिशेला असावी.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: