वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय सामंजस्य आणि समृद्ध जीवन जगणारे विज्ञान आहे जे आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते.
आपण आपला बहुतेक वेळ हा आपल्या घरामध्ये, ऑफिस किवा ईतर ठिकाणी घालवत असतो, मग हे सगळे वास्तु नुसार असणे गरजेचे आहे. हे देखील खरं आहे की विश्वातील सर्वच गोष्टींशी निगडित उर्जा असते. म्हणूनच हे सांगणे योग्य आहे की सर्व इमारती आणि अगदी ज्या जागेवर इमारत उभारली आहे त्या जमिनीस त्याशी संबंधित उर्जेची कंपने आहेत.
वास्तूचे मुख्य उद्दीष्ट नकारात्मक दूर करणे आणि एखाद्या ठिकाणी उपस्थित असलेली बिल्डिंग याची सकारात्मक उर्जा वाढविणे हे आहे, जेणेकरुन एखादी व्यक्ती, कुटुंब किंवा अगदी इमारतीत राहणारा व्यक्तीचा व्यवसाय समृद्ध आणि प्रगतीशील होईल.
वास्तुपद:
वास्तुपुरुषाचा, त्याच्या अंगप्रत्यंगांचा विचार जसा वास्तुनिर्मिती करताना महत्त्वाचा, तेवढेच महत्त्व वास्तूतील देवादिकांचेही आहे. भूखंडामध्ये या देवतांना विशिष्ट स्थाने (पदे) निश्चित करून भूखंडास अनेकविध पदांमध्ये विभाजित केले जाते. या रचनेलाच ‘वास्तुपद मंडल’ किंवा ‘वास्तुपदविन्यास’ असे संबोधतात. मत्स्यपुराण, समरांगण, सूत्रधार, मयमतम् आदी सर्वच वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये अनेकविध प्रकारचे वास्तुपदविन्यास वर्णन केले आहेत. मयमतम्, मानसार, शिल्परत्न या ग्रंथांमध्ये विविध प्रयोजनांना अनुसरून ३२ प्रकारचे वास्तुपदविन्यास वर्णन केले आहेत. मयमतम्, मानसार, शिल्परत्न या ग्रंथांमध्ये विविध प्रयोजनांना अनुसरून ३२ प्रकारचे वास्तुपदविन्यास वर्णन केले आहेत. यामध्ये एक पदाचे सकलपद विन्यास, चार पदांचे ‘पेचक’, नऊ पदांचे ‘पीठ’, १६ पदांचे महापीठ, अशा प्रकारे विविध पदविन्यास सापडतात. या सर्व पदविन्यांसामध्ये ६४ पदांचे मण्डूकपदविन्यास, ८१ पदांचे परमशायिक पदविन्यास सखोल वर्णन केले आहेत. ‘समरांगण सूत्रधारा’मध्ये तीन प्रधान वास्तुपदविन्यास मानले आहेत. एकशीतिपदो य:स्यात् तथा शतपदश्च य:। चतु:षष्टिपदो यश्च वास्तुस्त्र त्रिधोदित:॥ एक्याऐंशी (९ ÷ ९) पदांचे एकाशितीपद वास्तुपदविन्यास, शंभर पदांचे (१० ÷ १०) शतपदवास्तुपदविन्यास, चौसष्ट (८ ÷ ८) पदांचे चतुषष्ठीपदविन्यास महत्त्वाचे असून विशिष्ट प्रयोजनानी त्यांची मांडणी केली आहे. एकशितीपद वास्तुपदमंडल मनुष्यालयांकरिता तसेच राजप्रासादांच्या प्रवेशाकरिता, शतपदवास्तुपदमंडल मंदिरे, विविध राजवाडे याकरिता आणि चतु:षष्ठीपद वास्तुपदमंडल नगररचनाकरिता वर्णन केली आहेत. ‘समरांगण सूत्रधारा’मध्ये याखेरीज गोलाकार प्रासादांकरिता वृत्तवास्तुविधान (अध्याय १२) आले आहे. यामध्ये ६४ आणि १०० पदांचे गोलाकार वास्तुपदविन्यास अभ्यासण्यास मिळतात. त्रिकोण, षट्कोन, अष्टकोन, षोडषकोन, वृत्तायत तसेच अर्धचंद्राकार वास्तूमध्ये वृत्ताकार वास्तुपदविन्यासाप्रमाणे पदविभाजन करावे.

वास्तुपुरुष:
वास्तुपुरुष पालथा राहील अशा प्रकारे प्रतिमा निक्षेप करा. प्रतिमा निक्षेप करताना अनेकांची गफलत होते. प्रतिमा कोणत्या पद्धतीनं कोरली आहे त्याचं अगोदर नीट निरीक्षण करा. पत्र्यावर ती उताणी कोरलेली असेल. म्हणजेच डोळे, नाक, नाभी आदी दिसत असतील तर अशा वेळी पत्रा पालथा करून पुरा मात्र मुळातच प्रतिमा पालथी कोरलेली असेल तर अशा वेळी पत्रा पुन्हा पालथा करण्याची गरज नाही. असा पत्रा सरळच पुरा. पालथी प्रतिमा पुन्हा केल्यास वास्तुपुरुषाचं तोंड वरच्या दिशेला येईल आणि घराच्या सुखशांतीचा तो घास घ्यायला सुरुवात करेल. वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्येला व पाय नैऋत्येला राहतील, याची काळजी घ्या.
वास्तूदेवता:
वास्तुदेवता म्हणजे ‘प्रत्यूष’. याचा अर्थ उषादर्शन. सूर्योदयापूर्वी पसरत असणाऱ्या प्रकाशात भोवतालच्या साऱ्या वस्तू आपापले रंग आणि आकार प्रकट करीत असतात. या प्रकाशाचे म्हणजेच उषादेवीचे ध्यान करायचे असते. हे ध्यान आपल्या शरीर यंत्रणेचे घडय़ाळ, येत्या चोवीस तासांसाठी लावून देत असते. त्याच्यामुळे आपला उत्साह दिवसभर टिकतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना ‘प्रत्यूष’ देवतेची फार ओढ होती. ते न चुकता पहाटे उठून आसमंत निरखत असत. कोणीतरी त्यांना विचारले, ‘‘इतक्या लवकर उठून तुम्ही काय करता?’’ त्यांनी शांतपणे उत्तर दिले, ‘‘पहाट पाहतो.’’

‘सोम’ ही वास्तुदेवता अलीकडे दुर्मिळ व्हायला लागली आहे. सोम म्हणजे चंद्रदेवता, ज्यावर प्रसन्न आहे, असे अंगण. उत्तम वाढणाऱ्या वनस्पती म्हणजे चंद्राचा प्रसाद मानला जातो. चंद्र प्रसन्न असला तर आपण अंगणात लावलेली फुलझाडे आणि फळझाडे चांगली वाढतात, त्यांना पाने, फुले, फळे छान येतात आणि अंगणच नव्हे तर सारे घरच सुशोभित होते. हल्ली जागेच्या अभावामुळे अंगण फारसे कुठे दिसेनासे झाले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी गावात उपवने आणि उद्याने लावायची असतात. चंद्र ही हृदयाची देवता आहे. तिच्याच कृपेमुळे माणसात परस्परांत प्रेमभावना वाढते आणि तिचा कोप झाला तर माणसांतली तेढ वाढते आणि लक्ष्मी त्यांचा त्याग करते. म्हणून तर प्रेमाच्या आणाभाका चंद्राला साक्षी ठेवून घेतल्या जातात. चांदणे आणि फुललेली बाग आपल्या वाटय़ाला आली नाही तर आपले आयुष्य शुष्क होऊन जाते.
सर्व वास्तुदेवतांत प्रधान मानली गेलेली देवता म्हणजे आपली संहारक शक्ती आवरून धरून आपल्या घरी राहणारा अग्नी. याला ‘पावक’ असे नाव आहे. तो आपले अन्न शिजवून ते सहज पचेल असे करतो. सूर्य मावळल्यावर आपल्याला हवा तेवढा प्रकाश देतो. ही परमेश्वराचीच विभूती आहे. गीतेत सांगितले आहे, ‘‘वसूनां पावकश्चास्मि’ (सर्व वसू देवतांमध्ये मी गृहस्वामी अग्नी आहे). कोणाहीविरुद्ध शत्रुबुद्धी न धरता सर्वाशी समान वागण्याची शक्ती या पावक अग्नीकडे मागायची असते. कारण आपल्या जवळ असलेल्या माणसांचे दोष आपल्याला प्रकर्षांने जाणवतात. मग त्यांच्या वागण्याचा संताप यायला लागतो. ती माणसे आपले शत्रूच आहेत, अशी भावना निर्माण होते. हीच शत्रुबुद्धी. ही आपल्या घरादाराची राखरांगोळी करते. आपल्याला सहजच लाभलेल्या माणसांवरच आपण प्रेम करू शकलो नाही तर इतरांशी आम्ही चांगले कसे वागणार? शत्रुबुद्धी नाहीशी झाली म्हणजे आपल्या कुटुंबाचे भाग्य फळफळते आणि आपला परिवार खूप मोठा होतो. जितका मोठा परिवार असेल तितकी इतरांचे भले करण्याची शक्ती वाढते आणि समाजाचेही कल्याण होऊ शकते. या साऱ्या वास्तुदेवता आपल्यावर प्रसन्न असल्या म्हणजे आपले आरोग्य आणि उत्तम कार्य करण्याचा उत्साह यांचा प्रसाद आपल्याला मिळतो.
आता उत्तम कार्य करण्यात दैवाचा एक भाग असतो, हे एकदम मान्य. ते अनुकूल असावे, ही इच्छासुद्धा नैसर्गिकच आहे, पण आपली इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि प्रयत्न यांचाही उत्तम कार्यात यश मिळण्यात फार मोठा वाटा असतो. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ दैवाने मिळणारे यश फारच घातक ठरते. कारण त्याने आपल्या सक्षमतेबद्दल आपलाच गैरसमज होऊन अहंकार वाढीला लागतो. दैवाने आलेले यश कधीच टिकाऊ नसते. आयुष्य म्हणजे यश आणि अपयश यांची साखळी असते. ही आपल्या प्रयत्नांनी येत असते. आपली क्षमता वाढविण्याचे तप आणि अथक प्रयत्न करीत राहायला हवे म्हणजे मग यशाच्या पुनरावृत्तीची शक्यता वाढत जाते.
गीतेतच सांगितले आहे, ‘दैवं चैवात्र पंचमम्’ पाचवाच हिस्सा दैवाचा आहे. तो अनुकूल असला तरीही यशाची खात्री २० टक्केच असते. त्या २० टक्क्य़ांपेक्षा उरलेले ८० टक्के जास्त महत्त्वाचे आहेत, हे साधे गणित जर समजले नाही तर आयुष्याचे गणित चुकणारच! दैव संपूर्णपणे अनुकूल किंवा प्रतिकूल नसते. अपयश पुन:पुन्हा यायला लागले म्हणजेच दैवच विरुद्ध आहे, असे वाटते. अशा वेळीच प्रयत्नांचा दर्जा वाढविण्याची गरज असते. प्रयत्न निर्धाराने उत्तम केले म्हणजे मग नशिबाचे फासेही अनुकूल पडायला लागतात. ते अनुकूल होतील तेव्हा होतील. आपल्या हातातले ८० टक्के का म्हणून सोडायचे? हा विचार मनात रुजवू शकणारेच अजिंक्यवीर होतात. त्यांच्या आयुष्याचे गणित चुकत नाही कधी!
वास्तूशांती:
नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे आवश्यक आहे. घरात होम-हवन, यज्ञ असे धार्मिक कार्य करणे आवश्यक आहे. वास्तुशांती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशांती केल्यानंतर घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे आयुष्यात आनंद सुख-समृद्धी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर, वाद्याच्या गजरात, कुलदेवतेची पूजा, आलेल्या लोकांचा सन्मान, ब्राह्मणांना प्रसन्न करून घरात प्रवेश करावा. गृह प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते.
वास्तुशांतीसाठी शुभ नक्षत्र आणि मुहूर्त खालील प्रमाणे आहेत..
- शुभ वार – सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार.
- शुभतिथी – शुक्लपक्षातील द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी.
- शुभनक्षत्र – अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपद, रोहिणी, रेवती, स्वाती, अनुराधा, मगा व घनिष्ठा.
वास्तूदोष:

वास्तू फक्त आपल्या घरालाच नाही तर आयुष्यालाही प्रभावित करते. आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे प्रमुख कारण वास्तुदोष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय केले तर वास्तुदोष नष्ट होऊ शकतात..
- स्वस्तिक, मंगल कलश, ओम या चिन्हांच्या प्रतिमा घरात लावा. त्यामुळे घरात सुख-शांती राहील.
- पूर्वजांचे चित्र,देवी-देवतांसोबत लाऊ नका.
- झोपण्याच्या खोलीत नेहमी सुंदर, कलात्मक व हसणाऱ्या बाळाची प्रतिमा लावा.
- जेवणाच्या खोलीचा रंग शांत आणि शीतलता प्रदान करणारा असावा.
- जेवणाच्या खोलीच्या दरवाजावर फुलांचे चित्र लावावे.
- उपयोगात नसलेया वस्तू घरात ठेऊ नये.
- जर तुमच्याकडे जनरेटर किंवा इन्वर्टर ईशान्य कोपर्यात असेल तर ते काढून आग्नेय कोपर्यात ठेवा.
हे उपाय केले तर वास्तुदोष नष्ट होण्यास मदत मिळेल.
(संकलन: स्पंदन टीम, साभार)